समासांचे प्रकार : दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांचा किंवा अव्ययांचा लोप होऊन जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.जोडशब्द बनविण्याची अथवा एकत्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे तिला समास म्हणतात. पाणिनी व भाष्यकार पतंजलिने समासाचे चार प्रकार सांगितले आहेत –अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीहि.सिद्धान्तकौमुदीत भट्टोजी दीक्षितांनी सुद्धा हेच प्रकार सांगून त्यांच्या उपप्रकारांचा निर्देश केला आहे. उत्तरकालीन परंपरेने समासाचे सहा प्रकार मानले आहेत – अव्ययीभाव,तत्पुरुष, द्वंद्व, द्विगु, बहुव्रीही, कर्मधारय.
(१) अव्ययीभाव – यात अव्यय हे प्रधान असून सामान्यतः पूर्वनिपाताने ते समासात पहिल्या स्थानी येते. म्हणून हा समास पूर्वपदप्रधान असतो. संपूर्ण सामासिकशब्द हा व्याकरणदृष्ट्या अव्यय म्हणूनच राहत असल्याने त्याला अव्ययीभाव अशी संज्ञा आहे. हा समास एकवचनी व नपुंसकलिंगी असतो. उदा. क्रमम् अनुसृत्य – यथाक्रमम् । दिने दिने – प्रतिदिनम् ।,घरोघर,दररोज,यथाक्रम.
(२) तत्पुरुष– हा समास उत्तरपदप्रधान असतो.या समासात दुसरे पद महत्वाचे असते. या समासाचे कर्मधारय, द्विगु, उपपदतत्पुरुष एवढेच उपप्रकार पाणिनीने सांगितले आहेत. परंतु विग्रहाच्या प्रकारानुसार अलिकडच्या काळात विभक्ति तत्पुरुष, प्रादितत्पुरुष, नञ्-तत्पुरुष हे सुद्धा उपप्रकार मानण्यात येतात. समासातील शेवटच्या शब्दानुसार संपूर्ण सामासिक शब्दाचे व्याकरणदृष्ट्या स्थान म्हणजे नाम किंवा विशेषण व लिंग ठरते.
कर्मधारय– सामान्याधिकरण्यात म्हणजे दोन समान विभक्तींत (प्रथमा विभक्तीत) हा समास सोडवला जातो. त्यामुळे त्यांच्यातील विशेषण-विशेष्य, विशेषनाम, उपमान-उपमेय असे संबंध हा समास दाखवतो. समासात विशेषणाला व विशेषनामाला पूर्वनिपात होतो. उदा. नीलं कमलम् – नीलकमलम् । महत् नगरम् – महानगरम् । पुणे नाम नगरम् – पुणेनगरम् । तर उपमेय-उपमान संबंधात दोन्हीपैकी कोणालाही पूर्वनिपात होऊ शकतो. उदा. व्याघ्रः इव नरः – नरव्याघ्रः । मेघः इव श्यामः – मेघश्यामः । विद्या एव धनम् – विद्याधनम् । प्रगतः आचार्यः – प्राचार्यः । शोभना कन्या – सुकन्या ।
द्विगु– संख्यावाचक पदांशी समास झाल्यास तो द्विगु तत्पुरुष समास मानला जातो व संख्यावाचक शब्दाला पूर्वनिपात होतो. हा समास नेहमी एकवचनी असतो. उदा. नवानां रात्रीणां समाहारः – नवरात्रम् । अष्टानाम् अध्यायानां समाहारः – अष्टाध्यायी.
उपपदतत्पुरुष – पाणिनीच्या सूत्रांनुसार उपपदसंज्ञक पदांचा समर्थ शब्दांशी तत्पुरुष समास होतो. हे नित्यसमास असतात. म्हणजे त्यांचे स्वपद-विग्रह होत नाहीत.या समासातील दुसरे पद कृदंत किंवा धातुसाधित असते,त्याचा स्वतंत्रपणे वाक्यात उपयोग होऊ शकत नाही. उदा. कुम्भं करोति – कम्भकारः । येथे ‘कुम्भं करोति’ हा विग्रह नसून अर्थबोध करून देणारे वाक्य आहे. याचप्रमाणे, शास्त्रं जानाति – शास्त्रज्ञः, पङ्कात् जायते – पङ्कजम् । हे सुद्धा उपपदतत्पुरुष समास आहेत.ग्रंथकार,पांथस्थ,गृहस्थ हीसुद्धा काही उदाहरणे आहेत.
विभक्ति तत्पुरुष – त्या त्या कारकांच्या संबंधानुसार द्वितीया ते सप्तमी या विभक्तिंतील शब्दांबरोबर होणाऱ्या समासांना विभक्तितत्पुरुष असे म्हटले जाते. समास होत असताना जो विभक्ती लोप पावतो किंवा विग्रह करताना ज्या विभक्तीचा उपयोग करावा लागतो त्या विभक्तीचे नाव त्या विभक्ती तत्पुरुष समसास देण्यात येते.उदा. कष्टं श्रितः – कष्टश्रितः । भूमिं गतः – भूमिगतः । दैवेन रक्षितः – दैवरक्षितः । कुण्डलाय हिरण्यम् – कुण्डलहिरण्यम् । काकाय बलिः – काकबलिः । सर्पात् भयम् – सर्पभयम् । ऋणात् मुक्तः – ऋणमुक्तः । राज्ञः पुरुषः – राजपुरुषः । कलायां निपुणः – कलानिपुणः ।
नञ्-तत्पुरुष – नकारार्थी अव्यय पूर्वपदी असून त्याचा समर्थ पदाशी समास झाल्यास तो नञ्-तत्पुरुष समास होतो. उदा. न भयम् – अभयम् । न आदरः – अनादरः । नञ्-तत्पुरुष समास ही विशेष संज्ञा अलिकडच्या काळात प्रचलित झाली आहे.
