होल्मस्ट्रॉम, बेंग्ट रॉबर्ट (Holmström Bengt Robert) : (१८ एप्रिल १९४९). ख्यातकीर्त फिनी-अमेरिकन अर्थतज्ज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. होल्मस्ट्रॉम यांना २०१६ मध्ये उभयतांच्या करार उपपत्ती (Contract Theory) कार्यपद्धतीबद्दल प्रसिद्ध ब्रिटीश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ ऑलिव्हर हार्ट (Oliver Hart) यांच्यासोबत अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
होल्मस्ट्रॉम यांचा जन्म सुशिक्षित कुटुंबात हेलसिंकी, फिनलंड येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावीच झाले. १९७२ मध्ये त्यांनी गणित व विज्ञान या विषयांत हेलसिंकी विद्यापीठातून बी. एस. ही पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाऊन १९७५ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी विश्लेषण या विषयात एम. एस. आणि १९७८ मध्ये अर्थशास्त्र या विषयात पीएच. डी. या पदव्या प्राप्त केल्या. पुढे १९७९ – १९८२ या काळात त्यांनी अमेरिकेतच नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात ‘केलॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ या विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. त्यानंतर १९८३ – १९९४ या काळात ते येल विद्यापीठात स्कूल ऑफ मॅनेजमेंट या विभागात एडविन जे. बिनेके प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९९४ पासून तो ‘मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (M. I. T.) या प्रसिद्ध संस्थेत अर्थशास्त्र या विषयाचे पॉल ए. सॅम्युएल्सन प्राध्यापक म्हणून अध्यापन व संशोधन करीत आहेत. त्याचप्रमाणे ते आल्टो विद्यापीठाच्या संचालक मंडळाचा सदस्य म्हणूनही काम पाहत आहेत. १९९९ – २०१२ या काळात ते नोकिया कंपनीच्या संचालक मंडळाचा सदस्य होता.
वादग्रस्त हितसंबंधांची उकल करण्यासाठी संशोधनांती प्रस्थापित केलेल्या करार सिद्धांताचा विधायक उपयोग होऊ शकतो, हे होल्मस्ट्रॉम यांनी सामाजिक जीवनातील अनेक घटनांद्वारे दाखवून दिले आहे. मूलत: कोणताही करार हा सहकार्य व विश्वासावर आधारित असतो आणि त्याचे उल्लंघन झाल्यास तो करार संपुष्टात येतो, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले; कारण करार उपपत्तीच्या संदर्भात विशिष्ट परिस्थिती व तीमधून उद्भवणाऱ्या समस्या या महत्त्वाच्या असतात. होल्मस्ट्रॉम यांनी या संदर्भात १९८१ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध सादर केले असून करार उपपत्ती कार्यपद्धतीचे फायदे-तोटे व परिणाम यांचे तपशीलवार विवेचन व विश्लेषण केले आहे. याशिवाय अनेकांचे सुसंघटित कार्य यावर भर दिला आहे. एक संघटित समूह म्हणून होणारी कामगिरी आणि एकल कामगिरी यांवरच प्रोत्साहन भत्त्याचे स्वरूप ठरते, असे ते म्हणतात. विमा हा आपत्कालीन परिस्थितीत साथ देतो; पण त्यामुळे माणूस निष्काळजी बनतो, तसेच तो नैतिक अध:पतनास कारणीभूत ठरतो, असे त्यांची उपपत्ती सांगते. विमा व प्रोत्साहन भत्ता हे वेतनकरारात महत्त्वाचे असले, तरी वेतनासाठी कौशल्य हे महत्त्वाचे असते. कौशल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन भत्त्याची संकल्पना कंपनीच्या कार्यपद्धतीत प्रविष्ट झाली आहे.
मोबदल्याच्या स्वरूपाची अधिक चिकित्सा करताना होल्मस्ट्रॉम यांनी प्रभावी प्रेरणा आणि संतुलित प्रेरणा यांच्या परिणामांचा अभ्यास केला. त्यांच्या मते सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीत व्यवस्थापकाचे वर्तमानकाळातील वर्तन वर्तमानकालीन संपादनाशी निगडित असेलच, असे नाही. याउलट, भविष्यकाळातील अधिक वेतनाच्या ईर्षेने आणि कारकीर्द अधिक वृद्धिंगत करण्यासाठी व्यवस्थापक अधिक जोमाने काम करतात, असे दिसून येते. म्हणजेच मोबदल्याचे स्वरूप करिअरच्या प्रेरणेशी अधिक संबंधित असू शकते. कार्यकारी अधिकारी एकाच वेळी अनेक प्रकारची कामे करीत असतात. मालकाच्या दृष्टीने यांतील काही कामांचे स्वरूप नीटपणे न उमगणारे असते. अशा वेळी कामासाठी अधिकाऱ्यांना बक्षिसी दिली जातेच, असे नाही. ज्या ठिकाणी अधिकारी बहुविध कार्ये करीत असतात, त्या ठिकाणी त्यांना स्थिर वेतन देऊन त्यांच्या विविध कार्यांचा अधिक चांगल्या आणि समतोल प्रकारे उपयोग केला जातो. होल्मस्ट्रॉम यांच्या बहुविध कार्यप्रतिमांचा नोकरीचे स्वरूप आणि पर्याप्त नुकसानभरपाईचे उद्दिष्ट या व्यवहार्य गोष्टी समजण्यासाठी अधिक उपयोग झाला. अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करार कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन झाले. आदर्शवादी करार करण्याच्या प्रक्रियेत अनेक व्यावहारिक अडचणी असतात. उदा., कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे किंवा योगदानाचे स्वरूप न समजल्यामुळे पर्याप्त मोबदला नेमका किती, हे ठरविणे कठिण जाते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या करारांच्या तरतुदींमध्ये अधिकाऱ्यांच्या बहुविध कार्यातील सर्वच योगदानाचे प्रतिबिंब समाविष्ट होईलच, असे नाही. अशा वेळी जो करार होईल तो पर्याप्ततेच्या दृष्टीने अपूर्ण करार असेल, अशा स्वरूपाची मांडणी होल्मस्ट्रॉम यांनी केलेली आहे.
होल्मस्ट्रॉम यांचे अ नोट ऑन पोलूशन कंट्रोल (१९७८), डिझाइन ऑफ इन्सेंटिव्ह स्कीम्स ॲण्ड द न्यू सोव्हिएट इन्सेंटिव्ह मॉडेल (१९७९) व इनसाइड अँड आउटसाइड लिक्विडिटी (२०११ – सहलेखक) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे मॉरल हॅझर्ड अँड ऑब्झर्व्हरबिलिटी (१९७९), मॉरल हॅझर्ड इन टीम्स (१९८२), इक्विलिब्रियम लाँग टर्म लेबर कॉन्ट्रॅक्ट्स (१९८३), मल्टिटास्क प्रिन्सिपल – एजंट ॲनालिसिस : इन्सेंटिव्ह कॉन्ट्रक्ट्स, असेट ओनरशिप अँड जॉब डिझाइन (१९९१ – सहलेखक), दि फर्म ॲज ॲन इन्सेंटिव्ह सिस्टिम (१९९४), मॅनेजरियल इन्सेंटिव्ह प्रॉब्लेम्स : ए डायनॅमिक परस्पेक्टिव (१९९९) हे लेख प्रसिद्ध आहेत.
होल्मस्ट्रॉम यांना नोबेल पुरस्कारव्यतिरिक्त त्याच्या अर्थशास्त्रातील संशोधनकार्याबद्दल पुढील सन्मान व पुरस्कार लाभले : अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस् ॲण्ड सायन्सेस, दि इकॉनॉमेट्रिक सोसायटी, अमेरिकन फायनान्स असोसिएशन या संघटनांचा फेलो, रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस व फिनिश अकॅडमी ऑफ सायन्स ॲण्ड लेटर्स या संस्थांचा परदेशस्थ सदस्य, दि इकॉनॉमेट्रिक सोसायटीचे अध्यक्षपद (२०११), स्टॉकहोल्म स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, स्वीडन, युनिव्हर्सिटी ऑफ वासा व हेन्केन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, फिनलँड या विद्यापीठांनी प्रदान केलेली सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी, बँक द फ्रान्स-टीएसई सीनिअर प्राइझ (२०१२), वित्तीय अर्थशास्त्र या विषयातील स्टीफन ए रॉस आणि नावीन्यपूर्ण संख्यात्मक पद्धती (इनोव्हेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अप्लिकेशन) लागू करण्याबद्दल शिकागो मर्कंटाइल एक्सचेंज एमएसआरआय प्राइस (२०१३) इत्यादी.
दृकश्राव्य दुवा : https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2016/holmstrom/prize-presentation/
समीक्षक – ज. फा. पाटील