हा पक्षिवर्गाच्या कॅझुअॅरिफॉर्मिस (Casuariiformes) गणातील ड्रोमॅइडी (Dromaiidae) कुलातील पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव ड्रोमेयस नोव्हीहॉलँडिई (Dromaius novaehollandiae) असे आहे. हा पक्षी मूळचा ऑस्ट्रेलियातील असून उघड्या मैदानी प्रदेशात तो राहतो. एमू पक्ष्याचे लहान कळप असून बहुधा एका कुटुंबातले पक्षी एका कळपात राहतात. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर, दक्षिण-पूर्व आणि दक्षिण-पश्चिम भागांत याच्या तीन जाती आढळून आल्या आहेत. परंतु टास्मानिया, किंग बेट आणि कांगारू बेट येथील एमूच्या जाती लुप्त झाल्या आहेत.
एमू हा शहामृगानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्षी असून याची उंची १·५–१·८ मी. व वजन ३६–४० किग्रॅ. असते. डोक्यावर आणि मानेच्या वरच्या भागावर विस्कटल्यासारखे विरळ केस असतात. पिसे दुहेरी असून पिसारा तपकिरी किंवा तपकिरी छटा असलेल्या काळ्या रंगाचा असतो. नैसर्गिक अधिवासाप्रमाणे पिसाऱ्याच्या रंगात विविधता आढळून येते. एमूला शेपूट नसते. बहुतेक पक्ष्यांना शिश्न नसते. परंतु, एमूसारख्या न उडणाऱ्या मोठ्या पक्ष्यांना शिश्न असते.
याच्या पंखांमधील हाडांचा ऱ्हास झालेला असून त्यांचे फक्त अवशेष असतात. या पक्ष्याला उडता येत नाही, परंतु याचे पाय मजबूत असतात. बहुतेक पक्ष्यांच्या पायांमध्ये गुडघ्याखालील भागात स्नायू नसतात. परंतु, एमूमध्ये पायाच्या पिंढरीत असेलल्या प्रजंघिका (Gastrocnemius) स्नायूमुळे तो ताशी सु. ५० किमी. वेगाने धावू शकतो. आवश्यकतेनुसार तो उत्तम पोहू शकतो. उडता न येणाऱ्या पक्ष्यांचा समावेश रॅटिटी या गटात होतो. उडता न येणाऱ्या पक्ष्यांमध्ये छातीच्या हाडास सुकाणूसारखा भाग म्हणजेच नौतल अस्थी (Keel bone) नसते. एमू पक्ष्याप्रमाणेच शहामृग, कॅसोव्हेरी, किवी इत्यादी उडता न येणाऱ्या पक्ष्यांची उदाहरणे आहेत. पायास तीन बोटे असून नखे टोकदार असतात. तळव्याखाली मऊ गादीसारखा भाग असतो. स्वसंरक्षणाकरिता तो आपल्या पायांनी लाथेचे तडाखे देतो.
गवत, रानफळे, वनस्पतींची मुळे, कोवळी पाने आणि कीटक हे याचे नेहमीचे खाद्य आहे, परंतु याच्या खाद्यपदार्थांत विविधता असल्यामुळे याला सर्वभक्षी असेही म्हणतात. एमू हा सर्वभक्षी असल्यामुळे त्याच्यामार्फत वेगवेगळ्या बियाण्यांचा प्रसार होण्यास मदत होते.
