काही प्राणी जैव संचयनाचा उपयोग स्वत:च्या संरक्षणासाठी करतात. हे प्राणी विषारी वनस्पती व प्राणी खाऊन शरीरात विष जमा करतात आणि त्याचे विशिष्ट पद्धतीने प्रदर्शन करून शत्रूला पळवून लावतात. तंबाखूवरची शिंग अळी (सुरवंट) तंबाखूची पाने खाऊन त्यातील निकोटीन आपल्या शरीरात साठविते. ही शिंग अळी भक्षकाने खाल्ली की त्याच्या शरीरात विष जमा होऊन तो बाधित होतो.
अन्नसाखळीतील पहिल्या स्तरावरील भक्षकाने विषारी पदार्थांचे संचयन केले की, त्याच्या वरच्या स्तरावरील प्राण्यात ते विष संक्रमित होते आणि त्याला विषबाधा होते. काही वेळा अविषारी सेंद्रिय पदार्थ शरीरात साठविले जातात. त्यांचे प्रमाण वाढले की विषबाधा होण्याची शक्यता असते. उदा., अ जीवनसत्त्व मांसाहारी प्राण्यांच्या यकृतात साठले जाते. ध्रुवीय अस्वले मोठ्या प्रमाणात अ जीवनसत्त्व यकृतात साठविणाऱ्या सील प्राण्यांना खाऊन गुजराण करतात. हे अ जीवनसत्त्व ध्रुवीय अस्वलाच्या यकृतात संक्रमित होते. ध्रुवीय प्रदेशातील स्थानिक लोकांच्या हे लक्षात आल्यावर अस्वलाचे यकृत खाण्याचे ते टाळू लागले; परंतु उत्तर ध्रुवावर येणाऱ्या पर्यटक किंवा अन्य जणांना हे माहीत नसल्यामुळे ते ध्रुवीय अस्वलाचे यकृत खातात. त्यांच्या शरीरात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढल्यामुळे ते बाधित होतात. जपानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेकून दिलेल्या बॅटऱ्यातील पारा माशांच्या शरीरात साचत गेला. असे मासे तेथील लोकांनी खाल्ल्यामुळे त्यांना मिनामाटा आजार झाला होता.
समुद्रकिनाऱ्याजवळील पाण्यात सापडणारा टोडफिश तसेच अटलांटिक पफीन नावाचा समुद्रपक्षी यांच्या शरीरात पाऱ्यासारखा जड धातू जमा होतो. या जड धातूसाठी त्या दोन सजीवांचे निरीक्षण केले जाते. काही जलीय परिसंस्थेत प्रदूषकांची तीव्रता काही प्रमाणात त्या परिसंस्थेत वाढणाऱ्या शैवाल आणि जीवाणूंनी संचयित केलेल्या सेंद्रिय रसायनांमुळे कमी होते, असेही आढळूून आले आहे.
फेल्ट हॅट तयार करताना धागे ताठ राहावेत म्हणून त्यांवर पाऱ्याची प्रक्रिया केली जाते. त्या वेळी मिथिल मर्क्युरी तयार होते. हे संयुग मेदात विरघळत असल्यामुळे हळूहळू ते साचत जाते आणि कालांतराने पाऱ्याची विषबाधा फेल्ट हॅट तयार करणाऱ्या कामगारांना होते. टेट्राएथिल लेड आणि डीडीटी ही संयुगे मेदविद्राव्य आहेत. ही रसायने शरीरातील मेदात साठली जातात. जेव्हा उर्जेसाठी मेद ऊतींचा वापर होतो तेव्हा रक्तप्रवाहात टेट्राएथिल लेड मुक्त होऊन तीव्र विषबाधा होते.