मराठवाड्यातील बीड शहराच्या बीड-पाटोदा-अहमदनगर तसेच बीड-लिंबादेवी-अहमदनगर या दोन रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या डोंगराळ भागात सु. २० किमी. अंतरावर हे अभयारण्य असून खुरटया झाडाझुडपांनी आणि खुरट्या गवताने आच्छादलेले आहे. हे अभयारण्य दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारातील आहे. या वनात राष्ट्रीय पक्षी मोर मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने शासनाने ८ डिसेंबर १९९४ ला हे क्षेत्र “नायगाव मयूर अभयारण्य” या नावाने संरक्षित केले. त्या वेळी त्याचे क्षेत्र २९.९० चौ. किमी होते. यात काही खाजगी वन क्षेत्र मिळून ते ५०.६० चौ. किमी. झाले आहे. १००–५०० मी. चा पट्टा याप्रमाणे एक पट्टा खुरट्या गवताचा, दुसरा पट्टा लागवडीखालील वनस्पतींचा, नंतर झाडाझुडपांचा मधेच उजाड माळरानाचा व पुन्हा नैसर्गिक वन अशा पद्धतीने हे वन विखुरलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार २००४ या वर्षी येथील मोरांची संख्या ५,७०० होती. शासनाबरोबरच इथल्या गावकऱ्यांनीही मोरांना अभय दिले आहे. मोराबरोबरच इतर पक्ष्यांच्या शंभराहून अधिक जाती-प्रजाती या अभयारण्यात आढळतात. हे अभयारण्य डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य या नावानेही ओळखले जाते.
अभयारण्याचे क्षेत्र डोंगर उताराचे असल्यामुळे व कमी पावसाचे असल्यामुळे कुसळी (Heteropogon contortus), पवना (Sehima sulcatum), मारवेल (Dicanthium annulatum), शेडा (Sehima nervosum) अशा प्रकारची खुरटी गवते तसेच करवंद (Carissa congesta), घाणेरी (Lantana cammara) इत्यादी प्रकारची झुडुपे येथे आढळतात. चिंच (Tamarindus indica), जांभूळ (Syzigium cumini), लोखंडी (Ventilago madaraspatana), साग (Tectona grandis), चंदन (Santalum album), खैर (Senegalia catechu), बेहडा (Terminalia belirica), पळस (Butea monosperma), बिबा (Semecarpus anacardium), आवळा (Embilica officinalis), सीताफळ (Annona squamosa), बेल (Aegle marmelos), सालई गुग्गुळ (Boswellia serrata), तेंदू (Diospyros melanoxylon) इत्यादी नैसर्गिक अवस्थेत आढळणारी झाडे आहेत. वनखात्याने या अभयरण्यात सु. १२०० हेक्टर क्षेत्रात सुबाभूळ (Leucaena leucocephala), कडूनिंब/लिंब (Azadirachta indica), गिरिपुष्प (Gliricidia sepium), शिरस (Pseudotsuga japonica) आणि बोर (Zizyphus mauritiana) या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. वड-पिंपळ प्रजातीतील काही जातीही इथे वाढतात. वनस्पतींप्रमाणेच येथील प्राणी जीवनही वैविध्यपूर्ण आहे. रानमांजर, तरस, काळवीट, लांडगा, कोल्हा आणि ससे हे प्राणी सापडतात. यांच्याबरोबरच काही सापांच्या जाती, मुंगूस, अजगर आणि सरडे या अभयारण्यात आहेत. येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी., उन्हाळ्यातील कमाल तापमान ४५० से. आणि हिवाळ्यात कमीत कमी तापमान १०० से.पर्यंत खाली जाते. अशा विषम वातावरणातही जैववैविध्य आढळून येते. या अभयारण्याला भेट देण्याचा योग्य काळ ऑक्टोबर ते जून असा आहे.
संदर्भ :
समीक्षक : निलिमा कुलकर्णी
उत्कृष्ट माहीती दिली असुन शब्दांकनही छान आहे.
येथिल निसर्गरम्य वातावरण, मोर व इतर वन्यजीव पाहणे हि एक पर्वणी असुन पक्षी अभ्यासक, निसर्ग प्रेमी यांनी आवर्जुन भेट देवुन हा निसर्ग निर्मीत खजाना अनुभवणे आवश्यक आहे असे वाटते
आमच्या हरियाली संस्थेच्या माध्यमातुन Nature Walk या उपक्रमाअंर्गत या ठीकाणास भेट देणार आहोत.