पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी सत्य हा दुसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र २.३०). पतंजलींनी योगसूत्रात सत्याची व्याख्या दिलेली नाही. योगसूत्रावरील भाष्यात व्यासांनी सत्याची व्याख्या ‘जो पदार्थ जसा असेल किंवा जी घटना जशी असेल त्याविषयी तशीच वाणी उच्चारणे आणि जी वाणी उच्चारली तोच अभिप्राय मनात असणे याला सत्य असे म्हणतात’ अशी केली आहे ( सत्यं यथार्थे वाङ्मनसे । व्यासभाष्य २.३०). याचा अर्थ असा होतो की, ज्या वस्तूविषयी किंवा घटनेविषयी निवेदन करावयाचे आहे ते, ती वस्तू जशी असेल तसेच असले पाहिजे आणि जी घटना जशी घडली तसेच अर्थात् वस्तुस्थितीला धरून असले पाहिजे. यथार्थ वर्णनात संदिग्ध भाषेचा वापर करता कामा नये. ते प्रतिपादन प्रत्यक्ष, अनुमान किंवा शब्दप्रमाण यांच्या कसोटीला उतरले पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिपादनाला यथार्थ प्रतिपादन म्हणतात. हे यथार्थ प्रतिपादन म्हणजे सत्य होय.
दुसऱ्याला आपण जे सांगतो ते वास्तविक असले पाहिजे. एखाद्या घटनेचे स्वत:ला झालेले ज्ञान इतरांना करून देताना ते मूळ घटनेशी द्रोह करणारे अथवा मिथ्या नसावे. तसेच ते ज्ञान ज्याला द्यावयाचे आहे त्याच्यामध्ये यथार्थ ज्ञान उत्पन्न करण्याचे सामर्थ्य वाणीमध्ये असले पाहिजे. तरच ते सत्य ठरेल. कौरव-पांडव युद्धामध्ये द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने लढत होते. त्यांचा पाडाव करण्यासाठी त्यांचे मनोधैर्य खच्ची करणे आवश्यक होते. त्यामुळे भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती हेतुत: युद्धात मारला (महाभारत ७.१९०.१४) आणि तसे निवेदन युधिष्ठिराला केले. पुढे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून द्रोणाचार्यांना ‘अश्वत्थामा मरण पावला’ असे सांगितले. युधिष्ठिर सदैव सत्य बोलतो म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला ‘अश्वत्थामा मरण पावला का?’ असे विचारले असता ‘अश्वत्थामा मरण पावला’, असे सांगून पुढे मन्द स्वरात ‘या नावाचा हत्ती’ असे उत्तर युधिष्ठिराने दिले (महाभारत ७.१९०.५५). अश्वत्थामा नावाचा हत्ती मरण पावला होता हे सत्य होते. युधिष्ठिराला हत्तीच्या मृत्यूचे ज्ञान झाले होते. परंतु, त्याच्या वचनातून ‘हत्तीच्या मृत्यूचे ज्ञान’ हे यथार्थ ज्ञान होण्याऐवजी ‘अश्वत्थामा (द्रोणाचार्यांचा पुत्र) मरण पावला’ असे पुत्रवधाचे मिथ्या ज्ञान द्रोणाचार्यांना झाले आणि त्यांनी शस्त्र खाली ठेवले. म्हणून युधिष्ठिराची ही वाणी असत्य होय (तत्त्ववैशारदी २.३०).
सत्यरूप वाणी जीवांवर उपकार करण्यासाठीच असली पाहिजे. जर यथार्थ वाणीने कोणत्याही जीवाची हानी होत असेल तर ती वाणी पापालाच कारणीभूत होईल. म्हणून सत्य वाणीचे उच्चारण सर्व जीवांच्या हितासाठीच असले पाहिजे (व्यासभाष्य २.३०).
सत्यवाणी हिंसेला कारणीभूत झाल्यास ती पापाचे कारण होईल म्हणून योग्य परीक्षा करून सर्व प्राणिमात्रांना हितकारक असे सत्य बोलावे (व्यासभाष्य २.३०).
चोरांनी ‘तांडा कोणत्या दिशेने गेला?’ असे विचारल्यावर वस्तुस्थिति सांगितल्याने ते उत्तर सत्य असले तरी व्यापाऱ्यांच्या तांड्यावर अपकार करणारे असल्याने असत्यच समजावे, त्या वाणीच्या उच्चारणाने पापच लागते. एखाद्याचा प्राणनाश होत असता त्याचा जीव वाचविण्यासाठी असत्य भाषण करण्याला अनुमती आहे.
“सत्यवचनामुळे योग्याची वाणी तो म्हणेल ते क्रियेचे फल देते” असे पतंजलि म्हणतात (सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम् | योगसूत्र २.३६). व्यास म्हणतात की, सत्यनिष्ठ योग्याने ‘तू धार्मिक व्हावेस’ किंवा ‘तू स्वर्ग मिळवशील’, यासारखा आशीर्वाद दिल्यास त्याची वाणी अमोघ ठरते. राजमार्तंड या ग्रंथात भोज असे म्हणतात की, सत्यवचनी योग्याने यागादिक क्रियांचे अनुष्ठान केले नाही तरीही त्यांचे फळ त्याला स्वत:ला तर मिळतेच शिवाय ‘तुला अमुक याग केल्याचे फळ मिळेल’ असा आशीर्वाद त्याने ज्याला दिला त्यालाही अनुष्ठानावाचून त्या यागाचे फळ प्राप्त होते.
स्कन्दपुराणात “सत्य बोलावे, प्रिय बोलावे, अप्रिय असलेले सत्य बोलू नये, प्रिय वाटेल परंतु, असत्य असेल असे वचन उच्चारू नये हा धर्म होय,” असा व्यावहारिक उपदेश केला आहे (स्कन्दपुराण ३.२.६.८८).
सत्य हे मानवासाठी शाश्वत मूल्य आहे.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर