मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागैतिहास अशी संज्ञा दिली जाते. त्याचे स्थूलमानाने प्रागैतिहास, आद्य इतिहास (protohistory) व इतिहासकाळ असे तीन प्रमुख कालखंड मानले जातात. प्रागैतिहास या संज्ञेचा प्रथम वापर डॅन्येल विल्सन यांनी केला. प्रागैतिहासिक काळाचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात लेखनकला, स्थिर जीवन, धातूंचा वापर, योजनाबद्ध वसाहत वा अन्नोत्पादन यांचा पूर्णत: अभाव आढळतो. हा कालखंड सर्वांत मोठा असून त्याचा अभ्यास उत्खनित पुराव्यांद्वारे करावा लागतो. आद्य इतिहास कालखंडाचे लिखित पुरावे उपलब्ध असतात; परंतु त्यांचा उलगडा करता आलेला नाही, मात्र तत्संबंधी लिहिले गेले आहे. तर इतिहासकाळाचे लिखित पुरावे उपलब्ध असतात व ते वाचून त्याची उकल करणे शक्य असते. म्हणूनच इतिहासकाळाच्या पूर्वीचा काळ हा सर्वसाधारणपणे प्रागैतिहासिक काळ म्हणून ओळखला जातो. या तीनही संज्ञा काहीशा कृत्रिम आहेत. त्यांत प्रदेशपरत्वे फरक आढळतो. कारण त्या कालबद्ध वा प्रदेशनिबद्ध नाहीत. आजही पाषाणयुगीन जीवन जगणाऱ्या काही जमाती अस्तित्वात आहेत.
प्रागैतिहासिक कलेचे नमुने पुढील माध्यमांत विशेषत: आढळतात.
(१) गुंफांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावर काढलेली चित्रे; (२) गुंफांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावरील उत्कीर्णन; (३) प्राण्यांच्या मातीच्या मूर्ती; (४) अपोत्थित शिल्पे; (५) दगड, हाडे वा शिंगे यांसारख्या वस्तूंवर केलेली चित्रकारी अथवा उत्कीर्णन.
या काळातील गुंफा प्रामुख्याने मध्य भारतातील सिंगनपूर, आदमगढ, चक्रधरपूर, मिर्झापूर, हुशंगाबाद, लिखुनिया, भलदरिया, विजयगढ, पंचमढी इत्यादी ठिकाणी आढळतात आणि त्यांतून भित्तिचित्रे काढलेली आहेत. या गुंफांव्यतिरिक्त भीमबेटका येथे अतिप्राचीन प्रस्तर गुंफा असून त्यांचा शोध पुरातत्त्वज्ञ वि. श्री. वाकणकर यांनी लावला.
भारतातील प्रागैतिहासिक गुंफाचित्रे प्रामुख्याने दोन प्रकारची आहेत. त्यांतील पहिला प्रकार म्हणजे रंगीत गुंफाचित्रे. अशी चित्रे प्रामुख्याने मध्य प्रदेशातील भीमबेटका, पंचमढी, मोदी, कावडी तसेच महाराष्ट्रातील अमरावती इत्यादी ठिकाणी आढळली आहेत. दुसरा प्रकार म्हणजे कमी उठावाची कोरीव (उत्कीर्णन) चित्रशिल्पे. या प्रकारची चित्रशिल्पे केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एडक्कल येथील गुंफांमध्ये आढळली आहेत. १८९० मध्ये मलबारमधील पोलीस सुपरिंटेन्डेंट फ्रेड फॅसेट यांना शिकारी करता या भागात फिरताना या गुंफा दिसल्या. या गुंफांचा काळ नवाश्मयुग मानला जातो. एडक्कल या शब्दाचा अर्थ ‘दगडामध्ये’ असा आहे. या एका गुंफेचे दोन उपभाग पडले आहेत. डाव्या हाताच्या भिंतीवर मानवाकृती, हत्ती, जंगली कुत्रे, मोर व फुले व झाड यांचे चित्रण दिसते, तर उजव्या बाजूच्या भिंतीवर भौमितिक चिन्हे, काही शिकारीची दृश्ये दिसतात. या चित्रशिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रशिल्पे त्रिमितीचे दृश्य निर्माण करतात. अशी कोरीव चित्रे काही वेळा नदीकाठच्या कातळावर देखील आढळतात. गोव्यातील कुशावती नदीच्या काठी ऊसगाळमाळावयली (ऊसगळीमळ) येथे अशा प्रकारची कातळशिल्पे १९९३ साली पुरातत्त्वज्ञांना आढळून आली आहेत.
रंगीत गुंफाचित्रांच्या बाबतीत मध्य प्रदेशातील भोपाळच्या दक्षिणेस ४५ किमी.वर विंध्य पर्वतरांगेतील भीमबेटका व त्याच्या आजूबाजूच्या भागातील चित्रांचे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. ‘भीमबेटका’ या शब्दाचा अर्थ तेथील आदिवासी भीमाचे आसन असा सांगतात. या गुंफा मध्य अश्मयुगकालीन असल्याचे पुरावे सापडले असले तरी त्यांचा वापर शुंग व गुप्त काळापर्यंत केला गेला असावा. येथील सु. १० चौ. किमी. परिसरात आठशे प्रस्तर गुहा असून त्यांपैकी पाचशे प्रस्तरालयांत चित्रे काढलेली आहेत. या प्रस्तर गुहांचे समन्वेषण पुरातत्त्वज्ञ वि. श्री. वाकणकर यांनी १९५५ मध्ये प्रथम केले; तथापि तेथे विस्तृत प्रमाणावर उत्खनन होईपर्यंत या गुहांकडे विद्वानांचे फारसे लक्ष गेले नाही. पुढे वाकणकर व व्ही. एन. मिश्र व सहकाऱ्यांनी उत्खनन केले. त्यात अश्मयुगीन उपकरणांपासून मध्याश्मयुगापर्यंतच्या काळातील विविध अवशेष उपलब्ध झाले. त्यामुळे तेथील चित्रवीथिकांच्या संशोधनास चालना मिळाली आणि विद्वानांचे लक्ष या प्रागैतिहासिक चित्रांकडे गेले. त्यांत मानवी उपकरणांची उत्क्रांती ज्ञात झाली; शिवाय उत्तर पुराणाश्मयुगीन मानवाच्या कवटीचा एक भागही मिळाला. तसेच शैलाश्रयी चित्रकलेचे भांडार आढळले. यांतील चित्रे एकाच काळातील नसून ती भिन्न कालखंडातील आहेत. त्यांतील अतिप्राचीन चित्रांचा काळ परस्पर उपलेपन पद्धतीच्या आधारे उत्तर पुराश्मयुग व मध्याश्मयुग असा गृहीत धरण्यात आला आहे. चित्रशैली, तंत्र व अध्यारोपन (सुपर इंपोझिशन) या आधारांवर वाकणकर यांनी या चित्रांचे सात कालखंड कल्पिलेले आहेत : (१) उत्तर पुराश्मयुग (२५००–१५००० इ.स.पू.), (२) मध्याश्मयुग (१५०००–६००० इ.स.पू.), (३) ताम्रपाषाणयुग (६०००–३००० इ.स.पू.), (४) नवाश्मयुग (३०००–२५०० इ.स.पू.), (५) आद्य ऐतिहासिक काळ (२५००–१८०० इ.स.पू.), (६) मध्य ऐतिहासिक काळ (१८००–९०० इ.स.पू.) आणि उत्तर ऐतिहासिक काळ (९००–५०० इ. स. पू.). येथील चित्रांचे विषय विविध आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्था त्यांत आढळतात. त्यामुळे तत्कालीन मानवाच्या जीवनपद्धतीची माहिती मिळते. चित्रवीथीत रानगवे, बैल, हत्ती, वाघ, हरिण, डुक्कर, गेंडा, नीलगाय, मोर, सांबर असे प्राणी असून क्वचित काही ठिकाणी पक्षीही चितारले आहेत. शिकारीचे अनेक प्रसंग आहेत. काहीची पुनरुक्ती आढळते. ही मानवांची गणचिन्हे असावीत, असे वाकणकर म्हणतात. दुसऱ्या एका चित्रात चार बालकांना जमिनीत पुरून त्यांच्या शवाभोवती एक पुरुष लाकडी कुंपण लावीत आहे व जवळच दोन महिला विलाप करीत आहेत असे चित्र