आयुर्वेदानुसार शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी रस हा प्रथम क्रमांकाचा धातू आहे. येथे रस म्हणजे खाल्लेल्या अन्नावर जाठराग्नीची प्रक्रिया झाल्यानंतर व त्यातून मल निघून गेल्यावर उरलेला सारवान भाग होय. रसधातू हा श्वेत, द्रव, शीत, सौम्य व स्निग्ध असतो. सर्व शरीराची तृप्ती करणे, वाढ करणे, आहे त्या स्थितीत ते टिकवून ठेवणे, स्निग्ध ठेवणे व त्यात दृढता आणणे ही रसधातूची कार्ये होत. शरीर लठ्ठ असणे, कृश असणे किंवा मध्यम असणे यासाठी रसधातू कारणीभूत असतो.
रसधातू आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास इतर धातूंत क्षीणता उत्पन्न होते, चेहरा व शरीराचे अन्य अवयव शुष्क होतात, तहान वाढते. कानांना कुठल्याही प्रकारचा आवाज नकोसा वाटतो. हृदयात कंप किंवा धडधड जाणवते. थोड्याशा श्रमानेही दम लागतो. रसधातू आवश्यकतेपेक्षा वाढल्यास भूक मंदावणे, मळमळणे, तोंडात वारंवार लाळ येणे, वांती होणे, आळस बळावणे, शरीरात जडपणा जाणवणे, शरीर स्पर्श थंड जाणवणे, शरीर पांढरे पडणे, धाप लागणे, खोकला येणे, खूप झोप येणे ही लक्षणे निर्माण होतात. स्तन्य हा रसाचा उपधातू, तर मलस्वरूप कफ हा रसाचा मल सांगितला आहे. सुश्रुताचार्यांनुसार स्त्रियांमध्ये तयार होणारा मासिक स्राव हा देखिल रसापासून बनतो.
ज्यांचा रसधातू उत्कृष्ट असतो, त्यांना रससार किंवा त्वक्सार असे म्हणतात. अशा व्यक्तीचे त्वचेवरील लोम हे स्निग्ध, मृदू, खोलवर मूळ असलेले, कमी प्रमाणात असलेले व न गळणारे असतात. त्वचा सुकुमार, प्रभावी, प्रसन्न व मृदू असते. अशा व्यक्ती आनंदी, सुखी, ऐश्वर्यवान, बुध्दीमान, विद्यासंपन्न, उपभोगी स्वभावाचे, आयुष्यसंपन्न असतात.
पहा : धातु-२, दोषधातुमलविज्ञान, रक्तधातु.
संदर्भ :
- अष्टांग हृदय –सूत्रस्थान, अध्याय ११ श्लोक ७-८, १७.
- सुश्रुत संहिता – सूत्रस्थान, अध्याय १४ श्लोक ३, ६; अध्याय १५ श्लोक ९, १४; अध्याय ३५ श्लोक १६; अध्याय ४६ श्लोक ५२८.
- चरक संहिता – सूत्रस्थान, अध्याय १५ श्लोक ३२; अध्याय १७ श्लोक ७६४.
- चरक संहिता – चिकित्सास्थान, अध्याय १५ श्लोक १७, १८.
समीक्षक – जयंत देवपुजारी