मनोरुग्णाचा रुग्णालयातील प्रवेश आणि रुग्णालयातून रवाना होण्याची प्रक्रिया हे घटक मानसिक आरोग्य कायदा या विषयांतर्गत अभ्यास केले जातात. मनोरुग्ण परिचर्या या प्रशिक्षण अभ्यासक्रमात याचा समावेश केला जातो.
मानसिक आरोग्य कायदा १९८७ : १९८७ मध्ये भारतीय मानसिक आरोग्य कायदा तयार केला गेला. परंतु सर्व राज्य आणि भारतीय संघटक प्रदेशांमध्ये त्याची अंमलबजावणी १९१२ मध्ये करण्यात आली. मानसिक आरोग्य कायदा या कायद्याने १९१२ च्या भारतीय मानसिक आजार कायद्याची जागा घेतली. या कायद्यांतर्गत पाठ क्रमांक चार आणि पाठ क्रमांक पाच या दोन पाठांमध्ये रुग्णालयात मनोरुग्ण प्रवेश आणि रवाना प्रक्रिया आहे.
पाठ / कलम क्रमांक चार हे मानसिक रुग्णाच्या मनोरुग्णालयात प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. यामध्ये मानसिक रुग्णाला रुग्णालयात प्रवेश करण्याचे प्रकार पुढील प्रमाणे मांडले आहेत.
- स्वेच्छेने रुग्णालयात प्रवेश (Volunatary Basis).
- विशेष परिस्थितीत रुग्णालयात प्रवेश (under special Circumstances).
- अधिकार किंवा सूचना अंतर्गत प्रवेश (Admission under Authority or order).
- तात्पुरते उपचार सूचना (Temporary Treatment Order)
- अर्ज तत्त्वावर उपचार सूचना (Reception Order on Application).
- दंडाधिकाऱ्यांसमोर मानसिक आजारी व्यक्तीस उपचार सूचना (Reception Order on production of mentally ill person before magistrate)
- प्रवेशित सूचना (Reception order after inquest)
- मानसिक रुग्ण कैद्याचा प्रवेश आणि ताबा (Admission and detention of a mentally ill prisoner).
मनोरुग्णाचा रुग्णालयात प्रवेश प्रक्रियेत परिचारिकेची भूमिका :
- रुग्णाला रुग्ण कक्षात बसवून त्याचे स्वागत करतात.
- रुग्ण आणि रुग्ण कक्षातील इतर कर्मचारी यांची एकमेकांशी ओळख करून दिली जाते.
- मानसिक रुग्णाच्या शारीरिक व भावनिक बाबींचा विचार करून त्याला रुग्ण कक्षेत योग्य त्या ठिकाणी बेड नियुक्त करतात.
- ज्या रुग्णात आत्महत्या करण्याची कल्पना किंवा आत्महत्या करण्यासारखे मानसिक लक्षणे असतील अशा रुग्णाकडे विशेष लक्ष देण्यासाठी अशा रुग्णाला विशेष कक्षात ठेवतात.
- मानसिक रुग्णाला रुग्णालयातील विविध सुविधा जसे स्नानगृह उपलब्धता, करमणूक सोयी व चहापान सुविधा या सर्वांचा परिचय करून त्यांचा वापर कसा केला पाहिजे हे समजावून सांगतात.
- रुग्णाला रुग्णालयातील किंवा प्रभागातील काही नियमांचा परिचय करून देतात. उदा., रुग्णाची जेवणाची वेळ, रुग्ण प्रभागातील दैनंदिन उपक्रम, नातेवाईकांना रुग्णास भेटण्याची वेळ, समूह बैठकीच्या वेळा इत्यादी.
- मानसिक रुग्णाची कोणतीही शारीरिक दुखापत किंवा आजारासाठी पूर्ण शारीरिक तपासणी करतात.
- रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णाने रुग्णालयात प्रवेश करण्याआधी व्यवस्थित जेवण केले आहे का नाही ही विचारणा करून माहिती घेते व जेवण केले नसल्यास रुग्णाला जेवण देतात.
- मानसोपचार तज्ञाच्या निर्देशानुसार रुग्ण रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी रुग्णाची पूर्ण माहिती घेऊन त्याचे मानसिक निरीक्षण करण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण करतात.
- रुग्णाला रुग्णालयात प्रवेशित करण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांकडून त्यांच्या कायदेशीर बाबींची चौकशी करून आवश्यक असल्यास त्याबाबत योग्य ती कायदेशीर माहिती समजावून सांगतात.
- रुग्णाच्या संदर्भात आवश्यक त्या नोंदी लिहून रुग्णाला रुग्ण कक्षेत प्रवेश देऊन रुग्ण प्रवेशित झाल्याची नोंद पूर्ण करतात.
- रुग्णाला रुग्णकक्षेत प्रवेशित करताना परिचारिका त्याच्या वैयक्तिक वस्तू, उदा., मनगटी घड्याळ, पैसे, दागदागिने यांसारख्या वस्तू सुरक्षित ठेवून या वस्तू रुग्णाच्या नातेवाईकांकडे स्वाधीन करतात.
- रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयात प्रवेश प्रक्रियेदरम्यान उपचार संमती घ्यावी लागते. रुग्णाच्या नातेवाईकांनी संमतीपत्र काळजीपूर्वक वाचून स्वाक्षरी केली आहे की नाही याची खात्री करून घेतात, जर रुग्णाच्या नातेवाईकांनी हे संमतीपत्र भरलेले नसतील तर ते परिचारिका रुग्णाकडून किंवा रुग्णाच्या नातेवाईकांकडून भरून घेते.
- मानसिक आजाराच्या तीव्रतेने विचलित असलेल्या व्यक्तींना रुग्णालयात प्रवेशादरम्यान मानसोपचार तज्ञांसोबत परिचारिका ही स्वतःला प्रेमळ, काळजी घेणारी, शांत व सक्षम व्यक्ती असे दर्शविते जेणेकरून रुग्णाला परिचारिकेकडून मिळणाऱ्या उपचारांबद्दल विश्वास निर्माण होतो व रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.
पाठ क्रमांक पाच हे रुग्ण हा रुग्णालयातून रवाना होण्याचा/ घरी जाण्याच्या अंतर्गत होणाऱ्या वेगवेगळ्या रवाना प्रक्रिया यांचा यात समावेश आहे :
- स्वतःच्या इच्छेवर दाखल झालेल्या रुग्णाला रवाना करणे.
- विशेष परिस्थितीत दाखल झालेल्या रुग्णाला रवाना करणे.
- सूचना अंतर्गत दाखल झालेल्या रुग्णाला रवाना करणे.
- पोलिसांनी दाखल केलेल्या रुग्णाला रवाना करणे (Discharge of patient admitted By Police)
- मानसिक आजारी कैदी रुग्णाला रुग्णालयातून रवाना करणे (Discharge of mentally ill prisoner).
- अनुपस्थित / सुट्टी देऊन (कलम ४५) रुग्णाला रवाना करणे (Leave of absence, section – ४५).
मनोरुग्णाला रुग्णालयातून रवाना करण्याच्या प्रक्रियेत परिचारिकेची भूमिका :
- रुग्ण रुग्णालयातून रवाना होताना रुग्णासोबत योग्य असलेली औषधे व सर्व वैयक्तिक वस्तू आहेत की नाही याची खात्री करूनच रुग्णाला रुग्णालयातून रवाना करतात.
- रुग्णालयातून रुग्ण रवाना होताना भविष्यातील उपचारा संदर्भात पाठपुरावा भेट निश्चित झाली की नाही याची खात्री करतात.
- रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मुख्यत: औषधे व खाण्याची पथ्ये या संबंधित माहिती देऊन औषधांचा अपेक्षित व अनपेक्षित परिणाम आणि फायदे समजून सांगतात.
- रुग्णालयातून रुग्ण रवाना होताना रुग्णाचे रुग्णालयात आवश्यक असलेली कागदपत्रे व त्या कागदपत्रांवर नातेवाईक व रुग्णाची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घेतात.
- रुग्णालयातून रुग्ण रवाना झाल्यानंतर रुग्णासंदर्भातील सर्व कागदपत्रे जसे परिचर्येच्या व वैद्यकीय अशा सर्व नोंदी रुग्णालयीन नोंद विभागात पाठवतात.
- रुग्ण रुग्णालयातून घरी रवाना होण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास रुग्णास व रुग्णाच्या नातेवाईकांना या प्रक्रियेत मदत करतात.
रुग्णास विशिष्ट सुट्टी (पॅरोल) देऊन रुग्णालयातून रवाना करताना परिचारिकेची भूमिका :
काही कौटुंबिक कार्यक्रम व विशिष्ट धार्मिक विधींसाठी उपस्थित राहण्यासाठी रुग्णाला घरी जाण्यासाठी दिलेली परवानगी या प्रक्रियेला पॅरोल असे म्हणतात.
- पॅरोल प्रक्रियेत रुग्ण रुग्णालयातून रवाना होताना ज्या उद्देशाने रुग्णाला घरी पाठविले जात आहे आणि रुग्णाला रुग्णालयात परत केव्हा आणले पाहिजे याबद्दल नातेवाईकांना स्पष्टपणे सूचना देतात.
- पॅरोल प्रक्रियेत रुग्ण रुग्णालयातून रवाना होताना डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांनुसार मानसिक आजारपणात आजारी व्यक्तीशी नातेवाईकांनी कसे वागावे या सूचनांचे मार्गदर्शन करतात.
- जर रुग्ण औषधांसह सुट्टी घेऊन रुग्णालयातून रवाना होत असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांना रुग्णाच्या औषधांचा नियमितपणा व त्याच्या दुष्परिणामांची माहिती देतात.
- पॅरोल प्रक्रियेत रुग्ण रुग्णालयातून रवाना होताना नातेवाईकांना रुग्णाच्या झोपेचा प्रकार, झोपेचा नमुना, रुग्णाची संवाद करण्याची पद्धत, त्याची कार्यशीलता, कार्य करण्याचा प्रकार व औषधांचा दुष्परिणाम यावर लक्ष देण्यासाठी सूचित करतात.
संदर्भ :
- K. Lalitha, Mental Health and Psychiatric Nursing, An Indian Perspectives, 4th Edition 2011.
- R. Sreevani, A Guide to Mental Health and Psychiatric Nursing, 4th Edition 2016.
समीक्षक : सरोज उपासनी