पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी अस्तेय हा तिसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा । योगसूत्र २.३०). अस्तेय म्हणजे ‘चोरी न करणे’. पातंजल योगसूत्रावरील व्यासभाष्यात आणि व्यासभाष्यावरील तत्त्ववैशारदी या वाचस्पति मिश्रांनी लिहिलेल्या टीकेमध्ये अस्तेय ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी प्रथम स्तेय म्हणजे काय हे सांगितले आहे. ‘शास्त्राने निषिद्ध केलेल्या मार्गाने दुसऱ्याचे द्रव्य स्वीकारणे’ म्हणजे स्तेय होय अशी स्तेयाची व्याख्या व्यास यांनी केली आहे. अशा प्रकारच्या द्रव्य स्वीकारापासून परावृत्त होणे आणि मनानेदेखील दुसऱ्याची संपत्ती ग्रहण करण्याची इच्छा न बाळगणे म्हणजे ‘अस्तेय’ होय अशी अस्तेयाची परिभाषा वाचस्पति मिश्रांनी केली आहे (तत्त्ववैशारदी २.३०).
सर्व वाचिक आणि कायिक व्यापारांचे मूळ मनोव्यापारात असते. त्यामुळे मनोव्यापाराच्या संदर्भात ‘अस्पृहा अर्थात् दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा न बाळगणे हे अस्तेयाचे लक्षण आहे’ असे व्यास म्हणतात. त्यांच्या या मताला वाचस्पति मिश्र दुजोरा देतात (तत्त्ववैशारदी २.३०). तात्पर्य, अस्तेय म्हणजे केवळ चौर्यक्रियेचा अभाव नसून तद्विषयक अभिलाषेचा त्याग देखील त्या संकल्पनेत अंतर्भूत आहे.
चोराने चोरी करून मिळविलेल्या धनाविषयी त्याची स्वामित्वाची म्हणजे ‘हे माझे आहे’ अशी जी भावना ती देखील स्तेयरूपच आहे असे व्यासभाष्यावरील अन्य टीकाकार विज्ञानभिक्षु म्हणतात. तसेच ‘अपहरण केलेले धन हे माझेच आहे’ असा भ्रम देखील स्तेय होय असेही विज्ञानभिक्षु म्हणतात (व्यासभाष्यावरील योगवार्त्तिक २.३०). हा आशय भगवद्गीतेतील १६ व्या अध्यायात आसुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या आचरणाचे वर्णन करताना ‘हे धन माझे आहे आणि हे सुद्धा माझेच होईल’, या शब्दात व्यक्त केला आहे (इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ।। भगवद्गीता १६.१३). ईश्वरगीतेमध्ये ‘स्तेय म्हणजे चोरी करून अथवा बळाचा वापर करून परद्रव्याचे अपहरण करणे, तर स्तेयापासून निवृत्त होणे म्हणजे अस्तेय होय’ अशी अस्तेयाची नेमक्या शब्दात व्याख्या केली आहे (परद्रव्यापहरणं चौर्याद्वाथ बलेन वा । स्तेयं तस्यानाचरणमस्तेयं धर्मसाधनम् ।। ईश्वरगीता-कूर्मपुराण, ११.१७). बळाचा वापर करणे म्हणजे शस्त्राचा धाक दाखविणे किंवा शस्त्राने प्रहार करणे असे नारायणतीर्थ योगसिद्धान्तचन्द्रिकेत म्हणतात (बलेन शस्त्रादिप्रदर्शनघातादिना । योगसिद्धान्तचन्द्रिका २.३०).
धर्ममार्गाने जो अर्थलाभ होईल तोच प्रशस्त व खरा होय. अनीतीच्या मार्गाने झालेला अर्थलाभ हा निंद्य व अशाश्वत असतो असे महाभारतात प्रतिपादन केले आहे (महाभारत १२.२८४.२४).
भीष्माने परद्रव्याचे हरण करणे हे पापाचे अधिष्ठान आहे असे म्हटले आहे (महाभारत १२.१५२.७). मात्र, दान इत्यादिद्वारे धन प्राप्त झाल्यास त्याला स्तेय म्हणता येणार नाही असे विज्ञानभिक्षु स्पष्ट करतात (व्यासभाष्यावरील योगवार्त्तिक २.३०).
कुल्लूकाने मनुस्मृतीवरील टीकेमध्ये अस्तेयाची व्याख्या ‘अन्यायपूर्वक परद्रव्य न स्वीकारणे’ अशी केली आहे (अन्यायेन परधनस्य अग्रहणम् । मनुस्मृति १०.६३).
अस्तेय आचरणात आणले असता योगी प्रकर्षाने निरभिलाष असला तरी त्याला अनायास दिव्य रत्नांचा लाभ होतो असे पतंजलि म्हणतात (अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम् । योगसूत्र २.३७). अभ्यासरूपी धर्माचे पालन केल्याने त्याला हा लाभ होतो असे नारायणतीर्थ म्हणतात (योगसिद्धान्तचन्द्रिका २.३७).
जैनदर्शनावरील उमास्वातिविरचित तत्त्वार्थसूत्रात अस्तेय हे पाच व्रतांपैकी एक व्रत मानले आहे (हिंसानृतस्तेयाब्रह्मपरिग्रहेभ्यो विरतिव्रतम् । ७.१). बौद्ध दर्शनात अंगुत्तरनिकायात पंचशीलामध्ये अस्तेयाचा समावेश केला आहे (अत्तना पाणातिपाता पटिविरतो होति । अंगुत्तरनिकाय-सिख्खापदसुत्त; पाणातिपातीसुत्त, भिक्खुसुत्त) अशा रीतीने भारतीय दार्शनिक परंपरेत अस्तेय व्रताला महत्त्व दिले आहे.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर