जलचक्रांतर्गत एखाद्या जलसाठ्यामध्ये जलकण (जल संयुग) जो काळ घालवितो, त्याला निवासी काल असे म्हणतात. निवासी काल हा पाण्याचे सर्वसाधारण वय ठरविण्याचा मापदंड आहे.
जलसाठ्यांचा सरासरी निवासी काल |
|
साठा | सरासरी निवासी काल |
अंटार्क्टिका | २०,००० वर्षे |
महासागर | ३,२०० वर्षे |
हिमनद्या | २० – १०० वर्षे |
ऋतुंमधील हिमाच्छादन | २ – ६ महिने |
मातीतील आर्द्रता | १ – २ महिने |
भूजल वरच्या थरातील (उथळ) | १०० – २०० वर्षे |
भूजल खालच्या थरातील (खोल) | १०,००० वर्षे |
सरोवरे | ५० – १०० वर्षे |
नद्या | २ – ६ महिने |
वातावरण | ९ महिने |
मुख्य हिमाच्छादित भागात, अंटार्क्टिका आणि ग्रीनलंडमध्ये हिम प्रदीर्घ कालावधीसाठी राहते. अंटार्क्टिकातील हिमाच्या कालाचे विश्वसनीय रीत्या आतापासून ८०,००० वर्षे आधीचे कालनिर्धारण (Dating) केले आहे. जरी प्रत्यक्ष निवासी काल सर्वसाधारणतः कमी असला तरी जलशास्त्रात निवासी काल दोन पद्धतींनी काढतात :
(१) जास्त वापरली जाणारी पद्धत वस्तुमानाची अविनाशिता (Conservation of mass) या तत्त्वावर आधारलेली आहे. गृहीत जलसाठ्यात पाण्याचे प्रमाण हे ढोबळमानाने स्थिर असते असे ही पद्धत मानते. या पद्धतीत जलसाठ्याच्या घनफळाला जलसाठ्यात प्रवेश करणाऱ्या किंवा जलसाठा सोडून जाणाऱ्या पाण्याच्या घनफळाने भागून निवासी काल ठरविला जातो. यामागील कल्पना जल (पाणी) नसताना तो साठा पूर्णपणे भरण्यासाठी लागणारा काल ही आहे. (किंवा पाण्याचा काहीही ‘येवा’ नसताना भरलेला जलसाठा रिकामा होण्यासाठी लागणारा काल किती आहे).
(२) पर्यायी पद्धत : भूजलाचे कालनिर्धारण करणे. या पद्धतीमध्ये भूजलाचे समस्थानिक (Isotops) पद्धतीने कालनिर्धारण केले जाते. हे समस्थानिक जलशास्त्राचा (Hydrology) उपविभाग म्हणून करण्यात येते.
समीक्षक – अशोक पटवर्धन