नर आणि मादी दिसायला सारखेच असतात,परंतु त्यांच्या आवाजात फरक असतो. नराचा आवाज डुकराच्या रेकण्यासारखा असतो, तर मादीचा आवाज मोठा आणि
घुमणारा डरकाळीसारखा असतो. लहान एमूचा आवाज शीळ किंवा शिट्टी मारल्यासारखा असतो. संकटाची जाणीव झाल्यावर नर व मादी फुत्कारतात. विणीचा हंगाम एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत असतो. या काळात नर झाडाझुडपांखाली एक उथळ खळगा खणून त्यात गवत, पाचोळा इ. दाबून बसवून घरटे तयार करतो. मादी त्यात एक दिवसाआड एक याप्रमाणे गर्द हिरव्या रंगाची ७–९ अंडी घालते. अंडे आकाराने सु. १३ × १४ सेंमी. असून त्याचे वजन ६००–७०० ग्रॅ. असते. अंड्यातून पिले बाहेर येण्यास ५८–६१ दिवसांचा कालावधी लागतो. पिलांचा रंग भुरा असून त्यांवर लांब तपकिरी-काळे पट्टे असतात. पिले दोन वर्षांनी प्रजननक्षम होतात. मादी पहिल्या वर्षी १०–१५ अंडी घालते. प्रत्येक वर्षी हे प्रमाण वाढत जाऊन चौथ्या ते पाचव्या वर्षी ३०–४० अंडी घालते. अंडी उबविण्याचे तसेच पिलांच्या संगोपनाचे काम नरच करतो. अंडी घातल्यानंतर मादी दुसऱ्या नराच्या शोधात इतर कळपात जाते. विणीच्या एका हंगामामध्ये मादी अनेक नरांसोबत जोडी बनवते व अंडी घालते. एमूचे सरासरी आयुर्मान ३० वर्षांचे असते.
एमूपासून मांस, अंडी, पिसे, कातडी ही उत्पादने मिळतात. याचे मांस ९८% चरबीविरहित असून रुचकर आणि पौष्टिक असते. त्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. त्यांच्या मांसात प्रथिने आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात मिळते. एमू्च्या चरबीपासून तेल काढतात. या तेलामध्ये ओलेइक अम्ल, पामिटिक अम्ल, लिनोलिक अम्ल आणि प्रति-ऑक्सिडीकारक (Antioxidant) हे घटक असतात. कोरडी त्वचा, उच्च कोलेस्टेरॉल आणि शरीराची जळजळ (दाह) यांवर हे तेल गुणकारी असून त्याचा सौंदर्यप्रसाधनांतही उपयोग करतात. वंगण म्हणूनही एमूच्या तेलाचा उपयोग केला जातो. एका मादीपासून हंगामात २०–५० अंडी मिळतात. अंड्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असून कोलेस्टेरॉलचे प्रमाण अत्यल्प असते. अंड्याचे आकारमान व त्यातील पोषक घटकांचे प्रमाण तुलनेने कोंबडीच्या अंड्यापेक्षा दहा पट अधिक असते.
एमूच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. कातडे मऊ असल्यामुळे त्यावर कोणताही रंग सहजरित्या बसतो. त्यामुळे त्याचा उपयोग पिशव्या, चपला इत्यादी बनविण्यासाठी होतो. एमूच्या पिसांचा उपयोग सजावटीच्या वस्तूंमध्ये आणि हस्तकलांमध्ये करतात. तसेच याच्या नखांचा उपयोग साखळीमधील पदके (Pendant) तयार करण्यासाठी होतो.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये कांगारू या प्राण्यासोबत एमूच्या चित्राचा समावेश केलेला आहे. तसेच तेथील विविध चलनांवर देखील एमूचे चित्र पहावयास मिळते. ऑस्ट्रेलियामध्ये सन १९३० मध्ये पिकांची नासाडी करणारा पक्षी म्हणून याची मोठ्या प्रमाणावर हत्या केली गेली होती. परंतु सन १९९९ च्या कायद्यानुसार त्यांना आता संरक्षण देण्यात आले. सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे देश एमू संवर्धनात आघाडीवर आहेत. एमू पक्षी भारतीय हवामानाशीही चांगल्या प्रकारे जुळवून घेतात. भारतामध्ये आंध्र प्रदेशात एमूपालनाचे प्रमाण सर्वांत जास्त असून तेथील एका कुक्कुटपालनामध्ये ६,००० एमूंची संख्या नोंदविली गेली आहे. महाराष्ट्रातही पुणे व नाशिक या ठिकाणी एमूपालन मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहे.
पहा : एमूपालन.
https://www.youtube.com/watch?v=89lSw-WuQBg
संदर्भ :
समीक्षक – सुरेखा मगर-मोहिते