(३) द्वंद्वसमास –यात दोन्ही वा जास्त शब्द तुल्यदर्जाचे असतात व ते ‘चकारा’ने म्हणजेच ‘आणि’ या अर्थाने जोडले जातात. थोडक्यात त्यांच्यात एकमेकांशी कारकाचा संबंध नसतो. इतरेतर व समाहार असे द्वंद्वसमासाचे उपप्रकार आहेत.
इतरेतर– यात समासाचे लिंग हे समासातील शेवटच्या शब्दाच्या लिंगानुसार होते. वचन हे समासात असणाऱ्या शब्दांच्या संख्येनुसार एकवचन किंवा बहुवचन असते. रामः च कृष्णः च – रामकृष्णौ । ग्रामाः च वनानि च – ग्रामवनानि । दम्पती(प्रथमा द्विवचन) – जाया च पतिः च । येथे जाया या शब्दाला दम् असा आदेश होऊन ‘दम्पती’ असा समास बनतो.
समाहार– समाहार याचा अर्थ समूह. या समासाच्या विग्रहात दोन्ही पदांच्या आणखी इतरही पदांचा समावेश होतो.त्यामुळे हा समास नेहमीच नपुंसकलिंगी व एकवचनी असतो.उदा.पाऊसपाणी,पैसाअडका तसेच पाणी च पादौ च एतेषां समाहारः – पाणिपादम् ।
एकशेष – एकशेष हा पाच वृत्तींपैकी एक प्रकार असून त्याचा विग्रह द्वंद्व समासाप्रमाणेच होतो. मात्र द्वंद्वाप्रमाणे विग्रहातील सर्व शब्द सामासिक शब्दात येत नाहीत, तर त्यांतील एकच शब्द समासात शिल्लक रहातो. त्यामुळेच पाणिनीय व्याकरणानुसार तो समास नसून त्याला समासाची कार्ये लागू होत नाहीत.अलिकडच्या काळात मात्र त्याला एकशेषसमास असे संबोधले जाऊ लागले. उदा. माता च पिता च – पितरौ ।
(४) बहुव्रीही– समासातील पदांखेरीज अन्यपदार्थाला प्राधान्य असते, तेव्हा हा समास होतो. त्यामुळे संपूर्ण सामासिकशब्द हा विशेषणात्मक असतो. याचे दोन प्रकार आहेत. १. समासातील दोन्ही शब्द विग्रहात एकाच विभक्तीत असल्यास तो समानाधिकरण बहुव्रीही होतो. उदा. विद्या एव धनं यस्य सः – विद्याधनः (गुरुः) । पीतम् अम्बरं यस्य सः – पीताम्बरः (विष्णुः) । २. समासातील दोन्ही शब्द विग्रहात वेगवेगळ्या विभक्तींत असल्यास तो व्यधिकरण बहुव्रीही होतो. उदा. चक्रं पाणौ यस्य सः – चक्रपाणिः (विष्णुः) ।
(५)अलुक् समास – हा स्वतंत्र प्रकार नसून वरील समासांचाच उपप्रकार म्हणता येईल. समास तयार करताना सामान्यपणे विग्रहातील पदांच्या विभक्ति-प्रत्ययांचा लोप होतो. पण कधीकधी विभक्ति-प्रत्ययांचा लोप न होता ते प्रत्यय सामासिक शब्दांतही तसेच राहतात. तेव्हा त्याला अलुक् समास म्हणतात. असे अलुक् समास तत्पुरुष व बहुव्रीही समासान्तर्गत आढळतात. उदा. युधि स्थिरः – युधिष्ठिरः । वाचः पतिः – वाचस्पतिः । कण्ठे कालः यस्य सः – कण्ठेकालः ।
याप्रमाणे समासाचे व त्याच्या विशेष प्रकारांचे विवेचन केले गेले आहे. या सर्व प्रकारांखेरीज पाणिनीच्या अष्टाध्यायीतील सूत्रांच्या योगविभागामुळे सर्वच पदांच्या व क्रियापदांच्या समासाचे सुद्धा सामान्य प्रकार दिसून येतात. अलिकडच्या काळांत त्यांना सुप्-सुप् समास, केवलसमास, इत्यादी संज्ञा दिल्या गेल्या आहेत. पण पाणिनीने मात्र या संज्ञा वापरलेल्या नाहीत. पहा: समास
Key words : #अव्ययीभाव,#तत्पुरुष, #द्वंद्व, #द्विगु, #बहुव्रीही, #कर्मधारय
संदर्भ : १.अभ्यंकर काशिनाथ वासुदेव (संपा.), श्रीमद्भगवत्पतञ्जलिविरचित व्याकरणमहाभाष्य , डेक्कन एज्युकेशन सोसायटी,पुणे, १९६४.२.जोशी,प्र.न.,मराठी व्याकरण,पुणे,१९६३. ४. साठे,म. दा., सिद्धान्तकौमुदी (भट्टोजी दीक्षित म.भा. ),संस्कृत विद्यापरिसंस्था,संस्कृतपाठशाला,पुणे, १९६५.