दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे : (३१ जानेवारी १८९६ – २६ ऑक्टोबर १९८१). द. रा. बेंद्रे. भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कन्नड साहित्यिक. भारतीय पातळीवरील सर्वोच्च ज्ञानपीठ हा सन्मान मिळवणाऱ्या बेंद्रे यांना कन्नड साहित्यात ‘वरकवी’ ही पदवी  प्राप्त आहे. त्यांनी कविता, कथा, नाटक, अनुवाद तसेच संशोधन व समीक्षा हे साहित्य प्रकार हाताळले आहेत. विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले असले तरीही त्यांची सर्वाधिक ओळख मात्र कवीश्रेष्ठ अशीच आहे. आपल्या अंगभूत अशा अलोट प्रतिभाशक्तीने एक अत्यंत रोमांचक, अध्यात्मप्रवण, सखोल भाषिकदृष्ट्या अद्भुत असे काव्यवैभव त्यांनी कन्नडमध्ये अस्तित्वात आणले. त्यांच्या कवितांमधून सौंदर्यवादी निसर्गप्रतिमा, स्त्री-पुरुष नात्यातील आनंदोत्सव, त्यांची कुटुंबवत्सलता या बरोबरच राष्ट्रीय उलथापालथीचेही भान प्रकटते. अंबिकातनयदत्त या टोपण नावाने त्यांनी कविता लेखन केले आहे.

निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उत्तर कर्नाटकातील धारवाड या लहानशा गावात संस्कृत विद्यासंपन्न दशग्रंथी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बेंद्रे यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीचे. हे बेंद्रे कुटुंब पूर्वी कारणपरत्वे तासगाव, शिरहट्टी व शेवटी धारवाड येथे स्थायिक झाले. त्यांच्या घराण्यात चालत आलेली विद्वत्तेची परंपरा द. रा. बेंद्रे यांनी समर्थपणे पुढे चालवली. त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. आई मराठी भाषिक होती. ती मराठी संत साहित्याचीही भोक्ती होती. त्यामुळे त्यांना संस्कृत, कन्नड आणि मराठी या विविध भाषासंस्कृतींमध्ये वावरता आले. त्यांच्या याच वैशिष्ट्यपूर्ण वावरामुळे विठ्ठल हा कन्नड व मराठीतील समन्वय कसा आहे हेही वास्तव त्यांनी अधोरेखित करून ठेवले. एकूणच मानवी अस्तित्वातील समन्वय त्यांच्या चिंतनकक्षेत केंद्रवर्ती राहतो. धारवाड येथे बालपणी त्यांनी कन्नड लोकगीतांनी समृद्ध अस्तित्व असणारा परिसर अनुभवला. त्यातून झालेले संस्कार त्यांच्या काव्यशक्तीचा मूल स्रोत बनतो. बेंद्रे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण धारवाडलाच झाले. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून एम्. ए. पदवी त्यांनी घेतली. १९१८ – ३२ पर्यंत व्हिक्टोरिया हायस्कूल व राष्ट्रीय शाळा धारवाड तसेच गदग, हुबळी इ. ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. ‘नरबली’ या कवितेमुळे १९३२ साली त्यांना तुरुंगवास आणि अज्ञातवास भोगावा लागला. १९४३ पर्यंत त्यांच्या जीवनात स्थिरता नव्हती. नंतर पुण्यातील कॉमर्स कॉलेजमध्ये कन्नड भाषा साहित्याचे प्राध्यापक म्हणून व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजीचे अध्यापक म्हणून ते होते. १९४४ ते ५६ पर्यंत सोलापूर येथील डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये त्यांनी कन्नडचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९५६ ते ६६ पर्यंत आकाशवाणीच्या धारवाड केंद्रावर तत्त्वचतुषअटयी सल्लागार म्हणून ते काम पाहत. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी परंतु १९१६ च्याही आधीपासून त्यांनी मराठी, कन्नड, इंग्रजी व संस्कृतमध्ये कविता रचण्याची साधना केली.

