मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेतील स्टर्कफोंतेन येथे मिळालेल्या एका जीवाश्माचे नाव. जवळजवळ संपूर्ण अवस्थेत मिळालेला हा सांगाडा ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राणी एसटीडब्ल्यू ५७३ (StW 573) या नावाने ओळखला जातो. त्याचा शोध १९९८ मध्ये लागला असला, तरी रोनाल्ड क्लार्क व त्यांच्या सहकारी यांना खडकातून सगळी हाडे व्यवस्थित मिळवण्यासाठी वीस वर्षे अथक परिश्रम करावे लागले.
हा सांगाडा वयाने मोठी असलेल्या मादीचा असून तिच्या कवटीचे आकारमान ४०८ घन सेंमी. होते. या मादीच्या मानेतील पहिल्या मणक्याच्या (Atlas vertebra) व कवटीच्या जोडणीमधून असे दिसते की, लिटल फूटची मानेची हालचाल मानवांप्रमाणे नसून ती चिंपँझींसारखी होती. लिटल फूटच्या कोपरापुढील हाताला लहान वयात खूप उंचीवरून पडल्याने विशिष्ट असा बाक आलेला होता. या जीवाश्माचे कालमापन ३६.७ लक्ष वर्षपूर्व असे करण्यात आले आहे.
लिटल फूट मादीचा समावेश ३३ लक्षपूर्व ते २१ लक्षपूर्व या काळात अस्तित्वात असलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (Australopithecus africanus) या प्रजातीत करण्यात येतो. रोनाल्ड क्लार्क व एमिली ब्युदे यांनी लिटल फूटचा चेहरा, डोळयांच्या खोबणी व दात यांची इतर ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस जीवाश्मांशी तुलना करून लिटल फूट मादीसाठी ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रॉमिथियस (Australopithecus prometheus) ही वेगळी प्रजात सुचवली आहे; तथापि पुरामानवविज्ञानात या वर्गीकरणाला २०२० पर्यंत मान्यता मिळालेली नाही.
संदर्भ :
- Berger, Lee R. & Hawks, John, ‘Australopithecus prometheus is a nomen nudumʼ, American Journal of Physical Anthropology, 168 (2) : 383-387, 2019.
- Clarke, Ronald J. ‘Excavation, reconstruction and taphonomy of the StW 573 Australopithecus prometheus skeleton from Sterkfontein Caves, South Africaʼ, Journal of Human Evolution, 127: 41-53, 2019.
समीक्षक : सुषमा देव