सुगंधी फुले येणारे एक झुडूप. रातराणी ही बहुवर्षायू वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेस्ट्रम नॉक्टर्नम आहे. बटाटा व मिरची या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. रातराणी मूळची दक्षिण अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील, मुख्यत: वेस्ट इंडीज आणि ग्वातेमाला या भागांतील आहे. जगातील सर्व देशांच्या उष्ण प्रदेशांमध्ये ती शोभेसाठी लावली जाते. भारतात जवळपास सर्व उद्यानांमध्ये, तसेच घराच्या बागांमध्ये रातराणी आढळून येते. सेस्ट्रम प्रजातीत १५०–२५० जाती असून भारतात तिच्या आठ जाती आढळतात.
रातराणीचे सदाहरित झुडूप सु. ४ मी. उंच वाढते. फांद्या बारीक व हिरवट-पिवळसर असून मोठ्या झाल्यावर वाकतात. पाने साधी, एकाआड एक, १०-१२ सेंमी. लांब व दोन्ही बाजूंना गुळगुळीत असून टोकदार असतात. फुले बहरण्याचा काळ जरी उन्हाळा-पावसाळा असला तरी बऱ्याच ठिकाणी ती वर्षभर फुललेली दिसते. फुलोरे चवरीसारखे मोठे व लांबट असून ते फांद्यांच्या टोकांना तसेच पानांच्या बगलेत येतात. फुले हिरवट-पांढरी किंवा पिवळसर-पांढरी आणि सुवासिक असतात. दलपुंज खाली नळीसारखा असून पाकळ्या लहान, अंडाकृती, उभट व टोकाला बोथट असतात. मृदुफळ अंडाकृती व बोंड प्रकारचे असून त्यात अनेक लहान बिया असतात.
रातराणीची लागवड छाट कलमांद्वारे करतात. एक वर्षांनंतर फुले येऊ लागतात. कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये, पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेत किंवा मोठ्या कुंडीमध्ये ही झुडपे वाढू शकतात. या वनस्पतीचा अर्क अपस्मारात आचके येऊ नये म्हणून देतात. तसेच फुलांपासून अत्तर मिळवितात. मात्र या अत्तरामुळे श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींवर परिणाम होऊ शकतो, असे आढळून आले आहे. सुगंधासाठी रातराणी बागेत व उद्यानात लावली जाते. तिची फुले रात्री उमलतात; त्यांचा मंद सुगंध वातावरणात सर्वत्र दरवळतो. यामुळेच या वनस्पतीला रातराणी, नाईट क्वीन किंवा नाईट जॅस्मिन ही नाव पडली असावीत.
सेस्ट्रम डाययुर्नम या जातीला डे जॅस्मिन म्हणजेच ‘दिन का राजा’ म्हणतात. ती मूळची चिलीमधील आहे. सोलॅनेसी कुलातील सर्व वनस्पतींमध्ये सोलॅनीन हे अल्कलॉइड असते. ते वेगवेगळ्या जातींमध्ये कमी-अधिक प्रमाणात असते. या कुलातील बटाटा व मिरची यांसारख्या वनस्पती नियमितपणे खाल्ल्या जात असून त्यांच्यापासून शरीराला अपाय होत नाही. रातराणीचा उल्लेख नाईट जॅस्मिन आणि दिन का राजाचा उल्लेख डे जॅस्मिन असा जरी होत असला तरी सेस्ट्रम प्रजाती जॅस्मिनम प्रजातीपेक्षा वेगळी आहे. मोगरा, जाई, कुंद इत्यादी जाती असणाऱ्या जॅस्मिनम प्रजातीचे कुल ओलिएसी म्हणजे रातराणीच्या कुलाहून भिन्न आहे.
Nice 👌🏻