ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस ही ऑस्ट्रॅलोपिथेकस पराजातींमधील सर्वांत अगोदर उत्क्रांत झालेली प्रजात. या प्रजातीचे जीवाश्म ४२ ते ३९ लक्षवर्षपूर्व या काळातील असून ती सर्वसाधारपणे आर्डीपिथेकस रमिडस या प्रजातीची समकालीन (४४ ते ४२ लक्ष वर्षपूर्व) होती. ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस या प्रजातीचा उगम ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिसपासून झाला, असे मानले जाते.
हार्व्हर्ड विद्यापीठातील ब्रायन पॅटरसन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांना केनियात कनापोय (Kanapoi) येथे १९६५ मध्ये हाताच्या ह्यूमरस या हाडाचा एक जीवाश्म (केएनएम-केपी-२७१) मिळाला; परंतु या एकाच जीवाश्मावरून निश्चित अनुमान काढता आले नव्हते. ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ मेव्ह लिकी यांच्या नेतृत्वाखालील पुरामानवशास्त्रज्ञांना १९९४ मध्ये तेथेच याच प्रकारचे अनेक दात आणि हाडे मिळाली. त्यांनी या होमिनिन प्रजातीचे ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस असे नामकरण केले. स्थानिक तुर्काना भाषेत ‘अनामʼ या शब्दाचा अर्थ ‘तळेʼ असा आहे. कनापोयखेरीज जवळच आलिया बे आणि सिबोलोत या ठिकाणी या प्रजातीचे अनेक जीवाश्म मिळाले. केएनएम-केपी-२९२८१ (अधिकृत नमुना), केएनएम-केपी-२९२८३ आणि केएनएम-केपी-२९२८५ हे या प्रजातीचे महत्त्वाचे नमुने आहेत.
अमेरिकन पुरामानवशास्त्रज्ञ टिम व्हाइट व त्यांच्या सहकाऱ्यांना या प्रजातीचे जीवाश्म इथिओपियातील मध्य अवाश भागात माका (Maka) आणि असा इसी (Asa Issie) येथे आढळले (२०००-२००६). ही ठिकाणे आर्डीपिथेकस रमिडस जीवाश्म मिळालेल्या जागेपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहेत.
ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस प्रजातीचे प्राणी सर्वसाधारणपणे चिंपँझींच्या आकाराचे होते. त्यांचे वजन अंदाजे ४७-५८ किग्रॅ. इतके असावे. त्यांच्या मेंदूचा आकार छोटा असावा; परंतु त्याविषयी पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. त्यांचे जबडे काहीसे अरुंद परंतु दणकट असून दातांवर इनॅमलचे (दातांचे लुकन) जाड आवरण होते. त्यावरून हे होमिनिन प्राणी खूप कठीण कवच असणारे अन्न खात असावेत. त्यांच्या दातांची रचना वनस्पती खाण्यासाठी होती, हे स्पष्ट दिसते. हे प्राणी प्रामुख्याने सी-३ (C3) प्रकारच्या वनस्पती खात असले, तरी काही प्रमाणात त्यांच्या आहारात सी-४ (C4) प्रकारच्या वनस्पतींचाही समावेश होता. मनगटाची रचना झाडांमध्ये वावरण्यासाठी अनुकूल होती. परंतु मागच्या पायाच्या टिबिया (Tibia) या हाडावरून हे प्राणी दोन पायांवर चालत होते, असे दिसते.
संदर्भ :
- Leakey, M. G.; Feibel, C. S.; McDougall, I.; Ward, C. & Walker, A. ‘New specimens and confirmation of an early age for Australopithecus anamensisʼ, Nature : 393, pp. 62-66, 1998.
- Ward, C.; Leakey, M. & Walker, A. ‘The new hominid species Australopithecus anamensisʼ, Evolutionary Anthropology : 7, pp. 197-205, 1999.
- White, T. D.; Suwa, G.; Simpson, S. & Asfaw, B. ‘Jaws and teeth of Australopithecus afarensis from Maka, Middle Awash, Ethiopiaʼ, American Journal of Physical Anthropology : 111, pp. 45-68, 2000.
समीक्षक – शौनक कुलकर्णी