काढले आहे. काही चित्रांत स्त्री-पुरुष दोघेही आहेत. शिकारीच्या चित्रात व्यक्तिगत वा सामूहिक प्रयत्न दाखविले आहेत. शिकारीच्या वा नृत्याच्या वेळी मुखवटे धारण करण्याची प्रथा असावी. मुखवटे व शिरीभूषणे कलाकुसरयुक्त असत. पाठीला टोपली वा गाठोडी बांधून अन्नसंकलनासाठी भटकणाऱ्या स्त्रियांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याशिवाय युगुले, मातृकादेवी, सुफलता व प्रजनन यांची प्रतीकात्मक चित्रे, गर्भवती संततीपालक स्त्रिया यांची चित्रे बरीच आहेत. तीन-चार चित्रे कामक्रीडेविषयीची आहेत. स्त्री-प्रतिमानात बहुविध अलंकारांचे दर्शन घडते. येथील प्राण्यांचे चित्रण वास्तववादी असून मानवी आकृत्या एका विशिष्ट शैलीत चितारल्या आहेत. चित्रे एकरंगी, दुरंगी व बहुरंगी असून पिवळा, लाल, तपकिरी व काळा या रंगांचा सर्रास वापर आढळतो. चित्रे काढण्यासाठी विविध प्रकारचे नैसर्गिक खनिज रंग वापरले गेले होते. हिरव्या रंगासाठी टेरा व्हेर्तासारखे (Terra verta) मृद्खनिज वापरले गेले. सर्वांत जुनी चित्रे हिरव्या रंगाची आहेत. तर मँगेनीज हे जांभळट रंगासाठी वापरले गेले. काही चित्रे चुनखडीपासून मिळणाऱ्या पांढऱ्या रंगांनी रंगवलेली आहेत. तर काही चित्रे रंगवताना गैरिक (Hematite) या दगडापासून मिळणाऱ्या लाल रंगाचा व त्याच्या पिवळ्या, नारंगी, तपकिरी छटांचा वापर करण्यात आला आहे. बहुतांश चित्रे लाल रंग व त्याच्या छटांची आहेत. चित्रे रंगवण्यासाठी तागाच्या झाडाच्या काठीचा उपयोग केला गेला असावा. या दीर्घ कालखंडावरील संशोधनादरम्यान वाकणकर यांना विविध काळातील जवळपास वीस शैली सापडल्या. गुहांत काही लघु-अश्मास्त्रे सापडली असल्यामुळे मध्याश्मयुगीन मानव या गुहांत वसती करून राहत असावा. येथे एकूण १६ शैलाश्रयात (रॉक शेल्टर) चार विद्यापीठांनी केलेल्या उत्खननांत तेरा मानवी सांगाडे मिळाले. त्यांतील एक सांगाडा भारतातील मानवी अवशेषांतील सर्वांत प्राचीन असावा, असा पुरातत्त्ववेत्त्यांचा कयास आहे; कारण याच्या गळ्यात शहामृगाच्या अंड्याचे मणी आहेत.
येथील चित्रशैलीविषयी यशोधर मठपाल यांनी काही निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ते असे : या चित्रांची एकूण धाटणी रेखात्मक असून गतिमानता हा या चित्रांचा स्थायीभाव आहे. तांत्रिक दृष्ट्या या शैलीचे चार प्रकार संभवतात : एक, खडूसारख्या शुष्क रंगांची क्रेयॉन चित्रशैली, दोन, ओली पारदर्शक रंगचित्रशैली; तीन, ओली अपारदर्शक किंवा चिकणरंग (टेंपेरा) चित्रशैली आणि चार, तुषाररंग (स्प्रे-कलर) चित्रशैली. यांपैकी क्रेयॉन ही चित्रशैली भारतात क्वचित आढळते.
