याक (बॉस ग्रुनिएन्स)

स्तनी वर्गाच्या समखुरी म्हणजे आर्टिओडॅक्टिला गणाच्या बोव्हिडी कुलातील प्राणी. भारत, नेपाळ, भूतान, चीन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांच्या हिमालयीन प्रदेशांत तसेच तिबेट, मंगोलिया आणि रशिया इत्यादी देशांत याक आढळतो. बहुतांशी याक माणसाळलेले असून पाळीव याकचे शास्त्रीय नाव बॉस ग्रुनिएन्स आहे. काही याक अजूनही वन्य स्थितीत आढळतात. वन्य याकचे शास्त्रीय नाव बॉस म्युटस आहे. गायीगुरांप्रमाणे तो गवत खातो व रवंथ करतो, मात्र हंबरत नाही.

वन्य याक हे बोव्हिडी कुलातील अन्य प्राण्यांच्या तुलनेत आकारमानाने मोठे असून खांद्यापर्यंतची उंची १६०–२२० सेंमी. म्हणजे गव्याच्या खालोखाल असते. वजन ३०५–१००० किग्रॅ. असते. डोक्यापासून शेपटीपर्यंतची लांबी २·५ ते ३·३ मी., तर शेपटीची लांबी ६०–१०० सेंमी. असते. नराच्या तुलनेत मादीचे वजन एक तृतीयांशाने कमी, तर आकारमान सु. ३० टक्क्यांनी कमी असते. पाळीव याक हे वन्य याकांपेक्षा लहान असून नराचे वजन ३५०–५८० किग्रॅ., तर मादीचे २२५–२५५ किग्रॅ. असते. वन्य याकचा रंग गडद काळा किंवा तपकिरी, तर पाळीव याकच्या रंगांत विविधता असून त्यांच्या शरीरावर तांबट आणि पिवळसर रंगांचे डाग आढळतात. याकचे कान लहान असून कपाळ रुंद असते. पाय भक्कम व खूर गोलाकार असतात. शरीरावर अतिशय दाट व पोटाच्या खालपर्यंत लोंबणारे केस असतात. या केसांमुळेच कडाक्याच्या थंडीपासून त्यांचे संरक्षण होते. नर व मादी दोहोंमध्ये मान आखूड असून पुढे वाकलेली असते. खांद्यावर वशिंड असते आणि पाठ सरळ असते. नराचे वशिंड मोठे असते. शेपटी मात्र घोड्याच्या शेपटीसारखी असते. नराची शिंगे डोक्याच्या दोन्ही बाजूंना फाकलेली व नंतर पुढच्या बाजूला वळलेली असून त्यांची लांबी ४८–९९ सेंमी. असते. मादीची शिंगे सरळ व लांब २७–६४ सेंमी. असतात. शिंगे भरीव असून त्यांच्या साहाय्याने बर्फाखाली पुरल्या गेलेल्या वनस्पती ते उकरून काढतात. तसेच शिंगांचा उपयोग ते स्वसंरक्षणासाठी करतात.

वन्य याक कळप करून राहतात. त्यांच्या एका कळपात १०–१०० प्राणी असू शकतात. कोणत्याही कळपात माद्या बहुसंख्येने असून नरांची संख्या कमी असते. याक शाकाहारी असून गवत, वनस्पती, शैवाल, रानटी फुले इत्यादी ते खातात. चरण्याकरिता ते हिवाळ्यात २,०००–३,००० मी. उंचीपर्यंत तर उन्हाळ्यात सु. ५,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात जातात. पाणी दुर्मिळ झाले तर बर्फ खाऊन ते आपली तहान भागवितात. जमिनीवरील खारट मातीही ते खातात. उंच प्रदेशात, कमी ऑक्सिजनाच्या वातावरणात राहण्यासाठी तसेच सूर्याच्या प्रखर किरणांना तोंड देण्यासाठी त्यांच्या शरीरात अनुकूलन घडून आलेले असते. त्यांच्या फुप्फुसांची क्षमता इतर प्राण्यांच्या क्षमतेपेक्षा तिप्पट असते. त्यांच्या रक्तातील तांबड्या पेशींचा आकार लहान असून पेशींची संख्या जास्त असते. त्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी याकच्या त्वचेखाली मेदाचा थर असून घर्मग्रंथी फारच थोड्या असतात. कमी उंचीवर तसेच १५ से.पेक्षा तापमान जास्त असल्यास त्यांची दमछाक होते. पर्वतीय प्रदेशांत ओझे वाहण्याकरिता त्यांचा उपयोग केला जातो. ते पाठीवर १०० किग्रॅ. वजनाचे ओझे घेऊन ताशी २-३ किमी. गतीने दिवसभरात २० किमी. अंतर सहज चालून जातात.

जुलै–सप्टेंबर या कालावधीत मादी माजावर येते. गर्भावधी २५७–२७० दिवसांचा असतो. एप्रिल–जून या कालावधीत मादी एका वासराला जन्म देते. वासराचा रंग तपकिरी असतो. एक वर्षांनंतर ते स्वतंत्र होते.

संकरित जाती निर्मितीसाठी याकचा उपयोग केला जातो. याक नर व डोंगरी गाय यांच्या संकरित जातीला कुमाऊँ टेकड्यांत जीबू तर लडाखमध्ये झोम म्हणतात. याक मादी व डोंगरी बैल यांच्या संकरास गारजो म्हणतात. याक नर व जीबू मादी यांच्या संकराला कुमाऊँ टेकड्यांत डीमजो व लडाखमध्ये गारमो किंवा गार म्हणतात. जीबू मादी व डोंगरी बैल यांच्या संकराला ज्वाम, टॉल किंवा टॉल्मा म्हणतात. जीबू नर वांझ असून ते शेतीच्या कामासाठी तसेच जड ओझे वाहून नेण्यासाठी वापरतात. थंड व उष्ण हवेला प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता जास्त असते.

याक हा समूहाने राहणारा प्राणी असून त्याला सहज शिकविता येते. त्याने मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटना क्वचितच आढळून येतात. मात्र पिलू असुरक्षित असल्याची जाणीव झाल्यास मादी आक्रमक बनते. मनुष्य, अस्वल आणि लांडगा हे त्याचे शत्रू आहेत. वन्य याकचे आयुष्य सु. २० वर्षे, तर पाळीव याकचे त्याहून थोडे जास्त असते. लांब केस, आखूड पाय आणि बैलासारखा दिसणारा याक सर्वप्रथम सु. ५,००० वर्षांपूर्वी तिबेटमध्ये माणसाळविला गेला. परंतु ४,०००–६,००० मी. उंचीपर्यंत मनुष्यवस्ती असलेल्या प्रदेशात पाळीव याकचा उपयोग सुरू झाला. प्रामुख्याने दूध, लोकर, मांस मिळविण्यासाठी व ओझे वाहून नेण्यासाठी याक पाळले जातात. याकचे दूध पिण्यासाठी, लोणी किंवा दुधाची भुकटी तयार करण्यासाठी वापरले जाते. त्याचे मांस रुचकर असते. केस मऊ असून शाली किंवा ब्लँकेट तयार करण्याकरिता वापरले जातात. कातडीचा उपयोग जोडे, अंगरखे, जाकिटे वगैरे बनविण्यासाठी केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा