मसूदी, अल् : (८९६ — ९५७). अरब प्रवासी, इतिहासकार व भूगोलज्ञ. त्याचे पूर्ण नाव अबू-अल्-हसन-अली-इब्न हुसेन अल्-मसूदी. तो मुहंमद पैगंबर यांचा सहकारी अब्दुल्लाह इब्न मसूद याचा वंशज होता. अरबी हीरॉडोटस म्हणून त्याला संबोधण्यात येते. त्याने अनेक देशांना भेटी दिल्या.
मसूदीचा जन्म ८९६ मध्ये बगदाद येथे झाला. त्याला शिक्षणाबद्दल विलक्षण प्रेम होते. उत्कृष्ट स्मृती, पटकन लिहिण्याची क्षमता यांशिवाय विविध विषयांचा अभ्यास करण्याबरोबरच मुख्यत्वे इतिहास आणि भूगोल या विषयांत त्याला जास्त स्वारस्य होते. पारंपरिक मुस्लिम पद्धतीने शिक्षण घेऊन तो ९१५-१६ मध्ये बसरा आणि पर्सेपलिस येथे गेला. नंतर तो भारतात आला. मसूदीने त्या वेळचे मुंबई बेट, खंबायतचे आखात, मुलतान, सिंध वगैरे प्रदेशांत भ्रमंती केली आणि तो श्रीलंका, चीनपर्यंत गेला. पुढे ९१७ मध्ये तो झांझिबार व ओमान आणि नंतर ९२२ मध्ये अलेप्पो या ठिकाणी पोहोचला. याशिवाय इराण-इराक-येमेन या प्रदेशांनाही त्याने भेटी दिल्याचा उल्लेख आढळतो. अखेरीस तो ईजिप्तमधील कैरोजवळील अल्-फुस्टॅट या ठिकाणी आला (९४२) व अखेरपर्यंत तेथेच राहिला.
त्याच्या प्रवास-वृत्तांतात त्याने निश्चितपणे किती देशांना व शहरांना भेटी दिल्या, यांबाबत काटेकोर माहिती नाही आणि त्याविषयी इतिहासतज्ञांतही मतभेद आहेत; तथापि या प्रदीर्घ प्रवासात त्याने विविध देशांतील चालीरिती, समाजजीवन व तेथील परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले आणि मिळालेल्या बहुविध अनुभवांची नोंद केली. दूरवरचा प्रवास करण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, हे अद्यापि ज्ञात नाही. काहींच्या मते मसूदी इस्माइली पंथाच्या प्रचारार्थ भटकत असावा; कारण त्याच्या लेखनात शिया पंथाविषयीचा आदर व आसक्ती स्पष्टपणे व्यक्त होते; तर काहींच्या मते, इस्माइली पंथापेक्षा इमामांबद्दल त्याला अधिक आदर असावा. इस्लाम धर्म व चालीरिती यांविषयीचे त्याचे विचार वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे आहेत.
त्याने आपल्या लेखनात सिंध प्रांतातील मनसुरा हे शहर खूप समृद्ध, सुंदर शहर असल्याचे व तेथे आंबा वगैरे फळांच्या बागा असल्याची माहिती नमूद केली आहे. तेथील राजाच्या हत्तींचे वर्णन करताना तो लिहितो की, एका हत्तीचे नाव ‘मोंकीरकाल’ असून दुसऱ्याचे नाव ‘हैदर’ आहे. ‘मोंकीरकाल’ हा हत्ती शहरातील कोणा सरदाराचे निधन झाल्यास अनेक दिवस अन्नपाणी प्राशन करत नाही आणि तो खूप दिवस रडतो. एकदा ‘मोंकीरकाल’, ‘हैदर’ व इतर ७-८ हत्ती शहरातील एका अरुंद रस्त्याने जात असताना रस्त्यामधून जाणारी एक स्त्री या हत्तींना बघून बेशुद्ध पडली. हे बघून या हत्तीने मागून येणाऱ्या सर्व हत्तींना थांबवले व त्या स्त्रीचे प्राण वाचवले, अशी एक गमतीदार कथा तो सांगतो. हत्ती फक्त युद्धांसाठी न वापरता त्याचा उपयोग ओझे वाहण्यासाठी, गाडे ओढण्यासाठी, भाताच्या मळणीसाठीही केला जातो, असे त्याने लिहिले आहे. काश्मीरचे वर्णन करताना तो म्हणतो, काश्मीर हा प्रांत सिंधच्या डोंगराळ भागात आहे. उंच-उंच डोंगर, खोल दऱ्या, घनदाट जंगले यांतून वाहणाऱ्या रौद्र नद्यांचे प्रवाह यांमुळे या प्रदेशाला नैसर्गिक तटबंदी लाभलेली असून या प्रांतात असणाऱ्या शहरांची व गावांची संख्या साठ ते सत्तर हजार आहे. या प्रदेशात प्रवेश करण्यास एकाच बाजूने मार्ग असल्याचे तो लिहितो. या बाजूचा दरवाजा बंद केला की, या प्रदेशात पक्ष्यांशिवाय कोणालाही प्रवेश करता येत नाही. तो काश्मीरच्या राजाचे नाव ‘रामा’ असल्याचे लिहितो. पुढे मसूदी कनौज येथे पोहोचला. कनौज शहराचा परीघ २४ कीमी. व तेथे ‘बुध’ किंवा बुदाह (Budah) नावाचा राजा राज्य करत असून हे शहर मुलतानच्या मुस्लीम राजवटीखाली असल्याचे तो लिहितो. या राजाजवळ सात लाखाची चार सैन्यदले असून सैन्यात एक हजार हत्ती, त्यांच्या अंगावर लोखंड व चामड्याचे चिलखत घालत असल्याचे तो सांगतो. पुढे तो लिहितो की, हत्तीच्या आजूबाजूला ५०० पायदळ व ६००० घोडदळ असते. येथील हजारो लोक देवतेची पूजा करताना देवतेला पैसे, किमती रत्ने, कोरफड व अत्तरे अर्पण करत असल्याची माहिती तो देतो.
