पुरुष आणि प्रकृति ही सांख्यदर्शनाची दोन पायाभूत तत्त्वे आहेत. भारतीय दर्शनात व्यक्तीच्या आत्म्यास ‘पुरुष’ अशी संज्ञा दिली आहे. सांख्यदर्शनात पुरुषाला ‘ज्ञ’ असेही म्हटले आहे. पुरुषाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सांख्यदर्शन पुढील कारणे प्रस्तुत करते. (सांख्यकारिका १७).

(१) संघाताचे प्रयोजन दुसऱ्यासाठी असते. संघात म्हणजे अनेक पदार्थांचे एकत्रित स्वरूप. फुले, पाने, तुळस, कलाबतू यांनी बनविलेला हार हा संघात आहे. हा संघात अचेतन वस्तूंचा असल्यामुळे हाराच्या अस्तित्वाचे प्रयोजन स्वत:साठी नसून ते कोणत्यातरी चेतन व्यक्तीच्या उपभोगासाठी असते. सायकल हा दांडा/मूठ (हँडल), गतिरोधक (ब्रेक्स), चाके यांनी बनलेला संघात होय. सायकलसुद्धा कोणत्यातरी चेतन व्यक्तीसाठी अस्तित्वात असते, स्वत:साठी नाही. तात्पर्य, जगातील प्रत्येक संघात हा दुसऱ्या कोणासाठी तरी असतो. म्हणून संघातमय व्यक्त जग आणि त्याचे कारण असलेली प्रकृति हे दुसऱ्या कोणासाठी तरी अस्तित्वात असले पाहिजेत. ते ज्याच्यासाठी आहेत ते चेतन तत्त्व म्हणजे पुरुष होय. यावरून पुरुषाचे अस्तित्व सिद्ध होते.

(२) प्रकृति सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त आहे. ती अचेतन, स्वत:चे पुरुषापासून भिन्नत्व न जाणणारी, सर्जनशील अर्थात् प्रसवक्षम आहे. प्रकृतीजवळ ज्ञातृत्व म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती नाही; तर ती ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याचा विषय आहे. प्रकृतीच्या या धर्मांपेक्षा विरुद्ध असलेले तत्त्व म्हणजे पुरुष होय.

(३) व्यक्त संघाताचे अधिष्ठान म्हणजे नियमन करणारे तत्त्व म्हणजे पुरुष होय. शरीर, इंद्रिये, मन या अचेतन तत्त्वांचे नियमन ज्या चेतन तत्त्वाद्वारे केले जाते, ते तत्त्व म्हणजे पुरुष होय.

(४) प्रकृति ही भोग्यवस्तू आहे व भोक्ता असल्याशिवाय भोग्य वस्तूचे अस्तित्व निरर्थक ठरते. म्हणून भोग्य अशा प्रकृतीचा आणि सुखदु:खरूपी भोगांचा कोणीतरी भोक्ता असला पाहिजे. तो भोक्ता म्हणजे पुरुष होय.

(५) संसारातील जीवांना कैवल्य प्राप्त करण्याची इच्छा असते. कैवल्य म्हणजे दु;खांपासून निवृत्ती होय. सांख्यदर्शनानुसार प्रकृति ही सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनीयुक्त आहे आणि या त्रिगुणांचा स्वभाव क्रमश: सुख, दु:ख आणि मोह अशा स्वरूपाचा आहे. प्रकृति किंवा तिच्यापासून उत्पन्न होणाऱ्या २३ तत्त्वांपैकी कोणालाही दु:खापासून मुक्ती (कैवल्य) प्राप्त करण्याची इच्छा होऊ शकत नाही, कारण दु:खरूप रजोगुण हा प्रकृतीचाच एक अंश आहे. त्यामुळे ज्याला कैवल्य प्राप्त करण्याची इच्छा होते, असे तत्त्व यांपेक्षा वेगळे असले पाहिजे. ते तत्त्व म्हणजे पुरुष होय.

अद्वैत वेदान्तानुसार सर्व जीवांचा आत्मा एकच आहे, त्यांमध्ये कोणताही भेद नाही. परंतु, सांख्य-योग दर्शनांनुसार चैतन्यस्वरूप पुरुष एक नसून अनेक आहेत. याविषयी सांख्यकारिकेचा सोदाहरण संदर्भ देणे उचित ठरेल (साङ्ख्यकारिका १८).

“प्रत्येक जीवाचा जन्म, मृत्यू आणि त्याची इंद्रिये वेगवेगळी असतात. ती त्याच्या पूर्वकर्मानुसार ठरतात. सर्व जीवांची एकाच वेळी एकसारखी प्रवृत्ति व तिला अनुसरून शारीरिक क्रिया होत नसते. उदाहरणार्थ, सगळ्यांना एकाच वेळी भूक लागत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी वेगवेगळा पुरुष असला पाहिजे. शिवाय सत्त्व, रज आणि तम या गुणांचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीमध्ये निरनिराळे असते आणि प्रत्येकाचा सुखदु:खाचा भोगही निराळा असतो.”

पुरुषाचे अनेकत्व सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे तर्क देता येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला तर सर्वांचा जन्म होतो असे नाही, एकाचा मृत्यू झाला तर सर्वच जीवांचा मृत्यू होतो असे नाही. पूर्वकर्मानुसार कोणाचा जन्म आधी तर कोणाचा नंतर होतो. हीच तऱ्हा मृत्यूच्या बाबतीतही आहे. एखादा जीव मुक्त झाला तरी असंख्य बद्ध (मुक्ती न मिळालेले) जीव या जगात दिसतातच. एकाचे दु:ख सर्वांनाच भोगावे लागत नाही आणि एकसुखी झाला तर सर्वच सुखी होत नाहीत. एकाचे पुण्य दुसऱ्याला मिळत नाही व एकाचे पापही दुसऱ्याला भोगावे लागत नाही. यामुळे सांख्य ‘पुरुषबहुत्व’ किंवा ‘पुरुषांची अनेकता’ मानतात. वस्तुत: जन्म-मरण, सुख-दु:ख, पाप-पुण्य यांचा स्थूल शरीराशी किंवा सूक्ष्म शरीराशी संबंध असतो, पुरुषाशी नव्हे. परंतु, वेगवेगळ्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरांशी संबंधित पुरुषही वेगवेगळे, अनेक असले पाहिजेत या तर्काच्या आधारे पुरुषाचे अनेकत्व सिद्ध होते.

केवळ चैतन्य (ज्ञान होण्याची योग्यता) हाच पुरुषाचा स्वभाव असल्यामुळे त्यामध्ये त्रिगुण, क्लेश, सुख-दु:ख इत्यादी गोष्टी असत नाहीत. परंतु, बुद्धीशी (चित्ताशी) पुरुषाचा संबंध येतो, त्या बुद्धीमध्ये असणाऱ्या अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव स्वत:ला मन, बुद्धी, इंद्रिये यापासून अभिन्न मानतो. प्रकृतीचे धर्म स्वत:चे मानण्यामुळे पुरुष द्रष्टा (ज्ञाता), भोक्ता बनतो. ‘आपण प्रकृती व तिच्यापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धी, अहंकार, मन, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, तन्मात्र व महाभूत या तत्त्वांपासून भिन्न नाही’ हा भ्रम त्याला ग्रासतो. परंतु, सत्त्वगुणाच्या उत्कर्षाने ज्यावेळी ‘आपण प्रकृतीपासून भिन्न, पृथक् आहोत’ हा विवेक उत्पन्न होतो, तेव्हा पुरुष मुक्त होतो. मात्र कुंभाराने चाक थांबविले तरी जसे ते थोडा वेळ फिरत राहते, त्याप्रमाणे जीवाचे आयुष्य सुरू राहते. विवेकज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याने केलेल्या कर्मांपासून नवीन संस्कार उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही. शरीरत्याग केल्यावर जीव कैवल्य प्राप्त करतो. प्रलयकाळात एकमेव चेतन, अविकारी, साक्षी, मुक्त पुरुष असतो. तो असंग म्हणजे सुखदु:खरहित (मध्यस्थ), कर्तृत्वविरहित असतो.

पुरुष तत्त्व हे वस्तुत: शुद्धचैतन्य, विभु, शाश्वत, अनादि, अविनाशी, अविकारी, केवल असे तत्त्व आहे. प्रकृतिरूप, रस, गंध, शब्द, स्पर्श असे विषय त्याला दाखवीत असल्यामुळे तो त्या विषयांचा साक्षी आहे. त्रिगुणरहित असल्यामुळे पुरुषाच्या ठिकाणी आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध दु:खांचा अत्यंत अभाव असतो. सुख, दु:ख व अज्ञान यांचा लवलेशही त्याच्या ठायी नसतो. सुखाने तो संतुष्ट होत नाही आणि दु:खाने उद्विग्न होत नाही. तो सुखाची स्पृहा करीत नाही व दु:खाचा शोकही करीत नाही; म्हणून तो ‘मध्यस्थ’ अर्थात् उदासीन ठरतो. तो अप्रसवधर्मी म्हणजे काहीही निर्माण करत नाही म्हणून त्याला ‘अकर्तृ’ म्हटले आहे, तो प्रकृतीच्या महत्, अहंकार इत्यादी कोणत्याही तत्त्वाशी संबद्ध नसल्यामुळे त्याला ‘केवल’ म्हणतात. पुरुषाला प्रकृतीपासूनचे आपले वेगळेपण सर्वथा कळत असल्याने त्याला ‘विवेकी’ म्हटले आहे. ‘मी निराळा आणि प्रकृती निराळी’ असे स्वत:चे खरे स्वरूप पुरुषाला जाणवते, त्यावेळी त्याला मुक्ती मिळते.  (सांख्यकारिका १९).

सांख्य मताप्रमाणे प्रकृतीचे सत्त्व, रज, तम हे तीन गुण प्रारंभी समप्रमाणात एकत्र राहत असल्याने ती साम्यावस्थेमध्ये असते. परंतु, पुरुषाच्या सान्निध्यात तिची मुळातील साम्यावस्था विचलित होते व रजोगुणाचे आधिक्य होऊन तिचा क्रमश: विकास होत जातो आणि दृश्यमान सृष्टीची उत्पत्ती होते. त्यामुळे स्वत: अविचलित राहूनही प्रकृतीला क्रियाशील बनविणारा पुरुष हा या वैश्विक प्रक्रियेचे आदि व अंतिम कारण ठरतो. जणु पांगळा पुरुष आंधळ्या प्रकृतीच्या खांद्यावर बसून तिला वाट दाखवून या विश्वाचा पसारा निर्माण करून चालवीत असतो (सांख्यकारिका २१).

सांख्यदर्शनाची पुरुष संकल्पना स्वीकारून योगदर्शनाने ईश्वराचा निर्देश ‘पुरुषविशेष’ असा केला आहे (योगसूत्र १.२४).

पहा : प्रकृति.

संदर्भ :

  • करंबेळकर विनायक, सांख्य-कारिका, रामकृष्ण मठ, नागपूर, २०१४
  • रस्तोगीलीना, साङ्ख्यतत्त्वदीपिका, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, २०१०

                                                                                                                                 समीक्षक : ललिता नामजोशी