महाराष्ट्रातील फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात येते. महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रवारी १९८६ रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौ.किमी. असून हे अभयारण्य समुद्रकिनाऱ्यापासून १२ किमी. अंतरावर आहे. हे अभयारण्य काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव, वळास्ते, सर्वा, सुपेगाव अशा एकूण ३८ गावांनी वेढले आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत हे अभयारण्य असून त्याचे भौगोलिक स्थान १८० २५’ ००” उत्तर आणि ७२० ५६’ ००” पूर्व असे आहे. मानवी त्रासापासून मुक्त असल्याने या अभयारण्यास व्हर्जिन फॉरेस्ट असेही म्हणतात.
या अभयारण्यात शुष्क पाणगळीचे सदाहरित-निमसदाहरित आणि मिश्रसदाहरित तसेच किनारी (तटीय परिसंस्था) वनराजीचे क्षेत्र आहे. एकाच अभयारण्यात असे तीन प्रकार असल्यामुळे येथील वनस्पती व प्राणी जगतात वैविध्यपूर्णता आढळते. त्यामुळे येथे वृक्षांच्या सुमारे ७१८, स्तनी वर्गातील प्राण्यांच्या १७, पक्ष्यांच्या सुमारे १६४, सापांच्या २७ आणि फुलपाखरांच्या सुमारे ९० प्रजाती पहायला मिळतात.
फणसाड हे मुरुड-जंजीऱ्याच्या राजाचे शिकारीसाठी संरक्षित स्थान होते. मात्र ते आता तटीय वनराजी परिसंस्थेचे संवर्धन व संरक्षण केंद्र बनले आहे. त्यावेळी या अभयारण्यात शिकारीसाठी जागोजागी बांधलेले जांभा दगडातील वर्तुळाकार आडोसे (बारी) आजही पहायला मिळतात. साग व निलगिरीची रोपवने येथे मुद्दाम जोपासली आहेत.
या अभयारण्यात रानगवा, शेकरू, बिबट्या, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, तरस, कोल्हा, सोनेरी लांडगा, मुंगीखाऊ, खवल्या मांजर, रानडुक्कर, वानर, माकड, उदमांजर, रानमांजर, मुंगूस, रानससा, काळवीट, पाणमांजर इत्यादी प्राणी आहेत. तसेच येथे नाग, घोणस, फुरसे, मण्यार, हरणटोळ, तस्कर, अजगर, घोरपड इत्यादी सरपटणारे प्राणीदेखील आढळतात.
या अभयारण्यात ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला सर्पगरूड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, हरियाल, कोकीळ, धनेश आणि समुद्र गरूड इत्यादी पक्षी वास्तव्यास आहेत; तर फुलपाखरांच्या ब्लू मारमॉन, मॅप, कॉमन नवाब अशा वैशिष्ट्यपूर्ण जाती येथे आढळून येतात. दलदलीच्या भागांत ऑक्टोबर–डिसेंबरपर्यंत जळवा सापडतात.
या अभयारण्यात आंबा (Mangifera indica), ऐन (Terminalia ellipta), किंजळ (Terminalia paniculata), साग (Tectona grandis), पारजांभूळ ( Syzygium cumini), पळस (Butea monosperma), पांगारा (Erythrina variegata), कांटे सावर (Bombax ceiba), हेदु किंवा हळदु (Adina cordifolia), काजरा (Strychnos nux-vomica), खडसिंग खवस पुत्रंजीवा (Putranjiva roxburghii), हिरडा (Terminalia chebula), बेहडा (Terminalia belerica), आवळा (Emblica officinalis), मुरुडशेंग (Helicters isora), सर्पगंधा (Rauvolfia serpentina ), कुडा (Wrightia tinctoria), आघाडा (Achyranthes aspera), गेळ (Catunaregam spinosa), चित्रक ( Plumbago zeylanica), गुंज (Abrus precatorius), ब्राह्मी (Bacopa monnieri), अनंतमूळ (Hemidesmus indicus) आणि तमालपत्र (Cinnamomum tamala), नागरमोथा (Cyperus scariosus), मिरी (Piper nigrum) या विविध वनस्पती आहेत. तसेच वड (Ficus benghalensis) व पिंपळाच्या (Ficus religiosa) अनेक जाती येथे आढळतात. गारंबीच्या वेली हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. या वेलीची लांबी १०० मीटरहून अधिक असते.
या वनामध्ये अनेक ठिकाणी पाणथळ जागा आहेत. तेथील स्थानिक भाषेत याला ‘गाण’ म्हणतात. पाणथळ जागेभोवती असलेल्या झाडीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेस ‘माळ’ म्हणतात. गुण्याचा माळ, चिखलगाण, फणसाडगाण, धरणगाण असे अनेक गाण आणि माळ येथे पहावयास मिळतात. या अभयारण्यात निसर्गभ्रमंतीकरिता पायवाटांची निर्मिती करण्यात आली आहे. अभयारण्यात उन्हाळ्यामधील तापमान २५० ते ३०० से. असते, तर दरवर्षी येथे सरासरी २८०० मिमी. पाऊस पडतो.
पर्यटकांच्या व अभ्यासकांच्या वास्तव्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग, ठाणे मार्फत येथे तंबू व व्हाईटहाऊस नामक गेस्टहाऊसमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. अभयारण्याच्या जवळच अलिबाग-मुरुड रोडवरील बोर्ली येथून ३.५ किमी. अंतरावर फणसाड धबधबा आहे. मजगाव येथे निसर्गपरिचय केंद्र व सुपेगाव येथे देवराई आहे. हे अभयारण्य मुंबईपासून १६० किमी. अंतरावर असल्याने येथे मुंबई, ठाणे, पालघर येथील पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते.
संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Phansad_Wildlife_Sanctuary
https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g2531523-d3705864-Reviews-Phansad_Bird_Sanctuary-Raigad_Raigad_District_Maharashtra.html
समीक्षक : जयकुमार मगर