एखादी वस्तू जशी आहे, त्या स्वरूपात तिचे ज्ञान न होता त्याऐवजी ती जशी नाही त्याचे ज्ञान होते, यालाच अविद्या असे म्हणतात. जवळपास सर्वच दर्शनांमध्ये अविद्या, अज्ञान, विपर्यय (उलट) अशा समानार्थी शब्दांनी अयथार्थ ज्ञानाचे वर्णन केले आहे. साधारणपणे एखाद्या शब्दाच्या आधी ‘अ’ जोडल्यास त्याचा अभाव सूचित होतो; उदा., ‘अहिंसा’ म्हणजे हिंसेचा अभाव. परंतु, अविद्या किंवा अज्ञान या शब्दामधील ‘अ’ हा विद्येचा किंवा ज्ञानाचा अभाव सूचित करत नाही, तर विपरीत ज्ञान सूचित करतो. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नाही, हेही एक प्रकारचे ज्ञानच आहे, परंतु ते यथार्थ ज्ञान नाही. योगदर्शनामध्ये वर्णन केलेल्या पाच क्लेशांपैकी (चित्ताच्या अवस्थांपैकी) अविद्या प्रमुख क्लेश आहे. महर्षी पतंजलींनी अविद्येचे स्वरूप पुढील सूत्रात वर्णन केले आहे – ‘अनित्य-अशुचि-दु:ख-अनात्म सुनित्य-शुचि-सुख-आत्मख्याति: अविद्या| (योगसूत्र २.५). जे अनित्य, क्षणिक आहे त्याला नित्य, चिरंत न समजणे; जे अपवित्र/अशुद्ध आहे त्याला पवित्र/शुद्ध समजणे; जे दु:खरूप आहे, त्याला सुख समजणे आणि जे आत्मा (चेतन) नाही, त्यालाही आत्मा समजणे यालाच अविद्या म्हणतात. योगसूत्रांवरील भाष्यांमध्ये या चार प्रकारच्या विपरीत ज्ञानाचे विस्ताराने स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
(१) अनित्याला नित्य समजणे : पृथ्वी, ग्रह, नक्षत्र, तारे, सृष्टी इत्यादी नित्य आहेत, त्यांचा नाश होऊ शकत नाही असे आपल्याला वाटते; परंतु त्यांचे अस्तित्व कायमस्वरूपी नाही. जरी शेकडो वर्षांपर्यंत ते असले, तरी त्यांना नित्य म्हणता येऊ शकत नाही. कारण नित्य म्हणजे जे कायमस्वरूपी राहते व ज्याची उत्पत्ती-विनाश होऊ शकत नाही असे तत्त्व. त्यामुळे सूर्य, नक्षत्र अशा अनित्य गोष्टींना नित्य समजणे हे अविद्येचे एक रूप आहे.
(२) अशुद्ध, अपवित्र वस्तूला पवित्र समजणे : उदा., व्यक्तीला आपल्या स्वत:च्या शरीराबद्दल आसक्ती असते व अन्य काही व्यक्तींच्या शरीराबद्दल जे आकर्षण वाटते, ते शरीर पवित्र आहे असे समजल्यामुळे वाटते. शरीर हे अशुद्ध आहे, परंतु त्याला शुद्ध समजणे हे अविद्येचे एक रूप आहे. योगशास्त्रामध्ये शरीराची बाह्य शुद्धी आणि आतील अवयवांची शुद्धी करण्यासाठी विविध प्रकारच्या क्रिया सांगितलेल्या आहेत. धौती, बस्ती, नेती इत्यादी क्रिया केल्याने त्या त्या अवयवांची शुद्धी होते; परंतु, त्याचवेळी शरीरातील अन्य अवयवही तेवढेच शुद्ध असतील असे म्हणू शकत नाही. कारण मल उत्पन्न करणे हा शरीराचा स्वभावच आहे. त्यामुळे स्वभावत: अपवित्र असणाऱ्या शरीराला पवित्र समजणे ही अविद्याच आहे.
