ॲरॅकेसी कुलातील भेर्ली माड या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅरिओटा यूरेन्स आहे. नारळ व ताड हे वृक्षदेखील ॲरॅकेसी कुलात मोडतात. भेर्ली माडाची पाने माशांच्या शेपटीसारखी दिसतात, म्हणून त्याला इंग्रजी भाषेत ‘फिश टेल पाम’ असेही म्हणतात. कॅरिओटा प्रजातीमध्ये सु. १३ जाती असून त्या मूळच्या आशिया आणि दक्षिण पॅसिफिक प्रदेशांतील आहेत. भारत, श्रीलंका, मलेशिया इ. देशांतील वनांत भेर्ली माड वाढलेला आढळतो. सध्या जगात सर्वत्र त्याची लागवड सार्वजनिक बागा व खाजगी जागेत शोभेसाठी केली जाते. भारतातही हा वृक्ष सर्वत्र आढळत असून त्याला सूरमाड असेही म्हणतात.

भेर्ली माड (कॅरिओटा यूरेन्स) : फांद्या, पाने व फुलोरा यांसह वृक्ष

भेर्ली माड हा १०–१५ मी. उंच वाढतो. वृक्षाचे शेंडे खूप उंच असतात. बुंध्याचा व्यास ३०–५० सेंमी. असतो. खोडावरील खालची पाने गळून गेल्यावर खोड गुळगुळीत होऊन त्यावर आडव्या वलयाकृती खाचा दिसतात. पाने मोठी, एकाआड एक, द्विपिच्छक व काहीशी खालच्या बाजूला झुकलेली असून लांबी ५–६ मी. व रुंदी ३–४ मी. असते. पानांच्या प्राथमिक शाखा २ मी. लांब असून त्यानंतर द्वितीयक शाखा असतात. या द्वितीयक शाखांवर १–३ पर्णिका एकाआड एक येतात. पर्णिका चकचकीत हिरव्यागार, जाडसर, चपट व खालच्या बाजूने फिकट हिरव्या असतात. तसेच त्या तळाशी टोकदार आणि अग्रभागी रुंद व कातरलेल्या असतात. सर्वांत वर असलेल्या पानांच्या बगलेतून फुलोरा येतो. त्यानंतर क्रमाक्रमाने खालच्या पानांच्या बगलेतून फुलोरा यायला लागतो. फुलोरा सु. ३ मी. लांब व लोंबता असून नरफुले आणि मादीफुले एकाच वृक्षावर, परंतु वेगवेगळी येतात. फुले पांढरी असून ती गुच्छाने येतात. फुलांचे गुच्छ बारीक वेण्यांप्रमाणे बुंध्याला लोंबत असतात. फळे गोल आकाराची, प्रथम पिवळसर हिरवी आणि पिकल्यावर काळी होतात. फळांत सुपारीएवढ्या दोन काळ्या बिया असतात.

भेर्ली माडापासून नीरा मिळवितात. ते एक उत्साहवर्धक व पोषक पेय आहे. नीरा उकळून गूळ तयार करतात. म्हणून या वृक्षाला ‘जॅगरी पाम’ असे इंग्रजी भाषेत एक नाव आहे. नीरा आंबवून ताडी तयार करतात. खोडातून पिठूळ पदार्थ काढून त्यापासून औद्योगिक स्टार्च तयार करतात. त्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. खोडाचा उपयोग पन्हळीसारखा तसेच घराच्या बांधणीत व शेतीच्या अवजारांसाठी करतात. पानांपासून धागे मिळतात. त्यांपासून दोर बनवितात. बियांपासून बटणे व मणी तयार करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा