‘कुट्टक’ म्हणजे कूट प्रश्न. सामान्यपणे कुट्टके (problems) एकचल (one variable), द्विचल(two variable) किंवा बहुचल (many variable)  समीकरणांच्या आधारे सोडविले जातात. कुट्टक हे  घात (linear) समीकरण असते.

प्राचीन भारतीय गणित साहित्यात अनेक कुट्टके आढळून येतात. पूर्वी कुट्टकांची उकल ही पूर्णांक संख्याच असली पाहिजे असा संकेत होता. सामान्यतः गणितात  एकवर्ण समीकरण सोडवण्यासाठी एकच समीकरण पुरेसे असते. जेव्हा द्विवर्ण समीकरणांच्या उकलींसाठी दोन समीकरणे असतात, त्रिवर्ण  उकलींसाठी तीन समीकरणे असतात, तेव्हा त्या समीकरणांना प्रचलित भाषेत ‘एक सामयिक समीकरण’ असे म्हणतात. परंतु द्विवर्ण समीकरणांसाठी एकच समीकरण, किंवा त्रिवर्ण समीकरणांसाठी दोनच समीकरणे  (जितके वर्ण असतील त्यापेक्षा कमी समीकरणे) दिलेली असणे, अशी योजना कुट्टकांमध्ये असते. काही वेळा कुट्टकाची एकच उकल असते तर काही वेळा कुट्टकाच्या एकापेक्षा अधिक उकली  असू शकतात. काही कुट्टकाना उकल असत नाही.  उदाहरण, एका दोन अंकी संख्येच्या दुप्पटीमध्ये दोन मिळवले तर त्या दोन अंकी संख्येतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती? हे कुट्टक सोडवण्यासाठी आपल्याला दोन चलांचा उपयोग करावा लागेल. दशक स्थानांचा अंक  ‘x’ मानू , एकक स्थानांचा अंक ‘y’ मानू. म्हणून ती संख्या (10x + y) होय. अंकांच्या स्थानांची अदलाबदल करून येणारी संख्या (10y + x) होय. उदाहरणात दिलेल्या अटीनुसार एकच द्विवर्ण समीकरण तयार होते ते समीकरण पुढील प्रमाणे :

2 × ( 10x + y ) + 2 = 10y + x (दुप्पटीत दोन मिळवले तर अंकांच्या स्थानांची अदलाबदल )

त्यामुळे 20x + 2y + 2 = 10y + x

किंवा  19x = 8y - 2.

'x' आणि 'y' या चलांच्या किमतींसाठी केवळ एकच समीकरण उपलब्ध आहे. परंतु येथे एक गृहीत सत्य असे आहे की,  'x' आणि 'y' या दोन्ही चलांच्या किंमती या एक अंकी धन पूर्णांक संख्या (10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या ) आहेत. या कुट्टकाची उकल समजावून घेऊ.

8y = 19x + 2    म्हणून  y =  2x +\frac{(3x + 2 )}{8}

' y ' ही  पूर्णांक संख्या असेल तर \frac{(3x + 2)}{8} ही  सुद्धा पूर्णांक संख्या असली पाहिजे.

(दोन पूर्णांक संख्यांची बेरीज ही पूर्णांक संख्याच असते ). 'x' ची किंमत सम आहे. जर 0< x <10  तर x च्या केवळ 2 या किमती साठीच  \frac{( 3x + 2 )}{8} ही संख्या एक अंकी पूर्णांक संख्या आहे. असे प्रयत्न -प्रमाद (trial and error) पद्धतीने निश्चित करता येते. जर x = 2 असेल तर y = 5 म्हणून ती दोन अंकी संख्या 25 होय अशी कुट्टकांची उकल प्राप्त होते. ही या कुट्टकाची एकमेव उकल आहे.

 

समीक्षक : शशिकांत कात्रे