निसर्गातील खनिजे, प्राणिज, वनस्पतिज इत्यादी पदार्थांची वेगवेगळ्या प्रक्रियांनी केलेली एक प्रकारची सेंद्रिय राख म्हणजे भस्मे होय. उदा., सुवर्ण भस्म, लोह भस्म, अभ्रक भस्म इत्यादी.
आयुर्वेदामध्ये भस्म ही अतिशय विशेष कल्प योजना आहे. सेंद्रिय किंवा निरिंद्रिय पदार्थांची औषधी वनस्पतींचा व तीव्र उष्णतेचा वापर करून भस्मे तयार केली जातात. आयुर्वेदात विविध रोगांवर औषध व रसायन म्हणून त्यांचा उपयोग सांगितला आहे. ही भस्मे तयार करताना केल्या जाणाऱ्या प्रक्रियांना संस्कार म्हटले आहे. या संस्कारांमुळे भस्मांमध्ये गुणवृद्धी, वीर्यवृद्धी होते तसेच त्यात असलेल्या दोषांचा नाश होतो असे म्हटले आहे. आयुर्वेदानुसार दोष, अग्नी, दुष्य अशा सगळ्यांचा विचार करून भस्मांवर वेगवेगळे संस्कार करायला सांगितले आहे. अशाप्रकारे ग्रंथांमध्ये एकच भस्म वेगवेगळ्या पद्धतींनी तयार करून वेगवेगळ्या रोगांवर तसेच रोगांच्या विविध अवस्थांवर वापरण्यासंबंधी उत्तम प्रकारे निर्देश दिला गेला आहे.
प्राण्यांची शिंगे, कवच, पिसे, अनेक धातू, आयुर्वेदात सांगितलेले उपधातू गटातील द्रव्ये, वनस्पती यांचा भस्म स्वरूपामध्ये औषधोपचारांमध्ये उपयोग केला जातो. ही कोणतीही द्रव्ये वापरताना त्यावर अनेक औषधी प्रक्रिया केल्या जातात आणि नंतरच ते शरीरावर काम करण्यासाठी योग्य बनतात. भस्म तयार करताना खूप मोठी आणि काळजीपूर्वक प्रक्रिया पार पाडावी लागते. म्हणूनच भस्म बनवण्यासाठी काही महिने ते काही वर्षे देखील लागू शकतात.
भस्म प्रक्रियेचे हे संपूर्ण वर्णन आणि चिकित्सेमधील उपयोग यांचे विस्तृत वर्णन रसतंत्र किंवा रसशास्त्र या आयुर्वेदातील एका अंगामधे केले आहे. यामध्ये विविध रोगांच्या चिकित्सेकरिता भस्मांच्या अनेक संयोगांचा उपयोग देखील सांगितला आहे.
भस्मे, आधुनिक शास्त्रानुसार : आधुनिक शास्त्रामध्ये भस्मे ही अब्जांश पदार्थ/अब्जांश औषधि (Nano substance/medicine) म्हणून ओळखली जातात. आधुनिक पद्धतीनुसार त्यांचे भौतिक व रासायनिक पृथक्करण करून त्यांच्या अणु-रेणूंच्या संदर्भात अधिक गोष्टी जाणून घेण्याचे तसेच वर्गीकरण करण्याचे संशोधन सुरू आहे. यात भस्म बनवण्याच्या विविध पद्धतींमध्ये वनस्पतींचे रस, चूर्ण इत्यादींचा वापर केला जातो. भस्म बनण्याच्या प्रक्रियेमध्ये यांचा निश्चित परिणाम होतो व त्यानुसार त्यांचे गुणधर्म देखील बदलतात असे आढळले आहे. त्यांच्या परिणामांवर आणि ती रसायन शास्त्रानुसार कसे काम करतात यावर सध्या संशोधन सुरू आहे. तसेच शरीरावर विविध रोगांवर काम करताना लागणारी औषधांची अतिशय कमी मात्रा आणि अचूक आयुर्वेदीय निदानानंतर वापरली जाणारी पद्धत यांमुळे भस्मे स्वत:चे गुणधर्म थेट शरीराच्या पेशींपर्यंत कसे नेऊ शकतात, यावर अब्जांश कण सिद्धांतानुसार (Nanopartical theory) संशोधन सुरू आहे.
पहा : अकीक भस्म, अभ्रक भस्म, कपर्दिक भस्म, कांत लोह भस्म, कासीस भस्म, कुक्कुटाडत्वक भस्म, गोदंती भस्म, गोमेदमणी भस्म, जहरमोहरा भस्म, जसद भस्म, ताम्र भस्म, तार्क्ष्य भस्म, तुत्थ भस्म, त्रिवंग भस्म, नाग भस्म, प्रवाळ भस्म, भस्म प्रक्रिया, मंडूर भस्म, मल्ल भस्म, माणिक्य भस्म, मृगश्रुंग भस्म, मौक्तिक भस्म, रौप्य भस्म, लोह भस्म, वंग भस्म, वैदूर्य भस्म, शंख भस्म, शौक्तिक भस्म, सुवर्ण भस्म, स्वर्णमाक्षिक भस्म, हरताल भस्म, हीरक भस्म,
संदर्भ :
- कृष्ण गोपाल, रसतन्त्रसार व सिद्धप्रयोग संग्रह, ठाकूर नाथुसिंह प्रकाशन, अजमेर.
- Dilipkumar Pal, Chandan kumar Sahu, Arindam Haldar, Bhasma : The ancient Indian nanomedicine, Department of Pharmaceutical Science, Guru Ghasidas Vishwavidyalaya, Bialaspur, Chhattisgarh.
समीक्षक : अक्षय जोशी