किन्झी, ॲल्फ्रेड चार्ल्स (२३ जून १८९४ – २५ ऑगस्ट १९५६).
अमेरिकन प्राणीशास्त्रज्ञ आणि मानवी लैंगिक वर्तनाचे अभ्यासक.
किन्सी ह्यांचा जन्म अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यात झाला. त्यांचे वडील स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक होते. असे असूनही ॲल्फ्रेड यांचे बालपण गरिबीत गेले. अपुऱ्या दूध व सूर्यप्रकाशामुळे त्यांच्यात ड जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली आणि त्यांना मुडदूस झाला. त्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याला बाक आला व त्यांना इतरही शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागले.
वडिलांनी ॲल्फ्रेडच्या इच्छेविरूद्ध त्यांना स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवावयास लावले. पण त्यांना या अभ्यासक्रमात रस नसल्याने त्यांची ऐन उमेदीची दोन वर्षे वाया गेली. त्यानंतर ते त्यांच्या आवडीच्या प्राणिशास्त्र आणि वनस्तिशास्त्र ह्या विषयांकडे वळले. जीवशास्त्र आणि मानसशास्त्र विषयांमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर, प्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ विल्यम व्हीलर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. त्यांनी भरपूर प्रवास करून सीनिप्स प्रजातीच्या लाखोविषारी गांधीलमाशांचा वेगवेगळ्या निकषांवर अभ्यास करून लिहिलेल्या प्रबंधाला पीएच.डी. प्रदान करण्यात आली. न्यूयॉर्कमधील अमेरिकेन नॅचरल हिस्टरी म्युझियममध्ये विषारी गांधीलमाशांचे सुमारे एक कोटी ऐंशी लाख नमुने आहेत. त्यापैकी पांच लाख नमुने एकट्या ॲल्फ्रेड किन्सी ह्यांनी जमविलेले आहेत.
कीटकांवर काम करत असताना त्यांना मानवी लैंगिकता ह्या विषयात रस निर्माण झाला. त्यांनी उरलेले सर्व आयुष्य अमेरिकेन समाजात त्या काळात पूर्णत: निषिद्ध मानल्या गेलेल्या मानवी लैंगिकता ह्या विषयाच्या अभ्यासात व्यतीत केले. मानवी लैंगिक भावना आणि अनुभव आणि विषारी गांधीलमाशीमधील समागम प्रक्रिया यांच्या अभ्यासातून त्यानी मानवी लैंगिकतेचा सखोल अभ्यास केला. ह्या अभ्यासासाठी त्याना रॉकफेलर इन्स्टिट्यूटने निधी पुरविला. यासाठी त्यांनी इंडियाना विश्वविद्यालयात इन्स्टिट्यूट फॉर सेक्स, जेंडर अँड रिप्रॉडक्शन नामक संशोधन संस्था स्थापन केली. आर्थिक लाभ मिळवणे हे ह्या संस्थेचे ध्येय नव्हते. धार्मिक आणि जुनाट मतांच्या व्यक्तींच्या विरोधाला न जुमानता त्यांनी हजारो लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात तोपर्यंत अमेरिकन समाजात विचार न केल्या गेलेल्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदी, शरीरविक्रय करणाऱ्या महिला, समलिंगी लोक – अशा गटांचाही समावेश होता. मुलाखतींच्या आधाराने त्यांनी अभ्यासातील निकष जगापुढे मांडले. विवाह आणि कुटुंब ह्या विषयावर जनसामान्यांसाठी ते अनेक व्याख्याने देत. लैंगिक उद्दीपन, संभोग शरीर प्रक्रिया आणि कुटुंबस्वास्थ्य व गर्भनिरोधन असे विषय शिकवित असत. पुरुषांची लैंगिक वर्तणूक (Sexual Behavior in the Human Male) आणि स्त्रियांची लैंगिक वर्तणूक (Sexual Behavior in the Human Female) ह्या शीर्षकांची त्यांनी लिहिलेली पुस्तके लाखो लोकांनी विकत घेऊन वाचली. ह्या पुस्तकांच्या लिखाणासाठी सुमारे ६०००लोकांच्या लैंगिक वर्तणुकीचा आधार घेतला गेला होता. कालांतराने ह्या दोन्ही पुस्तकांचा एकत्रित विचार केला गेला आणि तो किन्सी अहवाल या नावे प्रसिद्ध झाला.
ॲल्फ्रेड किन्सी हे त्यांनी विकसित केलेल्या किन्सी लैंगिक प्रवृत्तीच्या मापनाबद्दल आणि लैंगिकताशास्त्राचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला त्यानी विषारी गांधीलमाशीमधील लैंगिक प्रवृत्ती मापन श्रेणी विकसित केली. नंतर तिचा मानवी लैंगिक प्रवृत्ती मापनासाठी वापर केला.
लैंगिक प्रवृत्तीच्या १ ते ६ श्रेणींमध्ये– पूर्णत: विषम लैंगिक आकर्षणापासून (श्रेणी ६), पासून पूर्णत: समलैंगिक आकर्षणापर्यंतची (श्रेणी १) मापने त्यांनी अनेक लोकांच्या मुलाखतींवरून ठरवली. नंतर ह्या श्रेणींमध्ये – कोणताही सामाजिक व लैंगिक संबंध न ठेवणाऱ्या लोकांसाठी शून्य क्रमांकाच्या श्रेणीची भर घालण्यात आली.
ॲल्फ्रेड किन्सी यांनी विकसित केलेल्या लैंगिक प्रवृत्ती मापनामुळे अमेरिकेत लैंगिक क्रांती घडली.किन्सी यांच्या कामामुळे अमेरिकेतील आणि संपूर्ण जगभरातील सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये बदलली.
अमेरिकेतील ब्लूमिंग्टन राज्यात त्यांचे निधन झाले .
संदर्भ :
- https://www.kinseyinstitute.org/about/history/alfred-kinsey.php
- https://www.biography.com/people/alfred-kinsey9365493Wikipedia
- Encyclopedia Britannica
- https://www.amnh.org/shelf-life/episode-09-kinsey-s-wasps
- https://www.amnh.org/shelf-life/episode-09-kinsey-s-wasps
समीक्षक – मोहन मद्वाण्णा