मुरूज अल्-धहब वा-मअदिन अल् जवाहीर या त्याच्या ग्रंथात मसूदीने झंज राजा आणि चौल या संदर्भात पुढीलप्रमाणे नोंद करून ठेवली आहे, ‘सामूर (चौल) येथे राज्य करणाऱ्या राजाचे नाव झंज (Djandja) असे आहे.’ तसेच तो अनेक विद्वान लोकांना भेटल्याचे लिहून ठेवतो. त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांचे भूवर्णन, तेथील राज्ये व राज्यकर्ते, डोंगर, समुद्र यांचे वर्णन करून ठेवलेले आहे.
मसूदी आपल्या लेखनात म्हणतो की, भारतात किवा सिंध प्रांतातील लोक आपल्या देशात मुसलमानांना कधीही अडथळा आणत नसल्याने तेथे मुस्लीम धर्माचा खूप चांगला प्रसार झाला. त्यामुळे मुसलमानांना त्यांच्या उपासनेसाठी तेथे भव्य मशिदी, मोठ्या प्रमाणात दर्गे बांधता आले. तेथील राजांचे आयुष्य खूप मोठे आहे. एका राज्यातील स्त्रियांचे वर्णन करताना तो म्हणतो, येथील स्त्रिया संपूर्ण भारतात पुस्तकी वर्णनापेक्षा अतिशय सुंदर आहेत व येथे येणारे प्रवासी व खलाशी त्या स्त्रिया कोणत्याही किमतीत विकत घेतात. तो पुढे एक विचित्र गोष्ट लिहितो की, युद्धात भाग घेणाऱ्या हत्तींना तहान सहन होत नसल्याने येथे होणाऱ्या लढाया या मुख्यत्वे हिवाळ्यात होतात. भारतातील हिंदू व मुसलमान लोक प्राण्यांचे मांस भक्षण करत असल्याचे, शरीरावर सोने, चांदी, रत्नांचे दागिने वापरात असल्याचेही तो लिहितो. प्रवासवर्णनात मोठमोठे बर्फाच्छादित पर्वत बघितल्याचे, तसेच भारतीय व चिनी लोकांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, संगोपन, कपडे परिधानाच्या पद्धती व उपचार पद्धतीबद्दलही तो लिहितो.
त्याने एकूण तीस ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख मिळतो; पण प्रत्यक्ष दोनच ग्रंथ उपलब्ध आहेत. आपला पूर्वेकडील प्रवास संपवून मसूदीने बसरा येथे स्थायिक झाल्यावर (९४७) मुरूज अल्-धहब वा-मअदिन अल् जवाहीर हे प्रवासवर्णन लिहिले. हा ग्रंथ पुढे एलॉय स्प्रेंगर यांनी मेडोज ऑफ गोल्ड अँड माइन ऑफ जेम्स या नावाने भाषांतरित केला (दोन खंड, १८४१). यात मसूदीने इस्लामपूर्व काळाचा आढावा घेऊन जगाची उत्पत्ती, उत्क्रांतिवाद व ऐतिहासिक घडामोडी तसेच वांशिक उलथापालथ यांची चर्चा केली आहे. दुसर्या खंडात त्याने इस्लाम धर्माचा इतिहास सांगून मुस्लीम जगताबाहेरील धार्मिक संकेतांची मीमांसा केली आहे. किताब अखबार अल्-झमन या शीर्षकाने मसूदीने जगाचा तीस खंडात्मक इतिहास लिहिला होता; परंतु त्यातील फारच थोडा भाग आज उपलब्ध आहे.
मसूदीचा दूसरा ग्रंथ किताब अल्-तनविह वा अल् अश्राफ (इं. भा. बुक ऑफ नोटीफिकेशन अँड रिव्ह्यू) हा त्याने मृत्यूपूर्वी आपल्या सर्व लेखनाचा संक्षिप्त आढावा घेण्याच्या दृष्टीने लिहिला. त्याची सर्व क्षेत्रांतील सर्वसंग्राहक बहुश्रुतता त्याच्या लेखनावरून जाणवते.
कैरोजवळील अल्-फुस्टॅट येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Ahmad, K. J. Hundred Great Muslims, Library of Islam, U.S.A., 1987.
- Hitti, Philip K. History of the Arabs, London, 1961.
- Nicholson, R. A. Literary History of the Arabs, Cambridge, 1930.
- Sprenger, Aloys, Meadows Of Gold and Mines of Gems, London, 1841.
- मोकाशी, रूपाली, ‘शिलाहार राजा झंझ आणि शिव मंदिराची आख्यायिका : पुराभिलेखीय अवलोकन’, भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक, पुणे, खंड ९३, वर्ष २०१६-१७.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर