गुप्त, परमेश्वरीलाल : (२४ डिसेंबर १९१४ – २९ जुलै २००१).

भारतीय नाणकशास्त्राचे विख्यात संशोधक, हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे झाला. शालेय जीवनापासूनच भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सहभाग. त्यामुळे इ. ८ वी मध्ये असताना त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले (१९३०). आझमगढ जिल्ह्याच्या नागरी असहकार चळवळीतील ते सर्वांत तरुण नेता असल्याने ‘आझमगढचे जवाहरलाल नेहरूʼ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. पुढे १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपले राजकीय उद्दिष्ट साध्य झाल्याचे पाहून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.

स्वातंत्र्योत्तर काळात १९४८ मध्ये १८ वर्षांच्या अंतराने त्यांनी टप्याटप्याने राहिलेले शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शालेय परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. नंतर बहि:स्थ विद्यार्थी म्हणून पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पुढे रात्रपाळीत पत्रकार म्हणून काम करत ते ‘प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीʼ या विषयात प्रथम श्रेणीत कलाशाखेची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांना भारतीय कलाभवन, वाराणसी येथे सहायक संग्रहालय प्रमुख म्हणून नोकरी मिळाली. येथे त्यांना आहत नाण्यांवर संशोधन करण्याची संधी प्राप्त झाली. या संशोधनकामामुळे त्यांचा भारतातील बहुतेक सर्व प्रमुख संग्रहालयांशी संबंध आला. त्यांचे आहत नाण्यांविषयीचे संशोधन हे मूलभूत प्रकारचे होते. भारतात सापडणाऱ्या या सर्वांत प्राचीन नाण्यांबद्दलच्या ज्ञानामध्ये त्यांच्या संशोधनामुळे मोलाची भर पडली. त्यांनी मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझीअम (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) मध्ये नाणकशास्त्रज्ञ म्हणूनही काम पाहिले (१९५३). पुढे त्यांनी ‘प्राचीन भारताची आहत नाणीʼ या विषयावर वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली बनारस हिंदू विश्वविद्यालयातून विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही पदवी प्राप्त केली (१९५९).

परमेश्वरीलाल काही काळ ब्रिटिश संग्रहालय, लंडन येथे शिष्यवृत्तीवर कार्यरत होते (१९६२). तेथे त्यांनी मोगल (मुघल) नाण्यांच्या यादीचा मसुदा तयार केला. परत आल्यावर त्यांनी पाटणा संग्रहालयाचे प्रमुख म्हणून निवृत्तीपर्यंत काम पाहिले (१९६३–७२). तसेच भारत सरकारचे संग्रहालय मध्यवर्ती सल्लागार मंडळ (१९६४–७०), विविध संग्रहालयांच्या कलाविक्री समिती (१९६२–८७), उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या नाणक समितीचे अध्यक्ष म्हणून (१९८४) अशा अनेक प्रतिष्ठीत संस्थांवर काम केले. शिवाय पुरातत्त्व आणि इतिहास क्षेत्रातील विविध परिषदांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

भारतीय मुद्रा परिषदेच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सदैव सहभाग राहिला. १९५३ मध्ये या परिषदेच्या कार्यकारी मंडळावर काम करण्यास सुरुवात केल्यानंतर परिषदेच्या नियतकालिकाचे संपादक   (१९६४–७३) आणि सरचिटणीस (१९६८–७३) म्हणून त्यांनी काम केले. नाणकशास्त्रावरील त्यांची सु. ३२ पुस्तके आणि सु. २५० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेल्या ‘इंडिया – द लँड अँड पीपलʼ या मालिकेतील कॉइन्स (१९६९) हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक म्हणजे भारतीय नाण्यांविषयीचे सर्वांत माहितीपूर्ण पुस्तक होय. या पुस्तकाचे तमिळ, बंगाली, कन्नड या भारतीय भाषांत अनुवाद झाले. या पुस्तकासाठी द रॉयल न्यूमिझ्मॅटिक सोसायटी, इंग्लंडने त्यांना ‘ल्होत्काʼ (Lhotka) पुरस्काराने सन्मानित केले (१९६९). भारत के पूर्व-कालिक सिक्के (१९९६) या त्यांच्या पुस्तकामध्ये सुरुवातीपासून ते १२ व्या शतकापर्यंतच्या नाण्यांच्या इतिहासाविषयी ऊहापोह केला आहे. नाणकशास्त्र, पुराभिलेख, कला व पुरातत्त्वविद्या, इतिहास या विषयांतील त्यांची आणखी काही प्रमुख ग्रंथसंपदा अशी : द अमरावती होर्ड ऑफ सिल्व्हर पंच मार्क्ड कॉइन्स (१९६३); न्यूमिझ्मॅटिक अँड आर्किऑलॉजी (संपा., १९८७); प्राचीन भारत के प्रमुख अभिलेख (अंक १ व २ – १९७६, १९८३); भारतीय वास्तुकला (१९७७); गुप्त साम्राज्य (१९७०). याशिवाय जीवनचरित्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कायदा आणि हिंदी साहित्य अशा विविध विषयांतील त्यांचे लेखन उल्लेखनीय आहे.

त्यांचे नाणकशास्त्रातील सर्वांत उल्लेखनीय कार्य म्हणजे अंजनेरी (नाशिक) येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिझ्मॅटिक स्टडीजʼ या संस्थेची के. के. माहेश्वरी या त्यांच्या नाणकशास्त्राच्या अभ्यासकाच्या मदतीने केलेली स्थापना (१९८४). या संस्थेचे ते संस्थापक संचालक आणि संस्थेच्या न्यूमिझ्मॅटिक डिजेस्ट (Numismatic Digest) या नियतकालिकाच्या मुख्य संपादकांपैकी एक होते. स्वत:ची नाणकशास्त्रावरील विपुल ग्रंथसंपदा त्यांनी संस्थेच्या ग्रंथालयासाठी दान दिली.

परमेश्वरीलाल यांना नाणकशास्त्रातील सखोल कार्याबद्दल विविध मानसन्मान देऊन गौरविण्यात आले. भारतीय मुद्रा परिषदेतर्फे चक्रविक्रम पदक (१९५४) व नेल्सन राइट पदक (१९६२); द एशियाटिक सोसायटी ऑफ कलकत्ता यांच्यातर्फे सर यदुनाथ सुवर्णपदक (१९७५); द रॉयल न्यूमिझ्मॅटिक सोसायटी, इंग्लंड यांच्यावतीने गौरवपदक (१९७७); तर न्यूयॉर्कच्या अमेरिकन न्यूमिझ्मॅटिक सोसायटीतर्फे प्रतिष्ठित हंटिंग्टन पदक (१९८७) इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले. तसेच भारतीय मुद्रा परिषद, द रॉयल न्यूमिझ्मॅटिक सोसायटी (इंग्लंड), जागतिक नाणकशास्त्र आयोग आणि द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे इ. प्रतिष्ठीत संस्थांचे मानद सभासदत्वही त्यांना बहाल करण्यात आले.

मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ :

  • Jha, Amiteshwar, ‘Dr. Parmeshwari Lal Guptaʼ, Numismatic Digest, 25-26, 2002.
  • Macdowall, D. W.; Sharma, Savita & Garg, Sanjay, Eds., Indian Numismatics, History, Art & Culture, Essays in the Honour of Dr. P. L. Gupta, Vol. 1, 1992.
  • गुप्त, परमेश्वरीलाल, भारत के पूर्व-कालिक सिक्के, आवृ. तिसरी, २००६.

समीक्षक – अमितेश्वर झा

प्रतिक्रिया व्यक्त करा