द. रा. बेंद्रे यांची सहित्य संपदा – कविता संग्रह : कृष्णाकुमारी  (१९२२), गरी  (१९३२), मूर्ति मत्तु कामकस्तुरी  (१९३४), सखीगीत  (१९३७), उय्याले  (१९३८), नादलीले  (१९४०), मेघदूत  (१९४३), हाडू-पाडु  (१९४६) गंगावतरण  (१९५१), सूर्यपान  (१९५६), हृदय समुद्र  (१९५६), मुक्तकंठ  (१९५६), अरळुमरळु (१९५७), चैत्यालय  (१९५७), जीवलहरी  (१९५७), नमन  (१९५८), संचय  (१९५९), उत्तरायण  (१९६०), मुगिल मल्लिगे  (१९६१), यक्ष-यक्षी  (१९६२), नाकु तंती  (१९६४), मर्यादे  (१९६६), श्रीमाता (१९६८), बा हत्तर  (१९६९), इदु नभोवाणी  (१९७०), विनय  (१९७२), मत्ते श्रावण बन्तु  (१९७३), ओलवे नम्म बदुकु (१९७७), चतुरोक्तिमत्तु इतर कवनगळु  (१९७८), काव्यवैखरी  (१९८२);  नाटक : तीरुकर पिदुगु  (१९३०), उद्धार  (१९३०), नगेय होगे  (१९३१), हुच्चतगलु (१९३३),  होस संसार  (१९५०); कथासंग्रह : निराभरण सुंदरी  (१९४०) ; समीक्षा लेखन : तत्त्वचतुषअटयी मत्तु विर्शे  (१९३७), विचार मंजरी  (१९४०), महाराष्ट्र तत्त्वचतुषअटयी  (१९५९), कन्नड तत्त्वचतुषअटयीदल्लि नाल्कु नायकरत्नगळु  (१९६८), हत्तु उपन्यासगळु  (१९७२), तत्त्वचतुषअटयीद विराट स्वरूप (१९७४), कवी लक्ष्मीशन जैमिनी भारतक्के मुन्नुडी  (१९५४), महाराष्ट्र साहित्य  (१९५९), कन्नडदल्ली नाकु  नायकरत्नगळु  (१९६८), मातेल्ल ज्योतु  (१९७२), साहित्यद विराट स्वरूप  (१९७४), कुमारव्यासा  (१९७९), मतधर्म मत्तु आधुनिक मानव  (१९७९) ; मराठी ग्रंथ : संवाद (१९६५), विठ्ठल संप्रदाय  (१९८४), शान्तला  (१९७२) इत्यादी विपुल साहित्यसंपदा त्यांनी प्रकाशित केली आहे. विठ्ठल संप्रदाय  (१९६५) व संतमहंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल (१९८०) हे त्यांचे वैचारिक स्वरूपाचे मराठी ग्रंथ आहेत. गुरू गोविंदसिंग, कबीर वचनावली, अरविंदांचे भारतीय नवजन्म, रवींद्रनाथ टागोर यांच्या १०१ कविता  यांचा कन्नड अनुवादही त्यांनी प्रसिद्ध केला. सौंदर्यलहरी, रमणहृदय, आनंदलहरी, अनुभवामृत  इ. संतवाङ्‌याचा त्यांनी कन्नडमध्ये पद्यानुवाद केला आहे.

लोकगीतांच्या छंदांशी अत्यंत प्रभावी स्वरूपातील सलगी प्रस्तुत करणारा हा कविश्रेष्ठ होय. मानवी भावभावनांबरोबरच धर्म, प्रदेश, भाषा, संस्कृती, व्यक्तिचित्रे, साहित्याचे स्वरूप, भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म, सांख्यशास्त्र हे बेंद्रे यांच्या अनुभूतीचे व चिंतनाचे खास विषय राहिले. वैचारिक तत्त्वप्रचुरतेकडून त्यांनी स्वतःला अखेरीस गूढ गहन अशा सांख्यशास्त्रात खोलवर बुडवून घेतले. एकाहून एक सुंदर अशा लयबद्ध सहजानुभूती देणाऱ्या; वाचकाला मोहवून टाकणाऱ्या स्फुट कविता देणाऱ्या बेंद्रे यांची प्रकृती मुळातून चिंतनशील असल्याने त्यांची अखेरीस तत्त्वज्ञानाच्या संशोधन क्षेत्रातील बैठक मजबूत बनली.  त्यांच्या काव्य अभिव्यक्तीतून एक विशेष आध्यात्मिक उन्नत्तीचा प्रत्यय निर्माण झाला आहे.

