भूखंडीय हालचालींमुळे (Epeirogenic movements) आणि जमिनीच्या अंतर्गत होणाऱ्या विवर्तनी (Tectonic) घडामोडींमध्ये – प्रामुख्याने पर्वतीय निर्माण प्रक्रियेमध्ये – असमान दाब वितरणामुळे ताण शक्ती वाढून खडक भंग पावतात. अशा तडा/भेगा गेलेल्या खडकांच्या भंग तलावरून (Fracture plane) जेव्हा दोन्ही बाजूचे खडक तुलनात्मक दृष्ट्या खाली किंवा वर सरकतात (सापेक्ष विस्थापन; Relative displacement) तेव्हा अशा भंग तलास भ्रंश म्हणतात.

राजस्थानमधील सातुर (बुंदी जिल्हा) येथील बृहत् सीमावर्ती (स्तर) भ्रंश (जास्त लांबीचा असलेला) पूर्व अरवली खडक संघ (Early Aravalli Group) आणि उत्तर काळातील विंध्यन खडक संघ (Upper Vindhyan Group; ६०० ते १४०० द.ल. वर्षांपूर्वी) यांच्यामध्ये असून त्याचा तल वक्रीय (Curvilinear plane) आहे. येथे त्याचा कल उत्तर-उत्तरपश्चिम ते दक्षिण- दक्षिणपूर्व असा आहे आणि पुढे तो उत्तरेकडे विस्तारीत होत गेल्यावर उत्तरपूर्व असा होतो. राजस्थानातील विंध्यन द्रोणीच्या (Vindhyan Basin) संपूर्ण पश्चिम बाजूला व चंबळ नदीच्या प्रवाहाला जवळजवळ समांतर असलेल्या या विभंगाचा आग्रा व त्याच्या उत्तरेस एकूण ८०० किमी. पर्यंत मागोवा घेता येतो. या भ्रंशामुळे विंध्य संघातील जवळजवळ क्षिजिसमांतर वालुकाश्माचे विक्षुब्ध न झालेले थर आणि अतिशय तीव्र स्वरूपाच्या घड्या पडलेले (विक्षोभित) असे अरवली सुभाजा (Aravalli Schist’s) हे खडक एकमेकांच्या संपर्कात आलेले आहेत. अशा तऱ्हेने भिन्न प्रकारचे व निरनिराळ्या वयांचे खडक एकमेकांलगत आणणाऱ्या अशा भ्रंशाला सीमावर्ती भ्रंश म्हणतात.

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य सीमावर्ती भ्रंशाकडे हा भ्रंश पुढे जातो आहे. हा एक मोठा, अनेक व्यत्यय असलेला व्युत्क्रम भ्रंश पट्टा/भ्रंश क्षेत्र आहे (Reverse fault belt/zone). शेकडो किमी. व्यापाच्या या पट्ट्यात असंख्य लहान, काहीसे समांतर आणि विलग/सुटेसुटे विभंग आढळतात. यामध्ये असणाऱ्या अशा समांतर व आडवे तिरकस असलेल्या तिर्यक भ्रंशांमुळे तेथे असलेल्या चुनखडींच्या खडकांना पायऱ्यांचे आकार प्राप्त झालेले आहेत, जे आवर्जून या ठिकाणी पाहण्यासारखे आहेत. बुंदी ते जयपूर रस्त्यावर बुंदीपासून १० किमी. वायव्येला सातूर गावानजीक ही जागा आहे.

संदर्भ :

  • https ://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी.एस. कुलकर्णी