अक्करमाशी : (१९८४). प्रसिद्ध दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे आत्मकथन. ‘रांडेचा पोर’ आणि ‘अस्पृश्य’ म्हणून शरणकुमार लिंबाळे यांची झालेली उपेक्षा, फरफट या आत्मकथनात मांडलेली आहे. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म हणमगाव, जिल्हा सोलापूर या खेडेगावात झाला. सवर्ण (लिंगायत) वडील आणि अस्पृश्य (महार) आईच्या पोटी ते जन्मले आहेत. समाजव्यवस्थेने त्यांचा जन्मही ‘अक्करमाशी’ अर्थात ‘अनैतिक’ ठरवला.
अत्यंत दारिद्र्यामध्ये शरणकुमार यांचे बालपण गेले. आई झोपडीत तर बाप माडीत, अशी स्थिती होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. टेलिफोन ऑपरेटर, आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून नोकरी करीत अपूर्ण राहिलेले एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे सहाय्यक संपादक म्हणून काम केले. अस्मितादर्श या नियतकालिकातून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. भोवतालच्या दलित, शोषित, श्रमिक आणि स्त्रियांच्या वेदनामय जगण्याला, दुःखाला लिंबाळे यांनी लेखणीद्वारे वाचा फोडली.
अक्करमाशी हे शरणकुमार लिंबाळे यांचे सर्वाधिक गाजलेले व अन्य भाषेत अनुवादित झालेले आत्मकथन आहे. वर्णाधिष्ठीत व्यवस्थेमुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता आणि मानवनिर्मित वंशशुद्धीच्या भ्रामक समजुती यामुळे माणसावर होणाऱ्या अन्यायाचे चित्रण या आत्मकथनात येते. अक्करमाशी म्हणजे अनौरस संतती. समाजमान्य स्त्री-पुरुषसंबंधातून जन्मलेले औरस किंवा बारामासेतर अशा नीतीबाह्य शरीरसंबंधातून जन्मलेले अकरामासे, अशुद्ध असे मानले जाते. बाप लिंगायत आणि आई महार या जातीची असणाऱ्या शरणकुमार यांना लिंगायत आणि महार या दोन्ही जाती दूर लोटतात. रांडेचे पोर म्हणून समाजाकडून कुचेष्टा होते. अस्पृश्यता, दारिद्र्यशोषण आणि अपमानाचे दुःख पचविण्याऱ्या लिंबाळेंना समाजाकडूनही अवहेलना सहन करावी लागते.
अक्करमाशी आत्मकथनाची सुरुवात शाळेच्या सहलीत घडलेल्या प्रसंगाने होते. सवर्ण मुलांच्या डब्यात उरलेले अन्न शरणकुमार फाटक्या कपड्यात बांधून घरी आणतो. हे भुकेचे रौद्र रूप वाचकाला अस्वस्थ करते. मृत जनावरांचे मांस आणि शेणातील ज्वारीच्या दाण्यांची भाकरी खाऊन, दगड फोडणाऱ्या वडाऱ्याची भाकरी चोरून पोटात उसळलेली भुकेची आग शरणला शांत करावी लागली आहे. या आत्मकथनातून येणारे भुकेचे चित्र हेलावून सोडणारे आहे. पोटासाठी शरीर विकणाऱ्या मसामाय, संतामाय, नागी यांचे दुःखही येथे मांडलेले आहे. भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी दलितांना करावा लागणारा संघर्ष लिंबाळे यांनी समर्थपणे रेखाटलेला आहे.
सामाजिक जीवनातील जातीयता, श्रेष्ठ-कनिष्ठता, अवहेलना लिंबाळे यांना अस्वस्थ करून सोडते. प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध आणि जातीअंतर्गत व्यवस्थेविरुद्ध असा दुहेरी पातळ्यांवरचा संघर्ष या आत्मकथनात अभिव्यक्त झाला आहे. साधारण अठ्ठवीस वर्षाचा कालखंड या आत्मकथनात आला आहे. त्यातही स्त्री चित्रणाने या आत्मकथनाचा बराच भाग व्यापलेला आहे. सुंदर रूप आणि पोटाचा दुष्काळ यांच्या शापात बरबाद झालेले स्त्रियांचे आयुष्य लेखकाने मांडले आहे. मसामायच्या चारित्र्याचा संशय घेऊन विठ्ठल कांबळे तुला सोडतो. मुलांपासून ताटातूट होते. ज्याच्यामुळे पराधीन व्हावे लागले त्या हनुमंता पाटलाला शेवटी मसामाय स्वीकारते. त्याची रखेल होऊन राहते. समाज हनुमंता पाटलाला नावे ठेवत नाही, उलट मसामाय व्यभिचारी, अनैतिक ठरते. समाजाचा हा दृष्टिकोन भारतीय स्त्रियांचे भावविश्व उद्ध्वस्त करणारा आहे. स्त्रीकडे भोग्य वस्तू म्हणून समाज पाहतो. संतामाय, चंदामाय, नागी या सर्वच स्त्री व्यक्तिरेखा दलितत्व आणि स्त्रीत्त्वाच्या कचाट्यात सापडलेल्या आहेत. व्यवस्थेने केलेल्या शोषणामुळे त्यांच्या आयुष्याची परवड झालेली आहे.
अक्करमाशी हे आत्मकथन सकृतदर्शनी शरणकुमार लिंबाळे यांचे वाटले तरी ते मसामाय, आप्तस्वकीयांचे आणि भोवतालच्या दिशाहीन माणसांचेही आहे. त्यात आयुष्य, धर्म, जात, माणसाची उत्पत्ती, वंशवृद्धी, नातेसंबंध, स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधाचा अन्वयार्थ याचे सखोल चिंतन आलेले आहे. अनुभवकथनासाठी लिंबाळे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रदेशात बोलल्या जाणाऱ्या महार जातीच्या मराठीचा तसेच ग्रांथिक मराठीचा वापर केला आहे. या आत्मकथनातील शब्द, म्हणी, वाक्यप्रचार विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत. कुठलाही आडपडदा न ठेवता जणू त्यांनी स्वतःच स्वतःला सोलून जगासमोर उभे केले आहे. इतकी धिटाई, इतका रोखठोकपणा आणि स्पष्टता दलित आत्मकथनात अभावानेच जाणवतो.
संदर्भ :
• कुसरे – कुलकर्णी आरती, दलित स्वकथने : साहित्य रूप, विजय प्रकाशन, नागपूर, १९९१.
• नेमाडे भालचंद्र, टीकास्वयंवर, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, २००१.
• मुलाटे वासुदेव, दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, १९९९.