वाटवे, गजानन जीवन : (८ जून १९१७—२ एप्रिल २००९). मराठी भावगीत गायक व संगीतकार. त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचा भिक्षुकीचा व्यवसाय होता आणि ते मिरज संस्थानामध्ये उपाध्याय होते. छोट्या गजाननला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती आणि उपजत गोड गळ्यामुळे विविधप्रसंगी गाणी म्हणण्यात अग्रेसर असे. गाण्याच्या वेडापायी बेळगाव सोडून ते पुणे येथे आले. विनायकबुवा पटवर्धन यांनी गजाननरावांची सोय गोविंदराव देसाई यांच्या गोपाल गायन समाजात केली. गजाननरावांनी अर्थार्जनाकरिता शाळा-महाविद्यालयांमध्ये गायनाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्यांचा गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात झाला (१९३८). यानंतर त्यांनी विविधप्रसंगांना अनुसरून काव्यगायनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यांना मुंबई आकाशवाणीवर गायनाचा कार्यक्रम करण्याची संधीही मिळाली (१९३९). याचवर्षी त्यांची ‘वारा फोफावला’ ही ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.ने काढली. ही पहिलीच ध्वनिमुद्रिका खूप गाजली. यानंतर त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या.
गजाननरावांनी केशवसुत, गिरीश, माधव जुलियन, यशवंत, कुसुमाग्रज, सुरेश भट, गदिमा, राजा बढे, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, श्रीनिवास खारकर आदी प्रतिभावंतांच्या दर्जेदार भावकविता अत्यंत सुरेल चालीत बांधल्या आणि त्या रसिकांसमोर पेश केल्या. हे त्यांनी केलेले काव्यगायनाचे कार्यक्रम खूप गाजले. या कार्यक्रमांमध्ये ते विविध प्रकारची गीते सादर करत असत. राष्ट्रप्रेमाची गीते, मातृप्रेमाची गीते, प्रेमगीते, पाऊस गीते, विडंबन गीते असे विविध प्रकार या कार्यक्रमात असल्याने सर्व प्रकारच्या रसिकांना हे कार्यक्रम आवडू लागले.
गजाननरावांनी जवळपास २००० पेक्षाही अधिक गीते स्वरबद्ध केली, त्यापैकी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या व गायलेल्या गीतांमध्ये रामाला गं चंद्र हवा (१९५४), हीच राघवा हीच पैजणे (१९५४), मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला (१९८६), झुंजू मुंजू झालं (१९९३), निरांजन पडले तबकात (१९९९), दोन ध्रुवावर दोघे आपण(१९९९), चंद्रावरती दोन गुलाब (१९९९), घट तिचा रिकामा (२००४), प्रीत तुझी माझी (२००६), नयन खेळले जुगार (२०१०), परीसा हो तुलसी रामायण (२०१४) ही गीते विशेष गाजली. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमध्ये गगनी उगवला सायंतारा, कोणता मानू चंद्रमा, कुंभारासारखा गुरू, ती पहा बापूजींची प्राणज्योती, जारे चंद्रा तुडवित जा पवना जा वेगे, चल चल चंद्रा, घर दिव्यात मंद तरी, गेला दर्यापार घरधनी, गावू त्यांना आरती, कधी कुठे न भेटणार, अंतरीची विशाल स्वप्ने, ऐकलात का हट्ट नवा, उठ राजसा घननिळा, आला स्वप्नांचा मधुमास, रघुवीर आज घरी येणार, या धुंद चांदण्यात तू, नाखवा वल्हव वल्हव, तो सलीम राजपुत्र, ते कसे गं ते कसे, परदेशी सजन घरी आले, सुरांनो जावू नका रे ही गीते रसिकप्रिय झाली. दरम्यान प्रभात फिल्म कंपनीशी त्यांचा संबंध आला आणि दहा वाजता या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले. अनेक गीतांना त्यांनी चालीही दिल्या. वाटवे यांनी संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर कविता मालती पांडे, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, ज्योत्स्ना भोळे, कुमुदिनी पेडणेकर या गायिकांनी गायल्या आहेत.
गजाननरावांचा विवाह सुषमा यांच्याशी झाला. त्यांना मिलिंद वाटवे आणि मंजिरी वाटवे-चुणेकर ही दोन मुले.
गजाननरावांनी आपल्या सुरेल गायनाने मराठीतील अर्थघन भावगीतांना वेगळी उंची प्राप्त करून दिली. ते स्वत:ची ओळख काव्यगायक अशी करून देत असत. त्यांनी भावगीत या गायनप्रकाराचा प्रसार केला आणि सुगम संगीताला मैफलीचा दर्जा मिळवून दिला. कवितेला शोभेल अशी भावस्पर्शी चाल आणि तबला व पेटी या वाद्यांच्या जोडीने माफक संगीताचा वापर करून भावपूर्ण मुलायम आवाजात हे गानसादरीकरण होत असे. याचा सर्वसामान्य रसिकांवर वेगळा प्रभाव पडत असे व ते भारावून जात. त्यांचे गायनाचे कार्यक्रम खूप लोकप्रिय असण्याचे हे एक गमक होते. ते कवितेतील शब्दोच्चाराकडेही लक्ष देत असत. यमक साधण्याकरिता कवितेची अकारण मोडतोड त्यांना पटत नसे. कविता भावपूर्ण, श्रवणीय आणि प्रेक्षणीय करण्याची किमया त्यांच्यामध्ये होती. शाळा-महाविद्यालयातील कार्यक्रम, गणपती उत्सव अशा सर्व लहानमोठ्या प्रसंगात त्यांचे काव्यगायनाचे कार्यक्रम होत असत.
गजाननरावांना दीनानाथ पुरस्कार (१९९३), महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ (१९९४), वसंतराव नाईक पुरस्कार (१९९५), गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार, युगप्रवर्तक पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. पुणे येथे १२ डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या भावगीत गायक संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
गजाननरावांची शिष्य परंपराही मोठी आहे. अनुराधा मराठे, शोभा जोशी, रंजना जोगळेकर, मंजिरी आलेगावकर, रवींद्र साठे इत्यादींनी त्यांचा वारसा पुढे चालविला. गगनी उगवला सायंतारा (१९७१) हे त्यांचे आत्मचरित्र. गजाननरावांनी संगीतबद्ध केलेल्या १०० भावगीतांचा समावेश असलेला निरांजनातील वात हा भावगीतसंग्रह बबनराव नावडीकर यांनी संकलित केला आहे. स्वरानंद प्रतिष्ठान, पुणे ही संस्था वाटवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावगीत या गायन प्रकारात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीस २०१६ पासून पुरस्कार देते.
गजाननरावांचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले.
संदर्भ :
- वाटवे, गजानन, गगनी उगवला सायंतारा, १९७१.