मेहंदळे, अनंत महादेव : ( ७ फेब्रुवारी १९२८ – २४ एप्रिल १९९२ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. पुणे जिल्ह्यातील मळवली जवळ भाजे गावी महादेव आणि पार्वतीबाई यांच्या पोटी अनंतबुवांचा जन्म झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण सुरू असतानाच वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी पहिले कीर्तन करायचे भाग्य त्यांना लाभले आणि लहान वयातच त्यांना कीर्तनाची आवड निर्माण झाली. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील रोहा गावी संस्कृत पाठशाळेत त्यांचा वेदाध्ययन आणि संस्कृत भाषेचा अभ्यास सुरु होता. पुढे पुण्यातील साखरे महाराज मठात राहून माधुकरी मागून त्यांनी धार्मिक अभ्यासात शिक्षण सुरू केले. त्यांनी कोलकाता येथील संस्कृत भाषेसंबंधीच्या एका संस्थेची ‘ काव्यतीर्थ ‘ ही पदवी मिळवली. ही पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांना अष्टांग आयुर्वेद कॉलेजतर्फे त्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ती नोकरी स्वीकारण्यापूर्वी बुवांनी आधी आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण करून वैद्यकाची पदवी मिळवली आणि त्यानंतरच ही नोकरी स्वीकारली. ‘ आयुर्वेद प्रवीण ‘ परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिक्षकी पेशा स्वीकारण्याऱ्या अनंतबुवांनी नारदीय कीर्तनाचा अभ्यासही सुरू केला होता. वेदशास्त्रसंपन्न लक्ष्मणशास्त्री गुर्जर यांचेकडे नारदीय कीर्तनाचा अभ्यास त्याचबरोबर गायनाचे शिक्षण, यशवंतबुवा मराठे गुरुजी यांच्याकडे त्यांनी सुरु ठेवले. पंडित जितेंद्र अभिषेकी आणि अनंतबुवा हे सहाध्यायी होते. याच दरम्यान ” साहित्यरत्न ” ही पदवी देखील बुवांनी प्राप्त केली.
पुण्यातील ” श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा ” येथे आणि गोव्यात १९८५ ते १९९१ या काळात समर्थ रामदास प्रतिष्ठान आयोजित कीर्तन वर्गात बुवांनी कीर्तनाचे अध्यापन देखील केले. बुवांचा शिष्यवर्ग खूप मोठा आहे. कीर्तनकार म्हणून श्रेष्ठ असणारे बुवा उत्तम रंगकर्मी देखील होते. संस्कृत शाकुंतल,संगीत सौभद्र , संशयकल्लोळ, देवमाणूस, शिलेदार कंपनीच्या आस जिजाऊची आणि अस्तंगत भानू अशा अनेक नाटकातील भूमिका बुवा उत्तमप्रकारे वठवत असत. योगाभ्यासतही बुवा पारंगत होते. कीर्तन शिकणाऱ्या नवख्या होतकरू विद्यार्थ्यांकरीता अनंतबुवांनी दोन पुस्तके लिहिली . त्यातील पहिले पुस्तक कीर्तन कुसुम . या पुस्तकात पूर्वरंग आणि चरित्र आहेत . तसेच दुसरे पुस्तक स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण चरित्र कीर्तनातील वृत्त रचनांसह लिहिले आहे . वैद्यकी सोडून चरितार्थाकरिता संपूर्णतः हरिकीर्तनाचा मार्ग स्वीकारून बुवांनी पंचावन्न वर्षे अखंड कीर्तन सेवा केली. आयुष्यभर कीर्तन हाच ध्यास घेवून भारतभर कीर्तने केली. त्यांनी अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले. ‘ कीर्तनकला निधी ‘ , ‘ काव्यतीर्थ ‘, ‘तत्वचिंतन रवी ‘ , ‘ कोटीभास्कर ‘ आणि आयुर्वेद विषयातील वैद्यक पदवी प्राप्त केलेल्या बुवांनी ‘ श्री हरिकीर्तनोत्तजेक सभा ‘ या संस्थेत अनेक वर्षे कार्यवाह, कुलपती, कार्योपाध्यक्ष इ . पदे देखील भूषवली आहेत.