जगात घडणाऱ्या घडामोडींचा बेंद्रे आपल्या पूर्व परंपरांच्या संदर्भातून विचार करत असत. या दृष्टीतून त्यांची ‘शांती आणि शक्ती’ ही बावन्न ओळींची कविता उल्लेखनीय आहे. बेंद्रे यांच्या चिंतनशील प्रकृतीस ५ मार्च १९५३ रोजी झालेला गोमटेश्वराचा महामस्तकाभिषेक व त्याच दिवशी आलेली स्टालिनच्या निधनाची वार्ता यातील संगती साधणारी प्रतिमा दृष्टीस पडली. ही कविता ते आपल्या तीस ओळीच्या गद्य प्रस्तावनेसह देतात. पाश्चात्यांचा बळवाद आणि भारताचा शांतीवाद यांचे तौलनिक सखोल चिंतन म्हणजे बेंद्रे हे त्यांच्या साहित्याचे मर्म प्रस्तुत कवितेवाटे अधोरेखित होते. भरतखंडास ज्याच्यावरून नाव पडले तो भरत प्रतिष्ठा पावतो ते बाहुबलीच्या म्हणजेच गोमटेश्वराच्या त्यागावर हे निदर्शनास आणून बेंद्रे यांनी जैन, शैव आणि वैष्णव यांच्यातील या संदर्भातील अनुबंध मांडण्याचा प्रयत्न केला, ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. कन्नड आदिकवी पंप व इतर प्राचीन कवी यांना ते जैन व ब्राह्मण धर्माचा समन्वय असे संबोधतात.

बेंद्रे यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. धारवाडच्या गेळेयर गुंपू या अभ्यासंमडळाच्या निर्मितीत बेंद्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. गेळेयर गुंपूमध्ये असलेले मित्रमंडळी आज कर्नाटकात प्रख्यात लेखक म्हणून प्रसिद्धी पावली आहे. बेंद्रे यांनी काही काळ जीवन, जयकर्नाटक, वाग्भूषणस्वधर्म या कन्नड पत्रिकांचे संपादक म्हणूनही काम पाहिले. १९४३ मध्ये शिमोगा येथे भरलेल्या सत्ताविसाव्या कन्नड तत्त्वचतुषअटयी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल करून त्यांच्या ‌तत्त्वचतुषअटयीसेवेचा गौरव करण्यात आला. संवाद  (१९६५) या त्यांच्या मराठी गद्यपद्यसंग्रहास १९६५ चे न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले आहे. १९५८ मध्ये बेंद्रे यांच्या कन्नड अरळुमरळु  (सूर्यपान, हृदयसमुद्र, मुक्तकंठ, चैत्यालयजीवनलहरी  या पाच काव्यांचा गुच्छ) या संग्रहास तत्त्वचतुषअटयी अकादमीपुरस्कार प्राप्त झाला. १९६८ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ दिली. त्यांच्या नाकु तंती  या काव्यसंग्रहाला भारतीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ (१९७३) हा पुरस्कार  मिळाला आहे.

आधुनिक कन्नड काव्याच्या संदर्भात बेंद्रे यांनी केलेले कार्य थोर व मौलिक स्वरूपाचे आहे. लोकपरंपरांचा वापर करून त्यांनी कन्नड भाषेला सामर्थ्य आणि लवचिकपणा तर प्राप्त करून दिलाच पण तिला तरल मानवी भावना व अनुभव यांच्या आविष्काराचे एक समर्थ साधनही बनविले. गूढवादाचा शोध घेणाऱ्या श्रेष्ठ प्रतीच्या भावकवितारूपाने त्यांनी कन्नड काव्य अधिक समृद्ध व संपन्न केले. निसर्ग, प्रेम, देशभक्ती, सामाजिक जाणीव व आध्यात्मिक चिंतन ही त्यांची आवडती विषयसूत्रे आहेत. गांधीयुगातील सर्वश्रेष्ठ स्वच्छंदतावादी कन्नड कवी म्हणून त्यांना कर्नाटकात मानाचे स्थान आहे.

मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : Datta,Amaresh (C.Edi.),Encyclopaedia Of Indian Literature,Sahitya Akademi,New Dehli,1987.

समीक्षक : शोभा नाईक