एन्कीच्या राज्यात : एन्कीच्या राज्यात ही विलास सारंग यांची पहिली कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली आहे. सारंग हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वाचे आधुनिक, प्रयोगशील व अस्तित्ववादी धारणेचे लेखक आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत स्वतंत्र लेखन केले आहे. कथा, कादंबरी, काव्य व समीक्षा या प्रकारांत नवनिर्मिती घडवून त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
एन्कीच्या राज्यात ही कादंबरी आधुनिकतेतून निर्माण झालेल्या अस्तित्त्वविषयक प्रश्नांना वाचकाभिमुख करते. एकटेपण, विसंवाद, परात्मभाव, असुरक्षितता, भयग्रस्तता, निरर्थकता, असंगतता या अस्तित्ववादी सूत्रांची गडद छाया या कादंबरीमधून अनुभवास येते. एन्कीच्या राज्यात हे कादंबरीचे शीर्षक प्रतिकात्मक आहे. एन्की हा सुमेरियन लोकांचा देव, हा देव सर्व मानवांवर नियंत्रण ठेवतो अशी तिथल्या लोकांची धारणा आहे. या प्रतीकात्मकतेतून सारंग यांना तिथल्या राजकीय पर्यावरणाचे दिग्दर्शन केले आहे. एन्की देवाप्रमाणे आजही तेथील राजसत्ता सर्वसामान्य माणसांचे वर्तनव्यवहार नियंत्रित करत आहे. आदिम संस्कृतीच्या, दहशतीच्या दाबाखाली तिथला माणूस रुतत चालला आहे. अशा प्रचंड दाबामुळे त्यांची व्यक्तिमत्त्वे आकारित होण्याआधीच खुडली जात आहे. याचे प्रत्ययकारी चित्रण सारंग यांनी या कादंबरीत केले आहे. या कादंबरीचा नायक प्रमोद वेंगुर्लेकर हा आहे. कादंबरीचा बहुतांश अवकाश नायकाच्या इराक देशातील वास्तव्याने व्यापला आहे. त्याला आपल्या स्वओळखीचा (आयडेंटिटी) शोध घ्यायचा आहे. हा शोधच या कादंबरीत केंद्रवर्ती आहे. मात्र तेथील भोवताल यास पोषक नाही. आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी तिथल्या शासनव्यवस्थेने निर्बंध लादले आहेत. तिथल्या राजकीय सत्तेची दडपशाही, हुकूमशाही वृत्ती, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी, निवड या मूल्याला नकार आणि त्यामुळे होणारी नायकाची घुसमट यामुळे त्यास आयडेंटिटीचा शोध थांबवावा लागतो. जेव्हा जेव्हा तो लिहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा असुरक्षित, भयावह वातावरणामुळे परावृत्त होतो. एका वेगळ्या भौगोलिक पर्यावरणाचा आधार घेत सारंगानी ‘स्व’ चा घेतलेला धांडोळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामधून परदेशाचा अवकाश आणि अस्तित्व संघर्षाचा झगडा साक्षात झाला आहे.
या कादंबरीमध्ये सारंग यांनी एकरेषीय, नैसर्गिक कालानुक्रमाच्या आधारे प्रमोदचा जीवनपट साकारला आहे. अशा कथनशैलीमुळे त्यांना कालक्रमानुसार झालेली स्थित्यंतरे, इराकमधील समाज-सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण उजागर करण्यास मदत झाली आहे. तृतीयपुरुषी निवेदकाचा सर्जक वापर करत इराकच्या समाज-सांस्कृतिक पर्यावरणाचा घेतलेला शोध नाविन्यपूर्ण व विचारप्रवृत्त आहे. अशा कथनशैलीमुळे त्यांना परदेशामध्ये घडणाऱ्या घटना-प्रसंगाचे योग्य ते अर्थनिर्णयन करता आले आहे. काहीशी वैचारिकतेकडे झुकणारी त्यांची शैली इराकचा आदिम अवस्थेपासूनचा पट साकारण्यात यशस्वी ठरली आहे.
संदर्भ : सारंग विलास,एन्कीच्या राज्यात, मौज प्रकाशन गृह, मुंबई.