भूशास्त्रीय इतिहासाच्या सुरुवातीच्या अतिप्राचीन जीवविरहित अशा मोठ्या कालविभागाला आर्कीयन आद्य महाकल्प व त्या आद्य महाकल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला आर्कीयन गट म्हणतात. जीवाश्मांच्या आढळानंतर सुरुवात झालेल्या कँब्रियन कालखंडाच्या (सु. ५५० द.ल. वर्षांपूर्वी) पूर्वीच्या सर्वच खडकांचा समावेश तिच्यात न करता, त्यांच्यापैकी सर्वांत जुन्या अशा अग्निज आणि रूपांतरित खडकांचाच (ग्रॅनाइट; Granites, ग्रॅनाइटाभ; Granitoids, पट्टिताश्म; Gneisses व सुभाजा; Schists) त्यात समावेश केला जातो. जगभर मोठ्या प्रमाणात आढळणारे आणि मुख्यतः सर्व खंडांचे गाभा हे आर्कीयन खडकांचेच आहेत म्हणून त्यांना आद्य किंवा पायाभूत खडक (Fundamental rocks) असेही संबोधतात. परंतु या खडकांचे परस्परातील गुंतागुंतीचे स्वरूप हे जटिल असल्यामुळे त्यांना आद्य जटिल राशी (Fundamental Complex Assemblage) अशीही नावे दिली जातात. भारताच्या द्वीपकल्पाच्या बहुतांशी भागांत आर्कीयन खडक असून त्यातील बहुतेक क्षेत्र ग्रॅनाइटी व पट्टिताश्मी गटाने व्यापलेले आहे.

प्राचीन समुद्रांच्या तळावर साचलेल्या पहिल्या अवसादी गाळांचे व लाव्ह्यांचे थर आणि त्यांच्यात घुसलेल्या अग्निज खडकांच्या मुख्यतः ग्रॅनाइटांच्या राशी; या समवेतच भूशास्त्रीय कालखंडात झालेल्या पृथ्वीच्या कवचाच्या विवर्तनी हालचालींच्या परिणाम स्वरुप गाळ, लाव्हा व अग्निज खडकांचे रूपांतरण होऊन हे पट्टिताश्म व सुभाजा खडक (शैल गट) तयार झालेले असावेत असे भूवैज्ञानिकांचे मत आहे. द्वीपकल्पात आढळणारे सर्व सुभाज किंवा पट्टिताश्मी गटांचे खडक हे काही आधीच्या व काही नंतरच्या भूशास्त्रीय कांळात तयार झालेले आहेत. कर्नाटकातील पट्टिताश्मी खडक हे सुभाजात घुसलेल्या पातालिक अग्निज (Plutonic Igneous) खडकांपासून तयार झालेले आहेत.

द्वीपकल्पीय पट्टिताश्म राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक हे बंगळुरू (कर्नाटक) शहराच्या दक्षिण भागातील लालबाग टेकडीवर आहे. विजयनगर साम्राज्याचे सरदार मागाडी केम्प गौडा यांनी त्या काळातील शहराची एका बाजूची हद्द खूण म्हणून या ठिकाणी टेकडीवर बुरूज उभारलेला आहे.

लालबाग टेकडीवरील हा खडक प्रामुख्याने काळा अभ्रकी पट्टिताश्म (Biotite Gneiss) असून त्यांमध्ये फिक्या रंगातील ग्रॅनाइट ते ग्रॅनो डायोराइट प्रकारातील विभिन्नता काळ्या अभ्रकांच्या रेषीय रचनांसह पाहावयास मिळते. पट्टिताश्मांपेक्षाही जुन्या प्राचीन खडकांचे अवशेष काही ठिकाणी या पट्टिताश्मांमध्ये दिसून येतात. हा भाग पृथ्वीच्या प्राथमिक भूकवच प्रस्थापित होण्याच्या प्रक्रियांच्या घडामोडींशी संबंधित असावा असे भूवैज्ञानिकांचे मत आहे.

ह्या पट्टिताश्मांचे वय सु. २५०० ते ३४०० द.ल. वर्षांपूर्वी इतके असून ते तीन वेगवेगळ्या काळाच्या टप्प्यात (३४०० द.ल. वर्षांपूर्वी, ३३०० – ३२०० द.ल. वर्षांपूर्वी आणि ३००० – २९०० द.ल. वर्षांपूर्वी) तयार झालेले असावेत. आजही इथल्या खडकांचा अभ्यास भूशास्त्रज्ञांना भूकवच निर्मितेचे कोडे सोडविण्यासाठी महत्वाचा वाटतो.

संदर्भ :

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी