कॅबट, जॉन : (१४५०-१४९८). इटालियन जिओवन्नी कॅबट. इटालियन मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. जन्म बहुतेक इटलीतील जेनोआ येथे झाला असावा. इ. स. १४६१ किंवा त्यापूर्वी ते व्हेनिसला गेले असावे. १४७६ मध्ये ते व्हेनिस शहराचा नागरिक बनले. व्हेनिशियन व्यापारी कंपनीत नोकरी करीत असताना त्यांनी भूमध्य समुद्राच्या पूर्व भागाचा प्रवास केला. त्या वेळी त्यांनी मक्का (Mecca) शहराला भेट दिली. मक्का त्या वेळी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य वस्तूंच्या देवघेवीचे मोठे व्यापारी केंद्र होते. या प्रवासात त्यांनी मार्गनिर्देशनतंत्रात चांगलेच कौशल्य प्राप्त केले. त्याच दरम्यान मार्को पोलो (Marco Polo) यांनी अतिपूर्वेकडील प्रदेशाविषयी केलेले वर्णन त्यांच्या वाचनात आले. त्यामुळे आशियाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. १४८० च्या दशकाच्या मध्यापासून ते १४९० च्या दशकातील मध्यापर्यंतच्या कालावधीतील कॅबेट यांचे वास्तव्य आणि त्यांचे कार्य यांबद्दल संदेह आहे. १४८४ च्या दरम्यान आपल्या कुटुंबीयांसह तो इंग्लंडला गेला असावा आणि १४९५ च्या अखेरीस इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे घर घेऊन तेथे त्यांनी वास्तव्य केले असावे. ब्रिस्टल येथेच जहाज कंपनीत ते काम करू लागले. १४९० च्या दशकाच्या सुरुवातीस ते स्पेनमध्ये असावे आणि १४९५ मध्ये इंग्लंडला गेले असावे, अशीही शक्यता धरली जाते.
इटालियन मार्गनिर्देशक क्रिस्तोफर कोलंबस (Christopher Columbus) १४९२ मध्ये स्पेनहून वेस्ट इंडीज बेटांपर्यंत पोहोचला. कोलंबसाने नव्या भूमीचा शोध लावल्याच्या बातमीमुळे आपणही नव्या भूमीचे शोध घ्यावेत, असे इंग्लंडला वाटू लागले. कोलंबस ज्या मार्गाने गेला, त्याच्यापेक्षाही जवळचा मार्ग उपलब्ध असल्याचा कॅबट यांचा दावा होता. पश्चिम दिशेला जाऊन आपण पूर्व आशियाचा मार्ग शोधून काढू; त्या प्रवासासाठी ब्रिटिश शासन व व्यापाऱ्यांनी आपल्याला मदत करावी, असे आवाहन कॅबट यांनी केले. ५ मार्च १४९६ रोजी इंग्लंडचा राजा सातवा हेन्री याने कॅबट आणि त्यांच्या मुलांना एक एकस्व (Patent) दिले. त्या एकस्व पत्रानुसार कॅबट यांनी इंग्लंडच्या राजाच्या वतीने नव्या भूमीच्या शोधार्ध जायचे; त्यांनी नव्याने शोधलेल्या बेटांवर किंवा मुख्य भूमीवर इंग्लंडचा हक्क प्रस्थापित करायचा आणि त्या प्रदेशात ब्रिटिश वसाहती स्थापन करून त्या वसाहतींशी इंग्लंडचे व्यापारी संबंध प्रस्थापित करायचे असा अधिकार कॅबट यांना देण्यात आले होते. एकस्व पत्रानुसार १४९६ मध्ये कॅबट हे ब्रिस्टलहून एका जहाजाने प्रवासास निघाले; परंतु शिधासामग्रीचा तुटवडा, वादळी हवा आणि जहाजावरील सहकाऱ्यांशी उद्भवलेले वाद यांमुळे त्यांना तो प्रवास अर्धवट सोडून परतावे लागले.