(३) दु:खाला सुख समजणे : भौतिक विषयांपासून प्राप्त होणारे सुख हे अविद्येमुळे सुख वाटते; परंतु, ते दु:खरूपच असते. जी गोष्ट सुख देते असे आपल्याला वाटते, त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा अनुभव करण्यासाठी मनात आसक्ती उत्पन्न होते. जर ती गोष्ट पुन्हा मिळाली नाही, तर दु:ख उत्पन्न होते. जरी ती गोष्ट पुन्हा मिळाली, तरी आसक्ती अधिकच दृढ होते व तिचे पर्यवसान शेवटी दु:खातच होते. त्यामुळे भौतिक विषयांपासून उत्पन्न होणारे क्षणिक सुख हेही दु:खरूपच आहे. त्याला सुख समजणे हे अविद्येचेच रूप आहे.
(४) जे आत्मा नाही, त्याला आत्मा समजणे : ‘आत्मा’ या शब्दाचा अर्थ आहे ‘स्व’. आपण ज्याला ‘मी’ म्हणून समजतो ते चेतन तत्त्व, ज्याला ज्ञान होण्याची योग्यता आहे, त्यालाच आत्मा असे म्हणतात. शरीर, बुद्धी, मन, इंद्रिय इत्यादी अन्य तत्त्वे वस्तुत: अचेतन आहेत; परंतु, आत्म्याच्या संयोगामुळे तीही चेतन आहेत असे वाटते. शरीर, मन इत्यादी अनात्म गोष्टींना आत्मा समजणे, हेही अविद्येचेच एक रूप आहे.
अशाप्रकारे अविद्येची ही चार रूपे पतंजलींनी सांगितलेली आहेत. या व्यतिरिक्तही अन्यत्र जिथे विपरीत ज्ञान होते, त्यालाही अविद्याच समजावे असे व्यासभाष्यात वर्णिलेले आहे. उदा., पापाला पुण्य समजणे, अनर्थाला हितकर समजणे इत्यादी. अविद्या ही अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या चार अन्य क्लेशांची प्रसवभूमी आहे. जर चित्तामध्ये अविद्या असेल, तरच अन्य क्लेश चित्तात राहू शकतात आणि यथार्थ ज्ञानाद्वारे अविद्येचा नाश झाल्यावर चित्तातील अन्य क्लेशही निष्क्रिय होतात. चित्तामध्ये अविद्या असताना अन्य चार क्लेश कधी प्रसुप्त (अप्रकट किंवा सूक्ष्म रूपात), कधी तनु (कमी परिणाम करणारे), कधी विच्छिन्न (दबलेले), तर कधी उदार (प्रकट रूपाने) राहतात. अविद्येमुळेच पुरुष (ज्ञान होण्याची योग्यता) आणि बुद्धी (ज्ञानप्राप्तीचे साधन) यांचा संयोग होतो (योगसूत्र २.२४). वस्तुत: पुरुष (आत्मा) आणि बुद्धी (चित्त) हे वेगळे आहेत, परंतु अविद्येच्या प्रभावाने दोन्ही एकच आहेत, असे विपरीत ज्ञान जीवाला होते. हे विपरीत ज्ञान विवेकख्याती (पुरुष आणि चित्त या दोघांमधील भेदाचे ज्ञान) प्राप्त झाल्यावर नष्ट होते. विवेकख्यातीलाच दर्शन आणि अविद्येला अदर्शन असेही म्हणतात. अविद्या किंवा अदर्शन म्हणजे पुरुषाचे (आत्म्याचे) यथार्थ ज्ञान न होणे, असा या शब्दाचा सामान्य अर्थ आहेच; परंतु, व्यासभाष्यामध्ये (२.२३) अविद्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काय असू शकतात, याविषयी सांख्ययोग शास्त्रामध्ये वर्णिलेली आठ वेगवेगळी मतेही उल्लेखिलेली आहेत. अन्य क्लेशांचे मूळ असणारी अविद्या यथार्थ ज्ञान झाले असता नष्ट होते.
पहा : क्लेश.
संदर्भ :
- स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.
समीक्षक : कला आचार्य