दक्षिण फ्रान्स अथवा उत्तर स्पेनमधील प्रागैतिहासिक मानवाच्या मानाने भारतातील प्रागैतिहासिक मानवाचे वास्तव्य अधिक काळ गुफांमध्ये होते, असे दिसते. त्यामुळे आधीच्या काळात चित्रे गुंफेच्या तोंडाजवळ काढत. नंतर ही चित्रे गुंफेमध्ये खूप आतल्या भागात काढलेले दिसतात. या गुफांच्या जवळ माणसांना व प्राण्यांना उपयुक्त अशी पाणवठ्याची जागा व प्राण्यांच्या चराऊ कुरणांची उपलब्धता दिसते. या सगळ्या वातावरणाचा एकंदरीत परिणाम म्हणजे पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांची शिकार करणे सहज शक्य होत असावे. यांतील बहुतांश गुंफा कडक ऊन, पाऊस आणि थंडी यांपासून संरक्षण व्हावे म्हणून दक्षिणाभिमुख आहेत.
गुंफाचित्रांमध्ये सर्वांत जास्त प्राण्यांशी संबंधित चित्रे आहेत. काही प्रमाणात मानवाकृती व वेगवेगळी चिन्हेही रेखाटलेली दिसतात. छोट्यांत छोटी चित्रे पाच सेंमी.ची मुंगुसासारख्या प्राण्यांची, तर मोठ्यांत मोठी चित्रे दोन मीटर उंच रानगवा अथवा हत्तीसारख्या प्राण्याची आहेत. प्राण्यांमध्ये रानगवे, माकडे, काळविट, कोल्हे, चित्ते, तरस, रानडुक्कर, मगरी इत्यादी प्राण्यांचे चित्रण आढळते. काळविटांच्या प्रजातीतील नीलगाई, चिंकारा, हरणाच्या प्रजातीतील ठिपक्यांची हरणे, चितळे, बाराशिंगे, सांबर इत्यादींचे बारकाव्यासहित चित्रण यात दिसते. छोट्या प्राण्यांमध्ये ससे, साळींदर, जळू, खारी, कासव, सरडे, बेडूक, विंचू, मधमाशी इत्यादी दिसतात. गरुड, गिधाडे, बगळ्यांच्या विविध प्रजाती, करकोचे, पाणकोंबड्या इत्यादी पक्ष्यांची चित्रणेदेखील आढळतात.
मानवाकृतींच्या चित्रणामध्ये तत्कालीन जीवनशैलीचे चित्रण आढळते. ज्यात दिनक्रमाची, शिकारीची, प्राण्यांबरोबरच्या झटापटींची व मानवी समूहनृत्याची चित्रे आहेत. शिकार हा या मानवाच्या अन्नसंकलनाचा अविभाज्य भाग होता. त्याचप्रमाणे जंगली श्वापदांपासून स्वत:चे रक्षण हाही त्यामागे हेतू असे. त्यामुळेच शिकारीकरिता त्याने विविध हत्याराची निर्मिती केली. गुंफाचित्रांमधील शिकार दृश्यांच्या चित्रणात मानवाला प्राण्यांचे वाटणारे भय, प्राण्यांना मानवाचे वाटणारे भय, विविध हत्यारे इत्यादीचे चित्रण आढळते. निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून जादूटोणादेखील मानव करत असावा.
प्रागैतिहासिक काळाच्या जीवनाचे पुरावे म्हणजे उत्खननात सापडणारे त्या काळातील विविध अवशेष ज्यांत मानवी सांगाडे, हत्यारे, वापरातील वस्तू इत्यादींचा समावेश केला जातो; परंतु गुंफा चित्रे ही तत्कालीन मानवाचा दिनक्रम, सभोवतालची सृष्टी, राहणीमानाच्या संकल्पना, श्रद्धा, मानसिकता, भावभावना व जीवन मूल्ये याचा संपूर्ण पट अभ्यासताना या दीर्घ कालखंडातील जीवनमानाच्या बदलत्या टप्प्यांचे दुवे सांधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात.
समीक्षण : सु. र. देशपांडे