प्रस्तावना (Introduction) : रुग्णाची रुग्णालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी डॉक्टरांना रुग्णाची तपासणी करणे आणि उपचार सुरु करण्याची आवश्यकता असते. यासाठी तपासणी व सुरुवातीच्या उपचारांच्या पूर्व तयारीसाठी परिचारिका संपूर्ण जबाबदारी घेऊन रुग्ण सेवा व्यवस्थापनाच्या अंदाजानुसार तपासणी विभाग तयार केला जातो.

रुग्ण तपासणीची उद्दिष्टे :

पूर्व तपासणी (Pre-examination) : पूर्व तपासणीची तयारी करताना सामान्यतः रुग्णाच्या बाबतीत दोन पैलू असतात जसे की,

१) रुग्णाची तयारी करणे :

  • रुग्णाचे कोणत्या प्रकारचे परीक्षण केले पाहिजे हे रुग्णाच्या सामान्य स्थितीवर अवलंबून असते. योग्य प्रतिसादासाठी रुग्णाला तपासणी विषयी योग्य माहिती आणि सूचना देणे आवश्यक आहे त्यासाठी डॉक्टरांसोबत रुग्णांना परीक्षण प्रक्रियेचे स्पष्टीकरण देण्याचे महत्‍त्वाचे काम परिचारिका करतात.
  • रुग्णाची स्थिती (patient’s position on exam table) : परिचारिका ही आवश्यकतेनुसार रुग्णाचे वैयक्तिक कपडे बदलून त्याचे बेड वर समायोजन करते. वैद्यकीय तपासणीचे स्वरूप काहीही असले तरी परिचारिकेने रुग्णाची गोपनीयता, उबदारपणा आणि सुरक्षितता नेहमीच सुनिश्चित केलेली असते. तपासणीच्या तयारीच्या वेळी रुग्णाचे कपडे काढणे आवश्यक असेल तर परिचारिका रुग्णाला योग्य आच्छादन/चादर पुरवते, रुग्णाचा आवश्यक तेवढाच भाग उघडा केला जातो.परिचारिका रुग्णाला आरामदायक असेल असे पलंग, उशा इत्यादी आवश्यकतेनुसार तयार ठेवते.
  • विशिष्ट वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णाला योग्य ठिकाणी ठेवणे किंवा मदत करणे गरजेचे असते. कधी कधी रुग्णाची स्थिती (position) ही त्याच्या तपासणीच्या आवश्यकतेनुसार बदलली जाते. उदा., छातीत आजार असलेल्या व्यक्तीची बसलेल्या स्थितीत बसून तपासणी केली जाऊ शकते. ओटीपोटाच्या आजाराच्या रूग्णाला बसण्याची स्थितीत असताना त्याच्या छातीची तपासणी करणे आवश्यक असते, उदरपोकळीच्या तपासणीसाठी पुन्हा स्थिती बदलणे आणि नंतर गुदाशय तपासणीसाठी डाव्या बाजूकडील स्थितीत बदल करणे आवश्य असते.
  • तपासणी दरम्यान अनावश्यक व्यत्यय टाळण्यासाठी, रुग्णाची तपासणी सुरू होण्यापूर्वी त्याला काही आवश्यकता असल्यास किंवा काही इच्छा असल्यास विचारले जाते (उदा., लघवी/शौचास जाणे इ.) आणि नंतर तपासणीच्या वेळेस साहाय्य केले जाते.
  • रुग्णाचा तपासणीचा शारीरिक भाग स्वछ करणे. गरजेनुसार रुग्णाच्या शरीरावरील केस काढले जातात. गरज असल्यास बस्ती दिली जाते.
  • परीक्षण/तपासणी प्रक्रियेच्या अगोदर परिचारिका रुग्णाला सर्व प्रक्रिया व्यवस्थित समजावून सांगते व रुग्णाची तपासणी बद्दल असलेली भीती व चिंता कमी करते.
उपकरणे

२) उपकरणे आणि विभागाची तयारी (preparation of equipment and area): परिचारिकेने नियमित वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असलेल्या वस्तु व साधने तयार ठेवलेल्या असतात उदा., स्टेथोस्कोप, रक्तदाब मापक, लहान रबरी हातोडी, विजेरी (Torch), निदान संच (diagnostic set), स्त्री रुग्णात योनिमार्गाची तपासणी उपकरणे, कान,नाक,घसा यांची तपासणी उपकरणे, तपासणी विभागामध्ये रक्त नमुने घेण्यासाठी साधने, मूत्र मार्गात टाकण्याची नळी, औषध देण्यासाठी लागणारी उपकरणे इत्यादी. त्याचप्रमाणे तपासणी कक्षातील कृत्रिम प्रकाश, रुग्णाला आरामदायक वातावरण यांचादेखील विचार केला जातो.      

रुग्ण तपासणीच्या वेळी (During examination) : 

अ) तपासणी दरम्यान रुग्णाला मदत : वैद्यकीय तपासणी दरम्यान बरेच रुग्ण घाबरतात.रुग्ण आणि डॉक्टर यांच्या संभाषणामध्ये रुग्णाची चिंता ही अडथळा होऊ शकतो त्यासाठी परिचारिका त्यांना साहाय्य करण्याचे काम करते. उदा., १)ऐकण्यास कमी येणे. कदाचित डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात भाषेचा समजण्यात अडचण, अशा वेळेस परिचारकेने त्या शक्यता ओळखल्या पाहिजेत आणि दोघांनाही एकमेकांना समजून घेण्यास मदत करावी त्यामुळे संवाद जास्त चांगला होतो. २)परीक्षण करत असताना रुग्णाची योग्य स्थिती बदलण्यास मदत केल्याने तपासणी   सुलभ आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत होते.

ब) डॉक्टरांना मदत करणे : डॉक्टरांकडे विविध उपकरणे देण्याची किंवा त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी परिचारिका साहाय्य करण्यासाठी हजर राहते जेणेकरुन ती रुग्णाला व डॉक्टरांना जास्तीत जास्त मदत करू शकेल. तसेच ती रुग्णाला पुरेसे स्पष्टीकरण किंवा सूचना देवून त्याच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण करत असते. उदा., चेहऱ्यावरचे हावभाव आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांना मदत करणे.

तपासणी झाल्यानंतर (Following the examination) :

अ) तपासणीनंतर रुग्णाची काळजी : परिचारिका रुग्णाला कपडे घालण्यास आणि समायोजित करण्यास मदत करते आणि त्याची त्वचा स्वच्छ आणि कोरडी करते. (उदा., विद्युत हृल्लेख (Electrocardiograph) किंवा गुदाशय तपासणीसारख्या प्रक्रियेनंतर जेलीचा उपयोग करतात ती स्वच्छ करते). रुग्ण तपासणी झाल्यानंतर बेड व्यवस्थित करून देते, त्यामुळे रुग्णाला आरामदायक वाटते. रुग्णाला अंथरुणावरच रहावे की काही, खाण्याची, पिण्याची परवानगी आहे की नाही आणि आपल्या नातेवाईकांना भेटता येईल की नाही याबाबत त्याला सूचना देते. तपासणीनंतर फेरतपासणी करणे आवश्यक असल्यास किंवा विशिष्ट उपचार सुरू करायचे असल्यास त्यानुसार रुग्णाला कळविते.

ब) उपकरणांची विल्हेवाट लावणे : परीक्षणाच्या वेळी वापरले जाणारे उपकरणे दूर ठेवते आणि बेड नीटनेटके करून देते.

 परिचारिकेने तिच्याकडे असणार्‍या शुश्रुषा कौशल्याचा वापर खालील बाबींसाठी करावा.

  • प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पॅथॉलॉजी विभागात योग्य लेबल करून नमुन्यांची पाठवणी करणे.
  • पुढील तपासणीसाठी विनंती करणे, उदा., क्ष-किरण तपासणी, रुग्ण रक्त नमुना चाचण्या किंवा पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देणे. फिजिओथेरपी किंवा पुढील रुग्ण सेवेसाठी मार्गदर्शन देऊन आवश्यकते नुसार दुसर्‍या रुग्णालयात किंवा इतर विभागात रवाना करणे.
  • व्ययक्षम (Disposable) असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी अचूक पद्धतीचा वापर करणे. उदा.वापरलेल्या सिरिंग्‍ज, सुया, कापूस इ.
  • व्ययक्षम नसलेल्या (वारंवार वापरत येणारे वस्तु व साधने) वस्तूंची साफसफाई आणि साठवण / पुनर्निर्जंतुकीकरण योग्य पद्धतीने करणे. उदा., प्रॅक्टोस्कोप, लीड, प्रकाश आणि बॅटरी, धातूची स्वछता करून ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाठविणे.
  • तपासणी पूर्ण झाल्यानंतर, नातेवाईक उपस्थित असल्यास त्यांना रुग्णाची स्थिती, वैद्यकीय निष्कर्ष आणि डॉक्टरांशी पूर्वसूचना यावर चर्चा करण्याची संधी देणे. ही चर्चा आयोजित करण्यासाठी डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये गोपनीयता राखणे आवश्यक असते. अशी चर्चा वॉर्डच्या योग्य ठिकाणी केली जाते. परंतु व्यस्त वॉर्डच्या मध्यभागी किंवा व्यस्त व्हरांडा किंवा प्रतिक्षा कक्षामध्ये केले जात नाही. अशा चर्चेच्या वेळी परिचारिका उपस्थित रहाणे उपयुक्त ठरते, जेणेकरून तिला नातेसंबंधात नातेवाईकांना नेमकी माहिती देण्यात आली आहे आणि त्यामुळे पुढे उद्भवू शकणारे कोणतेही मुद्दे स्पष्ट करण्याची गरज आहे हे कळते.

सारांश : वैद्यकीय तपासणी/परिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे जी सर्व रुग्णालयात येणार्‍या प्रत्येक रुग्णांची केली जाते. ती करत असताना परिचारिकेचा त्यामध्ये खूपच महत्त्वाचा वाटा असतो.  रुग्णाला या प्रक्रियेसाठी तयार करण्यापासून ते प्रक्रिया झाल्यावर रुग्ण बाहेर जाई  पर्यंत ती त्याला मदत करते. त्यामुळे रुग्णाची वैद्यकीय तपासणी या प्रक्रियेतील परिचारिका ही खूपच महत्त्वाची व्यक्ती आहे.

संदर्भ :

  • Nursing Revision Notes, Principles of Nursing, Celtic Revision Aids.   

समीक्षक : राजेंद्र लामखेडे