चीनमधील विद्यार्थ्यांनी साम्राज्यवादी प्रवृत्तीविरुद्ध ४ मे १९१९ रोजी केलेली एक प्रसिद्ध चळवळ. या चळवळीपूर्वी चीनमध्ये ताइपिंग बंड (१८४८- ६५), बॉक्सर बंड (१८९८-१९००) व  प्रजासत्ताक क्रांती (१९११) अशा चळवळी झाल्या होत्या. प्रजासत्ताक क्रांतीमुळे चीनमधील वंशपरंपरागत व अनियंत्रित मांचू राजवट संपुष्टात आली. मात्र संधिसाधू लष्करशहांमुळे प्रजासत्ताक अपयशी ठरले. पाश्चिमात्य राष्ट्रांनी चीनच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन चीनची आर्थिक लूट सुरू केली. यातूनच ४ मे ची चळवळ सुरू झाली.

बीजिंग येथे मोर्चात सहभागी विद्यार्थी.

१९०५ च्या रशिया-जपान युद्धातील जपानच्या विजयामुळे तसेच पहिल्या महायुद्धातील त्याच्या सरशीमुळे  जागतिक राजकारणात जपानचे महत्त्व वाढले. त्यापूर्वी चीनमध्ये राज्यक्रांती होऊन मांचू राजवटीचा अंत झाला (१९११) व चीनमध्ये लोकशाहीची स्थापना झाली. मात्र त्यामुळे चीनची अंतर्गत परिस्थिती फारशी सुधारली नाही. प्रमुख पाश्चात्त्य राष्ट्रे महायुद्धात गुंतलेली पाहून जपाननेच चीनवर दडपण आणले. चीनकडे अपमानकारक २१ मागण्या केल्या (७ मे १९१५). चीन प्रजासत्ताकाचे अध्यक्ष युआन-शिह-काई यांनी त्या मागण्या मान्य केल्या. आपल्या सरकारला आपली बाजू समर्थपणे मांडता आली नाही, म्हणूनच देशाची अशी मानहानी झाली, असे चिनी जनतेला वाटू लागले. त्यातच त्सिंगटो बंदरही जपानला देण्यात आले. तसेच जपानने लष्करी बळावर शँटुग, दक्षिण मँचुरिया व मंगोलिया या प्रांतांत अनेक हक्क मिळविले. पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीच्या ताब्यात असलेला चीनचा शँटुग प्रांत जपानने जिंकून घेतला होता. महायुद्धानंतरच्या पॅरिस शांतता परिषदेने २२ एप्रिल १९१९ रोजी चीनचा शँटुग प्रांत जपानकडेच राहील असा निर्णय दिला. या सर्व निर्णयांमुळे चीनमध्ये जपानविरोधी संतापाची लाट उसळली. याविरोधात पीकिंग विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचे काम याच विद्यापीठातील प्राध्यापक चेन-तु-स्यु (Chen-Tu-Hsiu) व ग्रंथपाल लि-ता-चाव (Li-Ta-Chao) यांनी केले. विद्यार्थ्यांनी पॅरिस शांतता परिषदेच्या निर्णयाविरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात केली. ‘शँटुग प्रांत देऊ नकाʼ, ‘त्सिंगटो बंदर वाचवाʼ, ‘जपानी मालावर बहिष्कार टाकाʼ, ‘जपानला नेस्तनाबूत कराʼ अशा घोषणा विद्यार्थी देऊ लागले.

जपानने केलेल्या २१ मागण्यांच्या निषेधार्थ ७ मे १९१९ हा दिवस देशभर ‘राष्ट्रीय मानहानी दिनʼ म्हणून साजरा करायचे ठरले. ३ मे १९१९ रोजी सायंकाळी लॉ स्कूलच्या सभागृहात सु. १००० विद्यार्थी जमले. येथे यी. के. नी. या विद्यार्थ्याच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेमध्ये जपानधार्जिण्या त्साओ-ज्यू-लीन, चांग-त्सुंग, लु-त्सुंग-यु या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. ७ मेपर्यंत वाट पाहण्यास विद्यार्थी तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मेला देशभर आंदोलन करण्याची मागणी अनेकांनी केली.

मे चळवळीचे स्मारक, डाँगचेंग (बीजिंग).

३ मेच्या रात्रभर पीकिंग विद्यापीठ परिसरात आंदोलनाबाबत हालचाली चालू होत्या. ४ मे रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थी-प्रतिनिधींची बैठक झाली. तीत पीकिंग (बीजिंग) शहरात जाहीर सभा घ्याव्यात, निषेध मोर्चा काढावा, कायम विद्यार्थी संघर्ष समिती स्थापन करावी, असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. निषेध मोर्चा मुद्दाम परकीय वकिलातीसमोरून जावा, असे ठरविण्यात आले. दुपारपर्यंत सु. ३००० विद्यार्थी तिआन प्रवेशद्वाराजवळ जमले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याच्या हजारो प्रती वाटल्या होत्या. जपानधार्जिण्या अधिकाऱ्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा घेऊन विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला. मोर्चा जसजसा पुढे जात होता तसतशी गर्दी वाढू लागली. लिगेशन क्वार्टर्स हा भाग पीकिंग शहरातील परकीय वकिलातीचा भाग होता. इथपर्यंत मोर्चा शांततेत आला. मात्र परकीय वकिलातीसमोर पोलीसदलाने मोर्चा रोखला. त्यामुळे परिस्थिती चिघळली. विद्यार्थ्यांनी त्साओ-ज्यू-लीन या अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला केला. चांग-त्सुंगला घराबाहेर खेचून बेदम मारहाण करण्यात आली. शेवटी पोलिसांनी निदर्शकांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या कुओचीन-कुआंग या विद्यार्थी-नेत्याचा चार दिवसांनी मृत्यू झाला. त्यामुळे पीकिंग शहरात मोठी दंगल उसळली. या चळवळीत कामगार व सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेवटी पीकिंग सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. जपानधार्जिण्या अधिकाऱ्यांना काढून टाकावे लागले.

४ मेच्या या चळवळीमुळे चीनवर दूरगामी परिणाम घडून आले. ही चळवळ साम्राज्यवादी प्रवृत्तीविरुद्धची चिनी विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी प्रतिक्रिया होती. या चळवळीने चीनमधील साम्यवादी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. असे असले, तरी या चळवळीचे वर्णन ‘बौद्धिक व सामाजिक-राजकीय चळवळʼ असे करावे लागते.

संदर्भ :

  • Hsu, Immanuel C. Y. The Rise of Modern China, Fourth Edition, New York, 1990.
  • देव, प्रभाकर, आधुनिक चीनचा इतिहास, नागपूर, १९९१.
  • जोशी, पी. जी. आधुनिक जग, नागपूर, २०००.

 समीक्षक – अरुण भोसले

प्रतिक्रिया व्यक्त करा