रूपक: रूपक ह्या शब्दासाठी मराठीत नाटक हा शब्द सर्वसाधारणपणे वापरला जातो. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात ‘रूप’ हा शब्द वापरलेला आहे.रूप व रूपक हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत.’रूप्यते’ म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते ती रूप.’रूप्यन्ते’ म्हणजे अभिनयाने व्यक्त केली जाणारे दृश्य-काव्य. दृश्य-काव्यांना रूप म्हटले जाते. रूप हा चक्षुरिन्द्रियांचा (नेत्र) विषय होय. रूप् म्हणजे पाहणे.पाहणे ह्या धातूपासून रूप हा शब्द व्युत्पन्न झाला आहे. त्याचप्रमाणे काही संस्कृतनाटकांमधील रंगसूचनांमध्ये ‘नाटयति’ ऐवजी ‘रूपयति’ अशा रंगसूचना दिसतात. म्हणजेच रूप् हा धातू ‘अभिनयाने व्यक्त होणे’ ह्या अर्थी देखील वापरलेला दिसून येतो.नाट्यशास्त्रात ‘रूप’ शब्दाचा उपयोग दहा नाट्यप्रकारांच्या संदर्भातच केला आहे.इतर ठिकाणी वाङ्मयप्रकारांचा निर्देश काव्य ह्या शब्दाने केलेला आहे.

रूपकाचे सामान्यतः दहा प्रकार मानले आहेत. ते असे – नाटक, प्रकरण,समवकार, ईहामृग, डिम, व्यायोग,उत्सृष्टिकांक किंवा अंक, प्रहसन, भाण आणि वीथी. ह्या सर्व रूपकप्रकारांचे वर्णन नाट्यशास्त्राच्या १८व्या अध्यायात आलेले आहे.रूपक शब्दाची व्याख्या नाट्यशास्त्रात कोठेही केलेली नाही तसेच कोठेही रूपक असा शब्दप्रयोगही आढळत नाही.त्यात सर्वत्र ‘रूप’ असा शब्दप्रयोग केलेला आढळतो.अठराव्या अध्यायाच्या शेवटीही ‘दशरूपनिरूपण’ असे नामाभिधान आहे.यावरून नाट्यस्वरूप काव्याला प्रारंभी ‘रूप’ अशी संज्ञा होती आणि ‘रूपक’ ही संज्ञा नंतरच्या काळी प्रचारात आली असे लक्षात यायला वाव आहे.

रूपकातील अंकांची संख्या, प्रधान रस, पात्रांचे प्रकार तसेच संधिची संख्या यावरून रूपकाचे प्रकार झालेले दिसतात.एक प्रकारे रूपकांच्या प्रकारांमध्ये संस्कृत नाटयाचा विकास कसा होत गेला याचे प्रतिबिंब पाहायला मिळते.भाण म्हणजे प्रेक्षकांशी एकटया सादरकर्त्याने बोलणे, यापासून ते संपूर्ण दहा अंक आणि पाच संधीनी परिपूर्ण असणारे असे प्रमाणबद्ध, बांधीव कथानक असणारे आणि प्रामुख्याने शृंगार आणि वीर रसाला प्राधान्य देणारे, वेगवेगळया वृत्तींनी युक्त असे रूपकाचे प्रकार टप्प्याटप्प्याने विकसित झाले असावेत. रूपकाच्या प्रकाराप्रमाणे त्यातील पात्रे व त्यांची संख्या बदलते.

नाटक हा रूपकाचा सर्वात विकसित प्रकार आहे तर त्या खालोखाल प्रकरण हा रूपकप्रकार येतो.त्यामुळेच हे दोन रूपकप्रकार सर्वात जास्त लोकप्रिय होते असे दिसते. नाटकाच्या तुलनेत इतर रूपकप्रकारांची हस्तलिखिते फार कमी प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. अश्वघोष आणि भास ह्या दोन नाटककारांनी अभिजात वाङ्मयाच्या सुरूवातीच्या टप्प्यावर वेगवेगळया नाटकाव्यतिरिक्त इतर रूपकप्रकारात रचना केल्याचे दिसते.नाटयदर्पणकारांनी मात्र रूपकांचे बारा प्रकार सांगितले आहेत.

वर उल्लेख केलेल्या दहारूपक प्रकारांव्यतिरिक्त आणखी एका प्रकाराचे म्हणजे नाटिका ह्या प्रकाराचे वर्णन नाट्यशास्त्राच्या अठराव्या अध्यायात येते. मात्र ते वर्णन मागाहून त्यात घातले असावे असे मत आहे. कारण रूपकप्रकारांचा नामनिर्देश असणार्‍या प्रारंभीच्या श्लोकांमध्ये नाटिकेचा समावेश नाही. दशरूपक ह्या आपल्या ग्रंथात धनंजयाने दहा रूपकांबरोबरच नाटिकेचाही विचार केला आहे.अन्यथा नाटिका हा उपरूपकांचा प्रकार मानला जातो.

साहित्यदर्पण ग्रंथात काव्याचे दृश्य आणि श्राव्य असे दोन प्रकार सांगितले आहेत.
दृश्यश्रव्यत्वभेदेन पुनः काव्यं द्विधा मतम्|
दृश्यं तत्राभिनेयं तद्रूपारोपात्तु रूपकम्||(साहित्यदर्पण ६.१)

साहित्यदर्पणात रूप व रूपक ह्या दोन शब्दांमधल्या स्वतंत्र छटा दाखवल्या आहेत.जे बघितले जाते व ज्याचा अभिनय केला जातो ते ‘रूप’ होय. त्या रूपाचा म्हणजे व्यक्तिरेखेचा नटावर केलेला आरोप म्हणजे ‘रूपक’.अग्निपुराणातही उपरूपकांचा उल्लेख सापडतो. साहित्यदर्पणकार विश्वनाथाने अठरा प्रकारच्या उपरूपकांचाही निर्देश केला आहे.त्यात नाटिकेचा अंतर्भाव आहे.ती उपरूपके पुढीलप्रमाणे-

नाटिका त्रोटकं गोष्ठी सट्टकं नाट्यरासभम्|
प्रस्थानोल्लाप्यकाव्यानि प्रेङ्खणं रासकं तथा||
संलापकं श्रीगदितं शिल्पकं च विलासिका|
दुर्मल्लिका प्रकरणी हल्लीशो भाणिकेति च||
अष्टादश प्राहुरूपरूपकाणि मनीषिणः| (साहित्यदर्पण ६.४-६)

नाटिका, त्रोटक, गोष्ठी, सट्टक, नाट्यरासक, प्रस्थान, उल्लाप्य, काव्य, प्रेङ्खण, रासक, संलापक, श्रीगदित, शिल्पक, विलासिका, दुर्मल्लिका, प्रकरणिका, हल्लीश आणि भाणिका ही ती अठरा उपरूपके होत .

संदर्भ – १.कंगले र. पं. दशरूपकविधान(अभिनव भारती टीकेसह मराठी भाषांतर), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९७४. २.रामकृष्ण,कवीमनवल्ली ,नाट्यशास्त्र अभिनवगुप्त टीकेसह, मध्यवर्ती ग्रंथालय, बडोदा,१९२६.

समीक्षक : शिल्पा सुमंत