सिंग, मेजर शैतान : (१ डिसेंबर १९२४‒१८ नोव्हेंबर १९६२). भारत-चीन संघर्षातील एक पराक्रमी सेनाधिकारी आणि परमवीरचक्राचे मरणोत्तर मानकरी. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या घराण्यात जोधपूर (राजस्थान) येथे झाला. त्यांचे वडील हेमसिंगजी हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते. त्यामुळे लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. जोधपूर येथे सुरुवातीचे शिक्षण घेऊन त्यांनी सैन्यदलातील भरतीसाठी मुलाखत दिली. सैन्यदलात कमिशन मिळवून (१ ऑगस्ट १९४९) कुमाऊँ रेजिमेंटमध्ये त्यांची अधिकारी पदावर नियुक्ती झाली. लष्करी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना मेजरची श्रेणी प्राप्त झाली.
भारत-चीन संघर्षाच्या वेळी (१९६२) पूर्वेकडील अतिउंच आणि बर्फाच्छादित व लष्करी दृष्ट्या दुर्लक्षित प्रदेशात चीनने अचानक हल्ला करून राजनीतिज्ञांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना धक्का दिला. त्या वेळी मेजर सिंगांची एकमेव कुमाऊँ पलटण (रेजिमेंट–१३ क्रमांक) या भागात तैनात करण्यात आली. ब्रिगेडियर टी. एन्. रैना हे या भागाचे कमांडर होते. ही तुकडी अंबाल्याहून जम्मू-काश्मीरमध्ये गेली (जून १९६२). बर्फाच्छादित थंड प्रदेशाचा अनुभव नसलेल्या जवानांना या अतिउंच पहाडी प्रदेशात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. तेथे तैनात केलेले चिनी सैनिक सिंक्यांग पर्वतावर वास्तव्य करणारे होते. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे, मशीनगन्स होत्या. याउलट, भारतीय जवानांकडे दुसऱ्या महायुद्धातील वापरलेल्या कुचकामी झालेल्या ३०३ एकबारी, ली एनफिल्ड बनावटीच्या बंदुका होत्या. अशा प्रतिकूल परिस्थितीतही हे जवान कोणतीही पर्वा न करता चिनी तुकडीशी रेझांग ला या ठिकाणी मेजर सिंग यांच्या नेतृत्वाखाली तोंड देण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी सर्व मार्गांवर स्वयंचलित तोफा आणि मशीनगन्स रोखून शत्रूच्या वाटा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात अनेक चिनी सैनिक मृत्युमुखी पडूनसुद्धा त्यांच्या तुकड्या एकामागून एक येतच राहिल्या. त्यांनी भारतीयांचे चौकी पहारे उद्ध्वस्त केले आणि सर्व सैनिक ठार केले. या धुमश्चक्रीत मेजर सिंगांवर मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव झाला. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांच्या उर्वरित साथीदारांनी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न केला; तथापि या कृत्यात जवानांच्या जिवास धोका आहे, हे जाणून त्यांनी आपणास त्याच ठिकाणी सोडून सर्वांनी सुखरूप स्थळी जावे, असा हुकूम दिला. तीन महिन्यानंतर त्यांचा मृतदेह त्या बर्फाच्छादित प्रदेशात सापडला. तो जोधपूरला नेण्यात येऊन सैनिकी इतमामाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय सेनादलाच्या इतिहासात रेझांग लाची लढाई मेजर सिंगांच्या असामान्य पराक्रम आणि नीतिधैर्याने अद्वितीय ठरली. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना परमवीरचक्र या अत्युच्च सैनिकी सन्मानाने मरणोत्तर गौरविण्यात आले.
समीक्षक – सु. र. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.