फ्रायर, जॉन : ( १६५०–३१ मार्च १७३३ ). परकीय प्रवासी आणि वैद्यक. त्याचा जन्म लंडन येथे झाला. तो विल्यम फ्रायर याचा सर्वांत मोठा मुलगा. त्याचे शिक्षण केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले. येथून तो पेमब्रोक कॉलेजमध्ये गेला (२३ जुलै १६७१). तेथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्याने ‘बॅचलर ऑफ मेडिसीन’ ही पदवी मिळवली (१६७२).

फ्रायरची शल्यविशारद म्हणून सुरतेतील ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीत नेमणूक झाली (१६७२). १३ डिसेंबर १६७२ रोजी तो इंग्लंडहून सुरतेला जाण्यासाठी ‘युनिटी’ या जहाजातून निघाला. त्याच्या ताफ्यातील मुख्य जहाजाचे नाव ‘लंडन’ असे होते. ९ फेब्रुवारी १६७३ रोजी तो केप व्हर्दे येथे पोहोचला. पुढे ३ एप्रिल १६७३ रोजी फ्रायरचे जहाज भरकटले. मार्गावर परत येत त्यांनी मालदीव गाठले. १६ जून १६७३ ला त्यांना सिलोन म्हणजे सध्याचा श्रीलंकेचा किनारा दिसला. त्यांना पाँडिचेरीच्या पुढे एका इंग्लिश वखारीवर डच झेंडा फडकताना दिसला. तेथील डच लोकांनी त्या परिसराची नाकेबंदी केलेली होती. पुढे फ्रायर मछलीपट्टनमच्या किनाऱ्यावर उतरला. तेथे त्याने गोवळकोंडा येथील राज्य कारभाराची, तसेच दक्षिणेतील राजकारणाची माहिती मिळवली. त्याने आपल्या लेखनात मछलीपट्टनम मधील इमारती, बागा, ब्रिटिश आणि पोर्तुगीज वसाहती, तेथे असणारे राजपूत, मुरीश म्हणजे मुस्लिम, फ्रेंच, डच व स्थानिक लोक यांचे वर्णन केले आहे. तेथील स्त्री पुरुषांच्या वेशभूषेबद्दल तो माहिती देतो, तसेच राजाच्या राजधानीचे गोवळकोंडा हे शहर मछलीपट्टनम पासून १५ दिवसांच्या अंतरावर असल्याचे नमूद करून राजाचे उत्पन्नाचे मोठे साधन म्हणजे या राज्यात असणाऱ्या हिऱ्यांच्या खाणी अशी माहिती त्याने दिली आहे. गोवळकोंड्याच्या राजाजवळ १ लाखाचे सैन्य आणि २०० हत्ती असल्याचे तो लिहितो. फ्रायरने तेथील चलनाबद्दल त्रोटक माहिती दिलेली आहे.

फ्रायर ३० जुलै १६७३ रोजी मद्रासला व पुढे प्रवास करत तो १६७३ च्या डिसेंबरमध्ये मुंबईला पोहोचला. त्याने मुंबईला जाताना वाटेत गोव्याच्या किनाऱ्यावरील किल्ल्यांबद्दल व गोव्यातील इमारती, सेंट झेविअर चर्च, त्यातील सेंट झेविअरचा सांगाडा, बागा, दफनभूमी, इतर लहान मोठी चर्च यांबद्दल लिहले आहे. तो गोव्यात असताना दक्षिणेकडील अंकोल्याला गेला होता. तो तेथे पोहोचण्यापूर्वी काही काळ छ. शिवाजी महाराजांनी अंकोला लुटून उद्ध्वस्त केल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. परतीच्या प्रवासात तो गोकर्ण महाबळेश्वरला भेट देऊन गोव्यातील मिरजन किल्ल्यापाशी आला. मिरजन हा किल्ला उंच टेकडीवर असून किल्ल्याला दुहेरी तटबंदी असल्याचे आणि भोवती खंदक असल्याचे, तसेच बुरजांवर तोफा पाहिल्याचे तो लिहितो. छ. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर गेल्याचे तो नमूद करतो. पुढे तो वेंगुर्ल्यातील डच वखारीत गेला व तिचे वर्णन त्याने केले आहे. वेंगुर्ल्यात फिरताना त्याने सती जाण्याचा प्रसंग बघितल्याचे व सतीच्या स्मृतीसाठी काही बांधकामे (सतीशीळा) केलेली असल्याचे तो म्हणतो. याला तो विरगळ म्हणून संबोधतो. मुंबईला जाताना ‘सेरापटनं’ म्हणजे ‘श्रीवर्धन’ जवळ राजापूर येथे छ. शिवाजी महाराजांचा मजबूत किल्ला असल्याचे आणि खाडीत महाराजांचे ३० छोट्या बोटींचे आरमार सज्ज असल्याचे तो लिहतो. यावेळी विजापूरचा कारभार खवासखानाच्या हातात असल्याचे तो नमूद करतो.

फ्रायरने आपल्या लेखनात छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची नोंद केली आहे. या शिवाय ‘रायरी’ हे महाराजांचे मुख्य स्थान असल्याचे तो लिहितो. प्रवास करत तो मुंबईला पोहोचला. मुंबईची बेटे, ठाणे आणि तेथील किल्ले यांची त्याने वर्णने केली आहेत. तेथून तो वसईला गेला. वसईच्या किल्ल्याच्या वर्णनात तो या किल्ल्याला मजबूत तटबंदी असून दोन दरवाजे आहेत, किल्ल्यावर ४२ तोफा असून किल्ल्यात ६ चर्च, ४ कॉन्व्हेंट, २ विद्यालये असल्याचे लिहितो. येथील लोक नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात अशीही माहिती तो देतो. यापुढे त्याने हेन्री ऑक्झिंडेनबरोबर राज्याभिषेक समयी रायगडला दिलेल्या भेटीचे वर्णन केलेले आहे. या वर्णनात तो लिहितो, ‘आम्ही रात्री ९ वाजता चौलला पोहोचलो. किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले असल्यामुळे आम्ही रात्र सेंट सेबॅस्टीयन या छोट्या चर्चमध्ये काढली. दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता आम्हाला छ. शिवाजी महाराज चिपळूणवरून रायरीला पोहोचल्याचे समजले. आम्ही चौल शहरापासून २ मैल अंतरावरील राजाच्या प्रदेशात वरच्या चौलमध्ये गेलो. तेथे महाराजांच्या सुभेदाराला भेटलो. त्याने आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्या दिवशी आम्ही बोटीतून ‘अष्टमी’ या गावात पोहोचलो. तेथून आम्ही प्रवास करत निजामपूर, गंगावली मार्गे रात्री ९ वाजता पाचाड येथे पोहोचलो. तेथे आम्हाला महाराज ‘प्रतापगडला’ भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे समजले. ते परत येईपर्यंत आम्ही पाचाडातच मुक्काम केला.’ तेथे त्याने निराजी पंडितला भेटल्याचे, तसेच राजा व इतर मंत्र्यांना भेटवस्तू दिल्याचे लिहिले आहे. दोन दिवसांनी त्याला किल्ल्यावर येण्याची परवानगी मिळाली. त्याने रायगडचे वर्णन करून ठेवले आहे. पुढे त्याने इंग्रजांच्या वतीने मांडलेल्या तहाबद्दल लिहून ठेवले आहे. रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यास हा उपस्थित असल्यामुळे त्याने राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करून ठेवलेले आहे. पाऊस थांबल्यावर फ्रायर रायगडावरून सुरतेकडे परतला.

काही काळ सुरतेत वास्तव्य केल्यावर फ्रायर एप्रिल १६७५ मध्ये मुंबईस आला. तेथून त्याला जुन्नरच्या मोगल सरदाराकडे पाठवण्यात आले. कल्याण, टिटवाळा, मुरबाड, धसई, आहुपेघाट, आंबेगाव मार्गे एप्रिल १६७५ मधील शेवटच्या शुक्रवारी तो जुन्नरला पोचला. त्याने जुन्नरमधील सरदारांच्या दरबाराचे व सरदारांच्या बेगमांवर केलेल्या उपचाराचे, जनानखान्यातल्या चालीरितींचे आणि शिवनेरी किल्ल्याचे वर्णन केले आहे. जुन्नरला काही दिवस राहून त्याने २२ मे १६७५ रोजी जुन्नर सोडले व नाणेघाट, वैशाखरे, मुरबाड मार्गे तो मुंबईला परतला. सह्याद्री, त्यावरील किल्ले, किल्ल्यांचा कारभार याबद्दल त्याने विस्तृत लेखन केलेले आढळते. यात प्रामुख्याने रायगड व शिवनेरी या दोन वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांची वर्णने विशेष आहेत. पुढे फ्रायरने गोवा, कारवार, परत सुरत असा प्रवास करत १६७९ मध्ये भारताचा निरोप घेतला व पर्शियामध्ये काही वर्षे घालवून १६८२ मध्ये तो मायदेशी परतला. मायदेशात परत आल्यावर त्याने १६८३ मध्ये ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’ ही पदवी मिळवली. त्याच्या भारत व पर्शिया भेटीचा पत्ररूपी वृत्तांत अ न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया बिइंग नाइन यिअर ट्रॅव्हल्स १६७२-१६८१  या ग्रंथात प्रसिद्ध आहे.

लंडन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :

  • Crooke, William, A New Account of East India and Persia. Being Nine Year’s Travels 1672-1981, By John Fryer, New Delhi, 1992.

                                                                                                                                                                                    समीक्षक : प्रमोद जोगळेकर