२ मे १४९७ रोजी कॅबट हे ब्रिस्टल येथून १८ सहकाऱ्यांसह मॅथ्यू या छोट्याशा जहाजातून पुन्हा प्रवासास निघाले. त्यांची व्हेनिशियन पत्नी मत्तीआ हिच्यावरून त्यांनी जहाजाला मॅथ्यू हे नाव दिले होते. आयर्लंडला वळसा घालून पुढे ते उत्तरेच्या आणि त्यानंतर पश्चिमेच्या दिशेने गेले. ५२ दिवसांच्या प्रवासानंतर २४ जूनच्या सकाळी ते एका भूप्रदेशावर पोहोचले. ते ठिकाण नक्की कोणते हे निश्चितपणे सांगता येत नाही. ते ठिकाण म्हणजे केप ब्रिटॉन बेट असावे, असे मानले जाते. कदाचित ते नोव्हास्कोशिया बेट किंवा न्यू फाउंडलंड बेट असण्याची शक्यता आहे. कॅबट यांना मात्र आपण आशियाच्या ईशान्य किनाऱ्यावर पोहोचलो असल्याचा चुकीचा ग्रह झाला होता. इंग्लंडच्या राजासाठी म्हणून त्यांनी त्या प्रदेशावर इंग्लिश आणि व्हेनिशियन असे दोन्ही ध्वज फडकावले. या सफरीत तेथील किनाऱ्यावरून फिरत असताना आढळलेल्या वेगवेगळ्या भूप्रदेशांना त्यांनी वेगवेगळी नावे दिली. उदा., केप डिस्कव्हरी, सेंट जॉन बेट, सेंट जॉर्जेस केप, ट्रिनिटी बेटे, इंग्लंड्स केप. सांप्रत हे भूप्रदेश अनुक्रमे केप नॉर्थ, सेंट पॉल बेट, केप रे, सेंट पिअरी व मिक्वेलॉन, केप रेस असावेत. हे सर्व भूप्रदेश कॅबट सामुद्रधुनीतील आहेत. न्यू फाउंडलंड आणि केप ब्रिटॉन या दोन बेटांच्या दरम्यान असलेल्या सामुद्रधुनीला जॉन कॅबट यांच्या नावावरून कॅबट सामुद्रधुनी हे नाव देण्यात आले आहे. सेंट लॉरेन्स आखात आणि अटलांटिक महासागर (Atlantic Ocean) यांना जोडणारी ही सामुद्रधुनी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्ग या सामुद्रधुनीतूनच जातो. तेथील भूप्रदेशांवर वस्ती असल्याची काही चिन्हे दिसली. उदा., प्राणी पकडण्यासाठीचे सापळे, मासे पकडण्याची जाळी, विणकामाची साधने इत्यादी; परंतु प्रत्यक्षात तेथे लोक दिसले नाहीत. केप रेसपासून कॅबट हे परतीच्या प्रवासास निघाले आणि ६ ऑगस्ट १४९७ रोजी ब्रिस्टलला पोहोचले. त्यांच्या या प्रवासाच्या वृत्तांतानुसार त्यांनी पाहिलेला भूप्रदेश अतिशय सुंदर होता. तेथील हवामान समशीतोष्ण स्वरूपाचे असून सभोवतालचा सागरी प्रदेश माशांच्या बाबतीत समृद्ध आहे. तो प्रदेश ताब्यात आल्यास इंग्लंडचे माशांसाठी आइसलँडवर असलेले अवलंबित्व संपुष्टात येईल, असा कयास होता.
पहिल्या सफरीवरून परत आल्यानंतर राजाने त्यांना १० पौंडांचे बक्षीस आणि दरमहा २० पौंड निवृत्तिवेतन जाहीर केले. इंग्लंडमध्ये परतल्यावर त्यांचे भव्य स्वागत होत असतानाच त्यांनी कॅनडाकडील दुसऱ्या सफरीवर जाण्याबद्दलची घोषणा केली. पहिल्या सफरीत आपण ज्या-ज्या ठिकाणी गेलो होतो. त्या-त्या ठिकाणी परत जायचे. त्यानंतर तेथून पुढे मसाल्याचे पदार्थ आणि मूल्यवान रत्नांसाठी प्रसिद्ध असलेल्या जपानला पोहोचेपर्यंत पश्चिमेच्या दिशेने प्रवास करायचा, असा या योजनेचा मानस त्यांनी स्पष्ट केला. डिसेंबर १४९७ मध्ये त्यांनी राजासमोर दुसऱ्या सफरीच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. राजाने त्यांच्या योजनेस सहमती दिली. ३ फेब्रुवारी १४९८ रोजी कॅबट यांना राजाकडून दुसऱ्या सफरीसाठीचे एकस्व मिळाले. मे १४९८ मध्ये बहुधा पाच जहाजे आणि २०० लोकांसह ते दुसऱ्या सफरीवर निघाले. सफरीच्या सुरुवातीलाच त्यांचे एक जहाज खराब झाल्यामुळे ते आयर्लंडच्या किनाऱ्यावरच नांगरावे लागले. त्यानंतर त्यांच्या सफरीचे पुढे नेमके काय झाले, याचा पत्ताच लागला नाही. त्याबद्दल अनेक तर्क-वितर्क केले जातात. त्यांच्या ताफ्यातील जहाजांना तीव्र वादळाचा तडाखा बसून त्यातच त्यांचे निधन झाले असावे. अनुमानिक पुराव्यांवरून त्यांची सफर उत्तर अमेरिकेपर्यंत पोहोचली असावी. या सफरीत ग्रीनलंडच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्याचे समन्वेषण करून ते बफीनलँड, लॅब्रॅडॉर व न्यूफाउंडलंडपर्यंत पोहोचले असावे, अशीही एक शक्यता सांगितली जाते. स्पॅनिश पुराव्यानुसार एक इंग्लिश जहाज कॅरिबीयन समुद्रापर्यंत पोहोचले होते. दुसरी शक्यता वर्तविली जाते की, त्यांच्या सफरीतील काही लोक इतर जहाजांनी परत आले; परंतु कॅबट हे ज्या जहाजावर होते, ते जहाज परत आले नाही. परत आलेल्या व्यक्तींना कॅबट यांचे जहाज कुठे, केव्हा आणि कसे अदृष्य झाले, याचा पत्ताच लागला नाही. कॅबट हे मृत्यू पावल्याचे अधिकृत वृत्त १४९९ मध्ये जाहीर करण्यात आले.
https://youtube.com/watch?v=pJOvmicAGjwकॅबट यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या प्रवासाच्या अचूक माहितीबाबत इतिहासतज्ज्ञ आणि मानचित्रकार यांच्यात अद्याप साशंकता आहे. त्यांच्या प्रवासाच्या वेगाबद्दलही अनेक तज्ज्ञ शंका घेतात. असे असले, तरी कॅबट यांच्या सफरींमुळे उत्तर अटलांटिक महासागरातून उत्तर अमेरिका खंडाकडे जाण्यासाठी जवळच्या सागरी मार्गाचा शोध लागल्याचे मानले जाते. कॅबट यांच्या शोधामुळेच ब्रिटिशांना पुढील काळात कॅनडाच्या भूप्रदेशावर आपला हक्क सांगण्यासाठी आणि तेथे ब्रिटिश वसाहती स्थापन करण्यासाठी विशेष फायदा झाल्याचे मानले जाते. प्रसिद्ध मार्गनिर्देशक, समन्वेषक आणि मानचित्रकार सीबॅस्चन कॅबट (Sebastian Cabot) हे जॉन कॅबट यांचा मुलगा असून तो त्यांच्या पहिल्या सफरीत सहभागी असल्याची शक्यता आहे.
समीक्षक – अविनाश पंडित