रॅनन्क्युलेसी कुलातील ॲकोनिटम प्रजातीमधील दोन जाती भारतात बचनाग या नावाने ओळखल्या जातात. काळे तीळ, रानजाई व घाट लार्कस्पर या वनस्पतीही रॅनन्क्युलेसी कुलातील आहेत. ॲकोनिटम प्रजातीतील वनस्पती यूरोप आणि अमेरिकेतील थंड व डोंगराळ भागांत वाढत असून त्या सर्व कमीअधिक प्रमाणात विषारी असतात. बचनागाच्या काळा बचनाग (ॲकोनिटम फेरोक्स) आणि दुधिया बचनाग (ॲकोनिटम नॅपेलस) या दोन्ही जाती भारतात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फुलतात.

काळा बचनाग: (इंडियन ॲकोनाइट). भारतात ही वनस्पती मुख्यत: हिमालयात समुद्रसपाटीपासून सु. ३,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात (उदा., पुष्पघाटी किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स), पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या टेकड्या इ. ठिकाणी आढळते. ती साधारणपणे १-२ मी. उंच वाढते. ती पानझडी असून हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे बर्फाखाली गाडली जाते; परंतु जमिनीतील कंद बहुवर्षायू असल्यामुळे टिकून राहतो आणि पुढच्या उन्हाळ्यात त्याला धुमारे फुटतात. पाने साधी, एकाआड एक, मध्यम आकाराची व सु. १० सेंमी. लांब असून अनेक खंडांत विभागलेली असतात. फुलोरा मंजरी प्रकारचा असतो. फुले मोठी, आकर्षक, निळसर जांभळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. फुलातील एक पाकळी फडेप्रमाणे असते व तिने बाकीच्या पाकळ्या आच्छादलेल्या असतात. फुलांचे परागण मधमाश्यांमार्फत घडून येते. पुनरुत्पादन कंदामार्फत तसेच बियांपासूनही होते.

दुधिया बचनाग: (मंक्सहूड). भारतात ती हिमालयाच्या डोंगराळ भागात दिसून येते. शोभेसाठी तिची बागेत लागवड करतात. पाने साधी व हस्ताकृती असून अनेक खंडांमध्ये विभागलेली असतात. फुले भडक जांभळी असतात; कधीकधी फुले पांढरी आढळतात. या वनस्पतीचे खोड, पाने व फुले विषारी असतात.
दोन्ही बचनागांच्या मुळांपासून स्यूड-ॲकॉनिटीन नावाचे अल्कलॉइड काढतात. ते विषारी असून औषधी असते. ते मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्यास मळमळ, ओकाऱ्या, अतिसार, श्वासावरोध, स्नायुदुर्बलता, आचके इ. लक्षणे दिसून येतात व कधीकधी मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच या वनस्पतीचा औषध म्हणून वापर केला जातो. समचिकित्सा (होमिओपॅथी) उपचार पद्धतीत बचनागाचा विविध प्रकारे वापर होतो.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.