दिवजां : दिवज म्हणजे गोव्यात वापरला जाणारा पाच पणत्यांचा पुंजका.त्याचे अनेकवचन दिवजां. हा पुंजका कालमापनयंत्राच्या आकाराचा असून चार कोपऱ्यावर चार पणत्या व मधोमध उंचावर एक पणती जोडलेली असते. त्यात तेलवात घालून पेटवितात आणि ते हातात घेऊन ग्रामदेवताच्या मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा काढतात. या विधीला देखील दिवजां अथवा दिवपान म्हणतात. दिवज हे पारंपारीक समईचे प्रतीक असून ते मातीचे बनविलेले असते. अलिकडच्या काळात धातूपासूनही दिवजे बनवितात. टिकावूपणाच्या दृष्टीने हा मध्यममार्ग स्वीकारलेला दिसतो. हिंदू समाजातील सर्वच स्त्रिया आपल्या कुलदैवताकडील विधी म्हणून आयुष्यात किमान एकदा तरी दिवज पेटवितात.
दिवज फक्त सौभाग्यवती स्त्रियाच पेटवितात; परंतु काही कुटुंबातून नवविवाहित जोडप्याला दिवजाचा विधी जोडयानेच करावा लागतो. अशावेळी वधु आपल्या डोक्यावर दिवज घेते तर वर दिपमाळ नावाचा केळीच्या पात्यांपासून बनविलेला मखराकार मंडप डोक्यावर घेऊन त्यात अनेक पणत्या प्रज्वलीत करतो. दिवज आणि दिपमाळ यांची अगोदर पाना-फुलांनी सजावट केली जाते. दिवजांची प्रदक्षिणा चालू असताना वाजंत्री वाद्यवादन करतात.
दिवज घेणाऱ्या व्यक्तीने दिवसभर व्रतस्थ राहून फक्त फलााहर करायचा असतो. दिवज घेण्याअगोदर कुटुंबातल्या सर्व वडिलधाऱ्या मंडळींना अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. विधी संपल्यावर दिवजात राहिलेले तेल वडिलधाऱ्या मंडळीच्या डोक्यावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. बहुतेक गावातून होणाऱ्या दिवजांच्या जत्रा बव्हंशी पौर्णिमेच्या रात्री होत असतात.अलिकडे डोक्यावर दिवज घेण्यापेक्षा ते हातात घेऊन मिरवणुकीत सामील होण्यावर भर दिसतो.
संदर्भ : खेडेकर, विनायक विष्णू,लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी, गोवा.