ग्रिफिथ, फ्रेडरिक : (१८७९ – १९४१).

ब्रिटीश जीवाणुशास्त्रज्ञ. त्यांनी जीवाणूद्वारे होणाऱ्या न्यूमोनिया या रोगामुळे शरीरात घडणाऱ्या रचनात्मक आणि क्रियात्मक बदलांचे निदान करण्याच्या तंत्राचा अभ्यास केला.

ग्रिफिथ यांचा जन्म इंग्लंडमध्ये हेल, लँकेशायर येथे झाला. त्यांचे शिक्षण लिव्हरपूल विद्यापीठात झाले (१९०१). वैद्यकशास्त्रातील पदवी घेतल्यावर त्यांना तेथील रूग्णालयात नोकरी लागली. पहिल्या जागतिक महायुद्धामुळे सरकारी रूग्णालयांच्या कारभारात बरेच बदल झाले. सरकारी खर्चात कपात झाली आणि सरकारी प्रयोगशाळांची अवस्था खालावली. पण तरीही ग्रिफिथ आणि त्यांचा सहकारी विल्यम स्कॉट (William Scott) यांनी तेथेच केवळ केरोसीनचा प्राइमस स्टोव्ह वापरून संशोधन केले.

ग्रिफिथ यांच्याकडे इंग्लंडमधील न्यूमोनिया झालेल्या व्यक्तीतील जिवाणूंचे नमुने पाठविले गेले होते. न्यूमोनिया हा भयंकर रोग स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी (Streptococcus pneumonia) या स्ट्रेप्टोकोकायच्या जातीमुळे व इतरही काही जिवाणूंमुळे होत होता. या रोगात ताप, खोकला, छातीत दुखणे, थंडी वाजणे, श्वसन मार्गातील जंतूंच्या संसर्गामुळे श्वासोच्छवासाला होणाऱ्या त्रासामुळे बरेच वेळा प्राणहानीसुद्धा होत असे. अशा जीवघेण्या रोगावर प्रतिबंधक लस बनविण्याचा त्यांचा उद्देश होता. ग्रिफिथने स्ट्रेप्टोकोकाय न्यूमोनी ह्या जिवाणूंचे वर्गीकरण केले व हे नमुने वापरून उंदरांमध्ये होणाऱ्या न्यूमोनियाचा अभ्यास सुरू केला.

ग्रिफिथने न्यूमोनिया झालेल्या व्यक्तीतील स्ट्रेप्टोकोकायचा वापर उंदरांमध्ये संसर्ग निर्माण करण्यासाठी केला. ह्या स्ट्रेप्टोकोकायच्या जंतूंचे मुख्यतः दोन प्रकार असतात. एका प्रकारच्या जंतूंच्या पेशीचे आवरण खरखरीत (Rough; R). असते तर दुसऱ्या प्रकारच्या जंतूंच्या पेशीचे आवरण गुळगुळीत (Smooth; S)असते. खरखरीत स्ट्रेप्टोकोकायचे इंजेक्शन जर उंदरांना दिले तर त्यांना न्यूमोनिया होत नव्हता. पण जर गुळगुळीत प्रकारच्या स्ट्रेप्टोकोकायचे इंजेक्शन उंदरांना दिले तर त्यांना न्यूमोनिया होत होता. म्हणजे खरखरीत स्ट्रेप्टोकोकाय असंक्रामक असतात तर गुळगुळीत स्ट्रेप्टोकोकाय संक्रामक असतात. जर इंजेक्शन देण्याआधी गुळगुळीत स्ट्रेप्टोकोकायचे जीवाणू गरम पाण्यात टाकले तर उंदरांना न्यूमोनिया होत नव्हता पण जर गुळगुळीत स्ट्रेप्टोकोकायचे जीवाणू गरम पाण्यात टाकून खरखरीत स्ट्रेप्टोकोकाय बरोबर इंजेक्शनमध्ये मिसळून दिले तर उंदरांना न्यूमोनिया झाला. म्हणजे गुळगुळीत स्ट्रेप्टोकोकायचा अर्क खरखरीत स्ट्रेप्टोकोकायला गुळगुळीत बनवत होता आणि त्यामुळे खरखरीत स्ट्रेप्टोकोकाय संक्रामक बनत होत्या. म्हणजेच एक प्रकारचे जीवाणू दुसऱ्या जिवाणूंच्या जनुकांमध्ये बदल घडवून त्यांचे स्वरूप आणि व्यवहार बदलू शकत होते. ही कल्पनाच त्या काळात विस्मयकारी होती.

ग्रिफिथने अशा न्यूमोनियामुळे मेलेल्या उंदरांपासून गुळगुळीत स्ट्रेप्टोकोकाय वेगळे करून ते खरोखर परिवर्तीत झाले आहेत, हे सिद्ध करून दाखविले. जनुके एका जीवाणूमधून दुसऱ्या जीवाणूत जाऊन त्यात जनुकीय बदल घडवून आणू शकतात हे या प्रयोगामुळे सिद्ध झाले. ह्यापूर्वी अशी जनुकांची देवाणघेवाण फक्त स्त्री आणि पुरुष बिजांडाचा संयोग होवूनच शक्य होते अशी समजूत होती. पण एकपेशीय जीवाणूत पण अशी जनुकीय देवाण-घेवाण सहज शक्य असते हे ग्रिफिथ यांनी दाखवून दिले. ह्याचेच  अनुवांशिक रूपांतरण (जेनेटिक ट्रांसफॉर्मेशन; Genetic Transformation) असे नंतर नामकरण झाले. असे अनुवांशिक रूपांतरण स्ट्रेप्टोकोकायच्या इतरही उपजातींमध्येपण होऊ शकते हे ग्रिफिथने दाखवून दिले. अनुवांशिक रूपांतरण घडवून आणण्याची किमया स्ट्रेप्टोकोकायच्या अर्कात असते हे सिद्ध झाले पण किमया नेमक्या कुठल्या घटकामुळे होते हे मात्र तेव्हा उलगडले नव्हते.

ग्रिफिथ यांनी १९२८ मध्ये अनुवांशिक रूपांतरणाबद्दल संशोधन प्रसिद्ध केले. पुढे त्यांनी टॉन्सिलच्या (Tonsil) दाहाविषयी पण शोधनिबंध प्रसिद्ध केले. स्ट्रेप्टोकोकायचे वेगवेगळे प्रकार शोधून त्यावर विस्तृत निबंध लिहिला. माणसाला घसा दुखणे, ताप येणे ह्या साध्या आजारापासून ते न्यूमोनिया(Pneumonia), सिंदूर ज्वर (Scarlet fever), प्रासविक ज्वर (Puerperal fever ) सारखे जीव घेणे रोग होतात त्या सर्वांना स्ट्रेप्टोकोकाय याच्या काही जाती कारणीभूत असतात हे दाखवून दिले.

दुसऱ्या महायुद्धात लंडनमधील बॉम्ब हल्ल्यात ग्रिफिथ आणि त्यांचे सहकारी विलियम स्कॉट यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा