चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक सिद्ध. गौड देशात (पूर्वी भारत) एका क्षत्रिय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा संबंध वज्रतंत्राशी असल्याचे सांगितले जाते. तिबेटमधील सा-स्क्य-विहार (सु. ११-१३ वे शतक) येथील सिद्धांच्या सूचीमध्ये त्यांचे नाव गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ यांच्या नंतर पाहावयास मिळते. भोटिया-ग्रंथ-संग्रह तंजूरमध्ये त्यांच्या गुरूचे नाव ‘भद्रपा’ दिलेले आहे. यामध्ये त्यांचे गुह्याभिषेक-प्रक्रिया, महाभिषेकत्रिक्रम, वज्रडाकिनीनिष्पन्न-क्रम हे तीन ग्रंथ आढळतात. चर्यागीतिमध्येही त्यांची गीते आली आहेत. वीणा वाजवून ते त्यांच्या पदांचे गायन करत, म्हणून त्यांचे नाव वीणापा पडल्याचे सांगितले जाते.
एका दंतकथेनुसार ते ‘गौड’ देशातील एका राजाचे एकुलते एक पुत्र होते. आठ सेविका व संगीतकार त्यांच्या सेवेत असत. वीणापा जसजसे मोठे होत गेले, तसतसे वीणा वाजविण्यात अधिकच रुची घेऊ लागले. परंतु राजा व राजदरबारातील मंडळींना हे मान्य नव्हते. राजकुमाराने राजनीतीमध्ये सहभाग घ्यावा अशी सर्वांची इच्छा होती. राजकुमाराचे मतपरिवर्तन करण्यासाठी भद्रपा (बुद्धपा) नावाच्या सिद्ध-पुरुषाला आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर भद्रपाने वीणापांचे मन वळवून त्याला दीक्षा दिली, अशी दंतकथा प्रचलित आहे.
राहुल सांकृत्यायन यांनी पुरातत्त्व निबंधावलीमध्ये दिलेल्या सिद्धांच्या चित्रांमध्ये वीणापांचे चित्रण दिसून येते. या व्यतिरिक्त तिबेटमध्ये त्यांची इतर चित्रे पाहावयास मिळतात. आतापर्यंत त्यांची दोन शिल्पे आढळून आलेली आहेत. गुजरातमधील डभोई येथे महुडी नावाच्या तोरणद्वारावर चौऱ्याऐंशी सिद्धांच्या शिल्पांमध्ये चौरंगीनाथ व गोरक्षनाथ यांच्या नंतर एक योगी वीणेसमवेत कोरण्यात आलेला आहे. हे संभवतः वीणापा यांचे शिल्प असावे. दुसरे शिल्प पन्हाळे-काजी येथील लेणे क्र. २९ मध्ये चौऱ्याऐंशी सिद्धांच्या शिल्पांमध्ये कोरण्यात आलेले आहे. या शिल्पांमध्ये त्यांना वीणेसमवेत दर्शविले आहे.
संदर्भ :
- Dowman, K. Masters of Mahamudra : Songs and Histories of the Eighty-Four Buddhist Siddhas, New York, 1985.
- सांकृत्यायन, राहुल, पुरातत्त्व निबंधावली, मुंबई, १९५८.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर