पंडित अहोबल यांनी रचलेला संगीतशास्त्रावरील एक विचारपरिप्लूत संस्कृत ग्रंथ. पं. अहोबल यांच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार ते दक्षिण भारतातील द्रविड ब्राह्मण होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकृष्ण / कृष्ण पंडित असून त्यांच्याकडूनच संगीताचे ज्ञान अहोबल यांनी घेतले. हे दाक्षिणात्य ग्रंथकार असूनही त्यांनी उद्धृत केलेल्या रागांत खास हिंदुस्थानी अशा अनेक रागांची नावे आढळतात. प्रस्तुत संगीत पारिजात या ग्रंथाचा निश्चित काळ ज्ञात नाही; परंतु पं. दिनानाथ यांनी या ग्रंथाचे इ. स. १७२४ मध्ये केलेले फार्सी भाषांतर आणि पं. भावभट्टांच्या ग्रंथाच्या आधारे याचा काळ निश्चित करण्यात आलेला आहे. त्याचा आधार घेऊन पं. विष्णु नारायण भातखंडे यांनी त्याचे लेखन इ. स. १६५० मध्ये झाल्याचे मत व्यक्त केले आहे.

या ग्रंथात संगीत विषयावर सुमारे ५०० श्लोक आहेत. पण त्याचे प्रकरणे, अध्याय असे विभाजन नाही. ‘अथ’ या शब्दाने नवीन विषय सुरू होतो, ते प्रकरणच होय. त्यानुसार मंगलाचरणम्, स्वराप्रस्तार, वर्णलक्षणम्, जातीनिरुपणम् आणि रागप्रकरणम् आदी विभाग दिसतात. पण प्रत्येक प्रकरणात शीर्षकाव्यतिरिक्त अन्य पुष्कळ विषय समाविष्ट झालेले दिसतात. सुरुवातीच्या १९ श्लोकांत पं. अहोबलांनी संगीत कलेची महत्ता वर्णन करून प्राचीन ग्रंथकार हनुमान, शार्दूल, कोहल, कम्बल, अश्वतर, शेष इत्यादींचा उल्लेख केला आहे. मात्र भरत, मतंग, शारंगदेव (शार्ग्ङदेव) या संगीत ग्रंथकारांचे प्रत्यक्ष उल्लेख नाहीत.

पुढील २० ते ४०-४१ श्लोकांत संगीत, संगीताचे मार्ग व देशी हे दोन भेद यांच्या व्याख्या देऊन या ग्रंथातील विविध विषयांची यादी दिलेली आहे. पुढे शरीरातील ध्वन्युत्पादक नाड्या, नाभी, हृदय इत्यादी ध्वनीनिर्मितीची स्थाने; आहत-अनाहत नाद याची माहिती; शरीराच्या हृदय, कंठ व शीर्ष या भागांतील ध्वन्युत्पादक चक्रे इत्यादींचे वर्णन केलेले आहे. येथे अहोबल यांनी श्रुतीबाबत, सर्वच श्रुती त्या-त्या रागात स्वरत्व पावतात. रागात ज्या श्रुती प्रयुक्त होत नाहीत, फक्त त्यांना श्रुती ही संज्ञा देण्यात येते, असे मत मांडले आहे. तसेच वीणा व शरीर यात केशाग्र अंतराने पुष्कळ श्रुती आहेत. असेही म्हटले आहे.

४२ ते ६१ पर्यंतच्या श्लोकांत नारदांच्या (नारदीय शिक्षा या ग्रंथाचे कर्ते) मतानुसार श्रुतींची नावे देऊन स्वरांमधील सुट्या श्रुतींच्या कार्याचे स्पष्टीकरणही केलेले आहे. त्यानंतर प्रत्येक श्रुतीची जाती (प्रकार) सांगून त्यांचा परिणाम सांगितला आहे. यापुढचे श्लोक हे स्वरप्रकरण या अंतर्गत मोडतात. याप्रकरणातील ग्रंथकाराची पुढील मांडणी इतर तत्कालीन ग्रंथकारांपेक्षा वेगळी आहे. – कोणत्याही स्वराला १, २, ३, ४ श्रुतीप्रमाणे चढवीत गेले असता त्या स्वरास क्रमाने तीव्र, तीव्रतर, तीव्रतम व अतितीव्रतम या संज्ञा प्राप्त होतात. या पायऱ्या एक गांधारच चढू शकतो. री-ध दोन आणि म-नि तीन पायऱ्या चढू शकतात. स्वर आपल्या शुद्ध स्थानावरून एक श्रुती उतरला म्हणजे त्यास ‘कोमल’ व दोन श्रुती उतरला म्हणजे त्यास ‘पूर्व’ ही संज्ञा दिली जाते.

पुढच्या प्रकरणात (७९ ते ८५ श्लोक) वादी, विवादी या स्वरांच्या व्याख्या देऊन स्वरांची विविध कुळे, वर्ण, रंग, स्वरांच्या देवता, छंद आदी विषय दिले आहेत.

ग्रामप्रकरणात (८७ ते १०२ श्लोक ) षड्जग्राम, मध्यमग्राम, गांधारग्राम हे तीन ग्राम सांगितले आहेत. त्यातील षड्जग्राम हा प्रधान (मुख्य/वरिष्ठ) आहे व उरलेल्या दोन ग्रामातील राग आता प्रचारात नाहीत, असे सांगितले आहे. पुढील प्रकरणात मूर्छनांचे वर्णन केले आहे. येथे मूर्छना म्हणजे ज्या स्वरापासून रागाची तान सुरू होते ती, असा उल्लेख आहे. अर्थात ते प्राचीन ग्रंथांच्या अनुसरणानेच केले आहे. यानंतर नष्टोद्दिष्ट प्रकरण असून नंतर वर्णालंकाराचा विषय दिलेला आहे. श्लोक २१९ ते २९६ पर्यंत स्वरालंकार हा विषय दिलेला आहे. पुढच्या जाति-निरूपण प्रकरणात जातींची प्राचीन व्याख्या – अंश स्वरावर विलंबितपणे थांबून-थांबून गायले अथवा वादन केले असता, त्या-त्या स्वरनामांच्या जाती उत्पन्न होतात – अशी दिलेली आहे. १९ गमकांचे विवेचन दिले आहे. यातील काही गमके संगीतरत्नाकर  व रागविबोध या ग्रंथांत दिलेल्यापेक्षा निराळी आहेत.

या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात पं. अहोबल यांनी सात शुद्ध व पाच विकृत अशा बारा स्वरांची स्थाने तारेच्या लांबीने कायम करून ठेवली आहेत. आपण हे पडताळून पाहू शकतो. याकरिता विशिष्ट स्वराचा ध्वनी निघण्यासाठी विशिष्ट लांबीची तार हवी. पं. अहोबल यांनी त्यावेळी सुधारित साधनांचा अभाव असताना शोधले, म्हणूनही याचे महत्त्व आहे.

संदर्भ :

  • देसाई, चैतन्य, संगीतविषयक संस्कृत ग्रंथ, पुणे, १९७९.

समीक्षक – सु. र. देशपांडे

#संगीतरत्नाकर#नारदीय शिक्षा#स्वरमेलकलानिधि