निक्टॅजिनेसी कुलातील बुगनविलिया प्रजातीमधील वनस्पतींना सामान्यपणे बुगनविलिया किंवा बोगनवेल म्हणतात. या प्रजातीत ४–१८ जाती असाव्यात, असे मानतात. ही वनस्पती मूळची ब्राझील (दक्षिण अमेरिका) येथील असून जगात सर्वत्र शोभेसाठी वाढविली जाते. बुगनविलिया इतर झाडाझुडपांच्या आधाराने तसेच आधाराशिवाय वाढू शकते. फ्रेंच वनस्पतितज्ज्ञ फिलिप कॅमेरकॉन व ॲडमिरल लुई अँटोनी बुगनविले यांनी या वनस्पतीचे वर्गीकरण व नामकरण केले. त्यामुळे या वनस्पतीला बुगनविलिया हे नाव पडले आहे. पाऊस असलेल्या क्षेत्रात ती सदाहरित असते, तर शुष्क प्रदेशातील वातावरणात तिची पाने उन्हाळ्यात गळून पडतात. भारतात बुगनविलिया ग्लॅब्रा असे शास्त्रीय नाव असलेली जाती सर्वत्र आढळते. या जातीच्या फुलांची छदे पातळ व कागदाप्रमाणे असल्यामुळे तिला ‘पेपरफ्लॉवर’ किंवा ‘लेसर बुगनविलिया’ असेही म्हणतात.
बुगनविलियाची वेल काष्ठीय व काटेरी असून ती १–१२ मी. उंच वाढू शकते. पाने साधी, एकांतरित, गोलाकार-लांबट, ४–१३ सेंमी. लांब व २–६ सेमी. रुंद असतात. पर्णदल गळून पडल्यानंतर पर्णवृंतापासून शूल म्हणजेच काटा तयार होतो. या शुलांची टोके काळी असून त्यांवर मेणचट थर असतो. चरणाऱ्या जनावरांपासून संरक्षणासाठी त्यांचा उपयोग होतो. फुले लहान आणि पांढरी असतात. अशा तीन फुलांचा एक गुच्छ बनतो आणि तो ३–६ भडक रंगांच्या छदांनी वेढलेला असतो. या छदांचे रंग गुलाबी, रक्तवर्णी, जांभळा, लाल, पिवळा व नारिंगी असतात. त्यामुळे बुगनविलिया वेगवेगळ्या रंगांची दिसते. या वेलीला फुले वर्षभर येत असली, तरी मार्च–मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात बहर येतो. फळ लहान, पंचखंडित, शुष्क व न तडकणारे असते.
शोभेसाठी तसेच कुंपण म्हणून बुगनविलियाची लागवड करतात. कमी पावसाच्या भागात ती वाढविली जाते. तसेच ती थंड हवामानातही जोमाने वाढते. या वेलीला वेगवेगळे आकार देऊन ती घराभोवती व भिंतीवर वाढविली जाते. जमिनीतील क्षारांचा योग्य प्रकारे उपयोग करून ती वाढते. विविध प्रकारचे आधार देऊन ती वाढविली जाते. या वेलीचे उष्ण प्रदेशांतील प्रकार संकर करून वाढविले जात आहेत. ती काटेरी असल्यामुळे जनावरे खात नाहीत. तिच्या रसाने काहींच्या त्वचेवर पुरळ उठू शकतात.