अग्निदलिक खडक, पेद्दापल्ली

पेद्दापल्ली (कोलार; कर्नाटक) गावामध्ये अग्निदलिक खडक (अग्नीमुळे तुकडे झालेला; Pyroclastic) असलेले हे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक. समानार्थी अर्थाने ह्याला इग्निमबराइट (Ignimbarite) म्हणून सुद्धा ओळखले जाते. परंतु यात फरक हा आहे की, ज्वालामुखीय स्फोटानंतर जेव्हा प्रवाही स्थितीत (flow conditions) सर्व प्रकारचे स्फोटशकली घन पदार्थ जास्त प्रमाणात असलेल्या राख पदार्थांच्या राशीला अग्रक्रम देत पुढे ढकलत नेऊन एकत्रित राशी तयार करतात, त्याला इग्निमबराइट म्हणतात. ह्याचे वर्गीकरण अग्निजन्य खडकात न करता अवसादी खडकांचा प्रकार म्हणून करतात. या विविध स्फोटशकली पदार्थांना एकत्रित आणण्याचे काम जेव्हा त्यांच्यातील उष्णतेमुळे वितळलेले कण ज्वालामुखीय काच पदार्थ, तसेच लाव्हारसाचे अंश करतात तेव्हा त्याला संधित खडक (Welded rock) म्हणतात.

पेद्दापल्ली येथील स्फोटशकली खडक हे संधित ॲग्लोमरेट (Welded Agglomerate) या प्रकारातील असून इग्निमबराइटच्या घटक राशींमध्ये ग्रॅनाइट, ग्रॅनाइट पट्टिताष्म, बेसाल्ट आणि पट्टीत लोहमय क्वॉर्ट्झाइट (Banded Ferruginous Quartzite) या जुन्या खडकांचे खूप मोठ्या प्रमाणात कोनीय (Angular) तुकडे आहेत, तर काही गोलाकारही (Rounded) समाविष्ट आहेत. यातील काही ग्रॅनाइट पट्टिताष्म (Granite Gneiss) खडकांचे तुकडे हे मोठ्या आकारांचे असून त्यांचा व्यास ८० सेंमी. पर्यंत आहे.

कोलार खाण ते बंगारपेट – बेटमंगला रस्त्यावर साधारण ७०० मी. पूर्वेला असलेले पेद्दापल्ली हे गाव प्रसिद्ध अशा कोलार सोन्याच्या खाणी असलेल्या भागात असून राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक गावाच्या वायव्य दिशेला आहे. या भागात आसपासच्या काही ठिकाणी उशी लाव्हाचा (Pillow lava) प्रकारही पाहावयास मिळतो.

संदर्भ :

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी