तुष्टी या शब्दाचा शब्दश: अर्थ संतोष व समाधान असा आहे. सांख्यदर्शनामध्येही हा शब्द याच अर्थाने परंतु एक पारिभाषिक संज्ञा म्हणून येतो. सांख्यदर्शनानुसार महत् (बुद्धी) या तत्त्वाचे धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान, वैराग्य, राग, ऐश्वर्य आणि अनैश्वर्य हे आठ भाव आहेत. हे आठ भाव सत्त्व, रज, तम या गुणांच्या कमी-जास्त प्रमाणामुळे वेगवेगळ्या प्रसंगी प्रकट होतात. या आठ भावांचे प्रमाण कमी–अधिक झाल्यामुळे बुद्धी वेगवेगळ्या रूपात अभिव्यक्त होते. बुद्धीच्या या वेगवेगळ्या रूपांना ‘प्रत्ययसर्ग’ असे म्हणतात. प्रत्ययसर्गाचे विपर्यय, अशक्ती, तुष्टी आणि सिद्धी हे चार प्रमुख भेद आहेत. त्यांपैकी तुष्टी हा एक भेद आहे.

तुष्टीचे आध्यात्मिक (आभ्यंतर) व बाह्य असे दोन प्रकार असून या दोन्हीचे मिळून एकूण नऊ उपप्रकार होतात (साङ्ख्यकारिका ५०).

(१) आध्यात्मिक तुष्टी : विवेकख्याती [पुरुष (आत्मा) आणि बुद्धी यांमधील भेदाचे ज्ञान] हा कैवल्य (मोक्ष) प्राप्त करण्याचा उपाय आहे. ते ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न न करणे म्हणजेच आध्यात्मिक तुष्टी होय (जयमंगला टीका). विवेकज्ञान अनायासेच प्राप्त होईल, अशी चुकीची धारणा झाल्यामुळे काही योगी ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वत: प्रयत्न करीत नाहीत. शास्त्रांचे अध्ययन केल्यानंतर त्यांचा यथायोग्य अर्थ न समजल्यास अशा प्रकारच्या चुकीच्या धारणा उत्पन्न होतात. अन्य काही कारणांमुळे ज्ञान आपोआप प्राप्त होईल, असे समजून योगी संतुष्ट होतो, त्यामुळे या भावनेला तुष्टी असे म्हटले आहे. आध्यात्मिक तुष्टीचे प्रकृती, उपादान, काल आणि भाग्य असे चार भेद होतात.

प्रकृती : ‘पुरुष (आत्मा) हा निष्क्रिय आणि अपरिणामी आहे. त्रिगुणात्मिका प्रकृती स्वत:च बंधन उत्पन्न करते व स्वत:ला मुक्ती प्रदान करते असे सांख्यशास्त्रात म्हटले आहे (साङ्ख्यकारिका ६२). अशाप्रकारे केवळ शब्दज्ञान प्राप्त करून ‘प्रकृतीमुळेच मला कैवल्य प्राप्त होईल, मला काहीही करण्याची गरज नाही’, असे गृहीत धरून जर ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत, तर ती प्रकृति तुष्टी होय.

उपादान : वेदान्तशास्त्रात संन्यास हा ज्ञानप्राप्तीचे एक साधन आहे असे सांगितले आहे. ज्या दिवशी वैराग्य उत्पन्न होईल त्या दिवशी संन्यास घ्यावा’ इत्यादी श्रुतिवाक्य वाचून केवळ संन्यास घेतल्यानेच मला ज्ञान प्राप्त होईल अशा धारणेने जर संन्यास घेऊन त्यानंतर कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तर ती उपादान तुष्टी होय.

काल : ‘ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी मला आपोआप मुक्ती मिळेल’ अशा धारणेने जर काळावर विसंबून राहून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तर ती काल तुष्टी होय.

भाग्य : ‘भाग्यं फलति सर्वत्र’ या वचनानुसार जेव्हा माझ्या भाग्यात, नशिबात असेल तेव्हा मला आपोआप मोक्ष मिळेल, अशा भावनेने दैववादावर विसंबून जर ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर ती भाग्य तुष्टी होय.

प्रकृती, उपादान, काल आणि भाग्य या चार आध्यात्मिक तुष्टींनाच अम्भ, सलिल, ओघ/मेघ व वृष्टी अशाही संज्ञा आहेत. प्रयत्नांपासून विन्मुख झाल्यामुळे ज्ञानप्राप्ती होत नाही, त्यामुळे आभ्यंतर तुष्टी कैवल्यप्राप्तीसाठी एक प्रकारचे विघ्न आहे.

(२) बाह्य तुष्टी : ज्ञानेंद्रियांद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच बाह्य विषयांचे ज्ञान होते. चित्तामध्ये या विषयांचा उपभोग करण्याची आसक्ती असल्यास जीव पुन्हा पुन्हा विषयांकडे आकृष्ट होतो; परंतु या विषयांमध्ये दोष दिसून आल्यास तो त्यापासून विरक्त होतो. दोषदर्शनामुळे त्या त्या विषयाप्रती वैराग्य उत्पन्न होते. बाह्य विषय हे तात्कालिक सुख देतात; परंतु ते दीर्घकालीन दु:ख उत्पन्न करतात, याचे ज्ञान झाल्यावर त्या विषयांप्रती विरक्ती उत्पन्न होते. विषयांच्या अर्जन, रक्षण, क्षय (ऱ्हास), भोग आणि हिंसा या पाच गोष्टींशी दु:ख संबंधित आहे. त्यामुळे त्यांमध्ये दोष पाहून त्यांपासून वैराग्य उत्पन्न झाल्यास ते कैवल्यप्राप्तीसाठी साहाय्यक होऊ शकते.

अर्जन (प्राप्त करणे) : एखादी गोष्ट प्राप्त करताना ती सहजासहजी मिळत नाही, तर त्यासाठी कष्ट करावे लागतात, ज्यामुळे दु:ख प्राप्त होते. उदाहरणार्थ, पैसे मिळाल्यावर सुख मिळेल असे वाटत असले, तरीही ते कमविण्यासाठी कष्टांचे दु:ख सहन करावे लागते. अर्जन करीत असताना होत असलेल्या कष्टांमुळे त्या वस्तूविषयी उत्पन्न होणारी विरक्तीची भावना अर्जन तुष्टीत अभिप्रेत आहे.

रक्षण : इच्छित वस्तू प्राप्त झाल्यानंतरही सुख मिळेलच असे नाही. कारण तिचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, ज्यामुळे दु:ख होते. पैसे कमविल्यानंतरही ते चोर इत्यादींपासून कसे वाचवायचे या विवंचनेत माणूस राहतो. त्यामुळे वस्तूचे रक्षण करण्याच्या चिंतेमुळेही त्या वस्तूबद्दल येणारी विरक्ती म्हणजे रक्षण तुष्टी होय.

क्षय : इच्छित वस्तू प्राप्त केल्यानंतर ती कायमस्वरूपी तशीच राहत नाही, तर कालांतराने तिचा क्षय होत जातो, त्यामुळे दु:ख प्राप्त होते. पैसे मिळाल्यानंतर काही काळाने ते खर्च होऊन जातात. बाह्य विषय हे अनित्य असल्यामुळे ते कायमस्वरूपी राहत नाहीत, या भावनेने त्यांपासून आलेली विरक्ती म्हणजे क्षय तुष्टी होय.

भोग : प्रिय वस्तूचा एकदा उपभोग घेतल्यानंतर पुन्हा उपभोग घेण्याची इच्छा होते. आसक्तीमुळे भविष्यात पुन्हा त्या वस्तूचा उपभोग घेतल्यास ती आसक्ती अजून दृढ होते. भविष्यात जर प्रिय वस्तूचा उपभोग मिळाला नाही, तर पुन्हा दु:ख प्राप्त होते. हा उपभोगलालसेचा दोष जाणणाऱ्याच्या मनात त्या वस्तूविषयी निर्माण होणारी विरक्ती म्हणजे भोग तुष्टी होय.

हिंसा : इतर भूतमात्रांना कष्ट दिल्याशिवाय म्हणजेच हिंसेशिवाय विषयोपभोग अशक्य आहेत, परंतु हिंसा करणे अयोग्य असून साधनेत आडकाठी आणणारे आहे. त्यामुळे ‘हिंसा करू नये’ या भावनेतून भोग्य वस्तूबाबत विरक्ती निर्माण होणे ही हिंसा तुष्टी आहे.

अशाप्रकारे विषयांच्या अर्जन, रक्षण, क्षय, भोग आणि हिंसा यांद्वारे दु:ख उत्पन्न होते, याची जाणीव झाल्यास त्या विषयांप्रती तुष्टी उत्पन्न होते. पुन्हा त्या विषयांचा अनुभव घेण्याची इच्छा राहत नाही व त्यांप्रती वैराग्य उत्पन्न होते. या पाच गोष्टींनाच बाह्य तुष्टी असे म्हटले जाते. सांख्यशास्त्रात यांनाच पार, सुपार, पारापार, अनुत्तमाम्भस् आणि उत्तमाम्भस् अशीही नावे आहेत. अशाप्रकारे चार आध्यात्मिक आणि पाच बाह्य तुष्टींचे वर्णन सांख्य आचार्यांनी केलेले आहे.

संदर्भ : मुसलगांवकर, गजाननशास्त्री (संपा.), सांख्यतत्त्वकौमुदी, वाराणसी, १९९२.

समीक्षक : कला आचार्य