भू-पर्यटन हा अलीकडील काळात जगभर दृढ झालेला शब्द आहे. शाश्वत पर्यावरणाच्या प्रक्रियेला जोडण्यासाठी तसेच निसर्ग आणि भूवैज्ञानिकीय घडामोडींचे आंतरसंबंध समजून घेण्यासाठी भूविज्ञान सहल व भूवैज्ञानिकीय स्थळांना भेटी देणे असे याचे स्वरूप आहे.
भारतीय उपखंड हा पृथ्वीच्या अजीव अशा अब्जावधी वर्षांपूर्वीच्या काळापासून ते अलीकडील नवजीवन काळापर्यंतच्या अनेक भूवैज्ञानिकीय प्रक्रियांचे संग्रहालयी भांडार आहे. अगम्य अशा भूशास्त्रीय कालखंडातील कोट्यवधी वर्षांत घडलेल्या विविध घडामोडींचा प्रभाव येथील वेगवेगळ्या प्रदेशांवर पडलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण, अपवादात्मक, सौंदर्यपूर्ण, मनोरंजक अशा भूवैज्ञानिकीय वैशिष्ट्यांचे संग्रहण अनेक ठिकाणी आणि विविध भागांतून आपणास प्रत्ययास येतात. ही नैसर्गिक ठिकाणे गतकालखंडातील पुरापरिस्थितींवर प्रकाश टाकणाऱ्या असल्याने अर्वाचीन आणि प्राचीन कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी, तसेच त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कालौघात अशा कित्येक गोष्टी नैसर्गिक अथवा मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट होत आहेत.
भूशास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्व असलेले स्थान, समूह घटक किंवा घटक हे एक स्थळ किंवा क्षेत्र असते, ज्यांची भूवैज्ञानिकीय वैशिष्ट्ये (उदा., खडक, खनिज, भूस्वरूप, संरचनात्मक, विवर्तनी इ.) यांचा विचार करून त्यास उत्कृष्ट म्हणून मौल्यवान, दुर्मीळ, असुरक्षित किंवा धोक्यात असलेले असे वर्गीकृत करण्यात येते.
जेव्हा एखाद्या विशेष विभागामध्ये एकापेक्षा जास्त दुर्मिळ किंवा सुंदर आणि भूवैज्ञानिकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांचा समावेश असतो; तेव्हा त्यास “भू – उद्यान” (Geo – Park) म्हणून संबोधले जाते. अशी वैशिष्ट्ये त्या क्षेत्राच्या भूशास्त्रीय कालखंडाच्या इतिहासाचे, तसेच त्यासंदर्भातील घटना आणि प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करीत असतात.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने भारतातील यापैकी काही विशेष महत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण जागांना, राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारके (सध्या एकूण २६ ठिकाणे) म्हणून गौरविले आहे. त्यांचे वर्गीकरण आणि राज्य खालीलप्रमाणे :
अ.क्र | भूवैज्ञानिकीय स्मारके | राज्य |
१) | जीवाश्म उद्याने (Fossil Parks)
समुद्री गोंडवाना जीवाश्म उद्यान (Marine Gondwana Fossil Park) जीवाश्म लाकूड उद्यान (Fossil wood Park) सिवालिक जीवाश्म उद्यान (Fossil Park) स्ट्रोमॅटोलाइट उद्यान (Stromatolite Park) |
छत्तीसगड
राजस्थान, तमिळनाडू (२ ठिकाणी) हिमाचल प्रदेश
राजस्थान ( २ ठिकाणी ) |
२) | शिला स्मारके (Rock Monuments)
द्वीपकल्पीय पट्टिताष्म (Peninsular Gneiss) स्तंभीय बेसाल्ट (Columnar Basalt) उशी लाव्हा (Pillow Lava) अग्निदलिक खडक (Pyroclastic Rock) नेफेलीन सायेनाइट (Nepheline Syenite) बार पिंडाश्म (Barr Conglomerate) संधित टूफ (Welded Tuff) चार्नोकाइट (Charnockite) |
कर्नाटक कर्नाटक कर्नाटक, ओरिसा कर्नाटक राजस्थान राजस्थान राजस्थान तमिळनाडू |
३)
|
भूवैज्ञानिकीय आश्चर्य (Geological Marvels)
लोणार सरोवर (Lonar Lake) खडकांवरील चक्राकार खुणा (Eddy current Markings) नैसर्गिक कमान (Natural Arch) सेंद्रा ग्रॅनाइट (Sendra Granite) |
महाराष्ट्र गुजरात
आंध्रप्रदेश राजस्थान |
४) | इतर स्मारके (Other Monuments)
स्तरित स्मारके (Stratigraphic) – आद्य महाकल्पोत्तर अभिविसंगती जोधपूर श्रेणी आणि मलाणी अग्निज कुल संबंध बृहत सीमावर्ती भ्रंश आर्थिक स्मारके (Economic) – जांभा खडक संस्तरित बराइट्स गोसान |
आंध्रप्रदेश, राजस्थान राजस्थान
केरळ आंध्रप्रदेश राजस्थान. |
संदर्भ :
- Geological survey of India website , National Geography website.
- http://bhukosh.gsi.gov.in/Bhukosh/Geotourism.html.
- https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM_adf.ctrlstate=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!
समीक्षक : डॉ. बाळ फोंडके