घरमाशीसारखा एक कीटक. त्सेत्से माशीचा समावेश कीटकांच्या डिप्टेरा गणाच्या ग्लॉसिनिडी कुलातील ग्लॉसिना प्रजातीत होतो. तिचे शास्त्रीय नाव ग्लॉसिना टॅबॅनिफॉर्मिस आहे. तिला टिक-टिक माशी असेही म्हणतात. आफ्रिका खंडाच्या सहारा आणि कलहारी प्रदेशांतील रुक्ष व खुरट्या गवताच्या मैदानांचा भाग, नद्यानाल्यांच्या शेजारचा भाग आणि दाट वृक्षांची वने अशा वेगवेगळ्या अधिवासात ही माशी आढळते. त्सेत्से माशीच्या एकूण २३ जाती आहेत. मनुष्य आणि इतर सस्तन प्राण्यांच्या रक्तावर ती जगते.
त्सेत्से माशीच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. शरीराची लांबी ०.५–१.५ सेंमी. असते. डोके किंचित मोठे असते. त्यावर एकमेकांपासून अलग असे डोळे असतात. त्यांच्या स्पृशांची लांबी जास्त असून एका बाजूला केसांसारख्या अनेक शाखा असल्यामुळे त्यांच्या स्पृशा घरमाशीच्या स्पृशाहून वेगळ्या असतात. मुखांगे डोक्याच्या खालच्या बाजूला असलेल्या एका उंचवट्यापासून निघतात. मुखांगे पुढच्या बाजूला वळलेली असतात. सोंड आकाराने मोठी असते. त्सेत्से माशीला ओळखण्याची विशेष खूण म्हणजे विश्रांती घेताना तिचे पंख उदर भागावर एकावर एक असे मिटलेले असतात. उदर भाग हा रुंद असून त्याची लांबी पंखांच्या लांबीपेक्षा कमी असते; परंतु उदरात अळी असताना त्याची लांबी जास्त भरते. माशीच्या गर्भाशयाचा आकार वाढत्या अळीला सामावण्यासाठी मोठा असतो.
त्सेत्से माशी एका वेळी एकाच अंडाचे फलन करते आणि त्यापासून झालेल्या अळीला स्वत:च्या गर्भाशयात ठेवते. अळीचे पोषण गर्भाशयाद्वारे स्रवलेल्या दुधासारख्या स्रावाने होते. अळीच्या तिसऱ्या अवस्थेत ती बाहेर टाकली जाते आणि अळी आपले स्वतंत्र जीवन सुरू करते. ती मातीत घुसते आणि शरीरावर एक कठीण कवच तयार करून कोशावस्थेत जाते. या अवस्थेत तिचे रूपांतरण होऊन तिला प्रौढावस्था प्राप्त होते. यास २०–३० दिवस लागतात. या काळात अळी मातेपासून तिला मिळालेल्या पोषक द्रव्यांवर जगते. मादीच्या उदरातून बाहेर आलेल्या अळीचे प्रौढात रूपांतर होईपर्यंत ती इतर कोणताही आहार घेत नाही.
मनुष्य आणि पाळीव प्राण्यांना होणाऱ्या ट्रिपॅनोसोमासिस या आजाराला कारणीभूत असणाऱ्या ट्रिपॅनोसोमा या परजीवीचा प्रसार त्सेत्से माशीमार्फत होतो. हा परजीवी बाधित व्यक्तीच्या रक्तात असतो. असे रक्त त्सेत्से माशीने तिच्या सोंडेने ओढून घेतल्यानंतर ती जेव्हा निरोगी व्यक्तीचे किंवा जनावराचे (आश्रयीचे) रक्त शोषून घेते, तेव्हा हे ट्रिपॅनोसोमा परजीवी निरोगी व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या रक्तात प्रवेश करतात. अशा प्रकारे निरोगी व्यक्तीला रोगाची लागण होते. या रोगाचे लक्षण म्हणजे रोगग्रस्त आश्रयीला झोप येत नाही. या आजाराला निद्रारोग (स्लीपिंग सिकनेस) म्हणतात. मुळात हा आजार गंभीर नाही. मात्र, बाधित व्यक्तीला दुसरा आजार झाल्यास त्याचे स्वरूप गंभीर बनते.
निद्रारोग या आजाराचे नियंत्रण आणि निर्मूलन करण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत; परंतु त्सेत्से माशीचे समूळ उच्चाटन करणे शक्य झालेले नाही. विकसनशील समाज, शेतीवर आणि पशुधन यांवर त्याचे अवलंबित्व, परिसरातील वनस्पती-प्राणी यांच्याशी लोकांचे असलेले संबंध अशा गुंतागुंतीच्या बाबींमुळे या माशीचे उच्चाटन शक्य होत नाही. मात्र, या माशीवर नियंत्रण राखण्याचे प्रयत्न झाले आहेत. या नियंत्रणामध्ये कीटकनाशकांचा वापर जपून करण्यात येतो. तसेच गडद निळ्या रंगाचे कापडी पिंजरे वापरून या माश्यांना आकर्षित केले जाते. पिंजऱ्यात अडकलेल्या माश्यांना विषारी रसायनांच्या साह्याने मारण्याबरोबर नर माशी पकडून त्यांच्यावर विषारी रसायनांची फवारणी करण्यात येते किंवा गॅमा किरणांचा वापर करून त्यांना प्रजननदृष्ट्या अक्षम करून पुन्हा परिसरात सोडण्यात येते. त्यानंतर निसर्गात त्यांच्या जोड्या जमल्या तरी त्यांचे प्रजनन घडून येत नाही.
त्सेत्से माशी आणि मानव हे प्राणी जीवसृष्टीत वर्गीकरणाच्या दृष्टीने दूरस्थ आहेत. परंतु दोहोंमध्ये कमी अंडांची निर्मिती आणि विमोचन, संख्येने कमी भ्रूण दीर्घकाळ गर्भाशयात ठेवणे, त्यांचे स्रावांद्वारे पोषण करणे यांमधील साम्य मानवासाठी कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे. उत्क्रांतीच्या या प्रकाराला समयोगी (कन्व्हर्जंट) उत्क्रांती म्हणतात.