एअर, एडवर्ड जॉन (Eyre, Edward John) : (५ ऑगस्ट १८१५ – ३० नोव्हेंबर १९०१). ऑस्ट्रेलियात समन्वेषण करणारे ब्रिटिश समन्वेषक आणि ब्रिटिश वसाहतीचे प्रशासक. त्यांचा जन्म इंग्लंडच्या बेडफर्डशर परगण्यातील व्हिप्सनेड या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण यॉर्कशर आणि सेडबर्ग येथे झाले. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये पशुपालन व्यवसायासाठी असलेले महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुढचे शिक्षण न घेता मार्च १८३३ मध्ये म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षीच ते इंग्लंडहून ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आले. तेथे त्यांनी काही मेंढ्या व मालमत्ता मिळविली. काही काळानंतर रोगाने त्यांच्या मेंढ्या मृत्यू पावल्या, तरी पुन्हा काही मेंढ्या आणि गुरे त्यांनी खरेदी केल्यात. डिसेंबर १८३७ ते जुलै १८३८ या कालावधीत ते आपल्या सहकार्यांसह १,००० मेंढ्या व ६०० गुरे घेऊन सिडनीहून खुष्कीच्या मार्गाने चालत अॅडिलेड येथे आले. तेथे त्यांनी घरही घेतले. नफा मिळविण्याच्या हेतूने त्यांनी तेथे आपले सर्व पशुधन विकून टाकले. त्यानंतर त्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियाचे समन्वेषण करण्याचे ठरविले.
प्रथमत: त्यांनी अॅडिलेडच्या वायव्येकडील वाळवंटी प्रदेशाचे समन्वेषण केले. त्यानंतर जून १८४० ते जुलै १८४१ या कालावधीतील तिसऱ्या सफरीत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील ग्रेट ऑस्ट्रेलियन बाईट या उपसागराच्या सभोवतालचा अगदी जोखमीचा सुमारे ३,२०० किमी.चा प्रवास केला. या प्रवासात ते एका सरोवराजवळ पोहोचले. पुढे ते सरोवर एअर सरोवर या नावाने ओळखले जाऊ लागले. याशिवाय ऑस्ट्रेलियातील इतरही अनेक बाबी एअर यांच्या नावावरून ओळखल्या जातात. उदा., एअर द्वीपकल्प, एअर महामार्ग, एअर खाडी इत्यादी. ऑस्ट्रेलियात त्यांनी अनेक वर्षे न्यायाधिकारी (मॅजिस्ट्रेट) आणि तेथील आदिवासी (मूळ रहिवासी) लोकांचा रक्षक म्हणून कार्य केले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या भाषा आणि चालीरीती अवगत केल्या. सफरीवरून परतल्यानंतर त्यांनी आपल्या प्रवासाचा वृत्तांत प्रकाशित केला.
एअर यांनी ऑस्ट्रेलिया सोडल्यानंतर इ. स. १८४६ – १८५३ या कालावधीत न्यूझीलंडचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून, तर इ. स. १८५४ – १८६० या कालावधीत वेस्ट इंडीजमधील सेंट व्हिन्सेंट आणि अँटिग्वा या ब्रिटिश वसाहतीचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. इ. स. १८६०-६१ मध्ये ते लीवर्ड बेटांचे गव्हर्नर होते. इ. स. १८६१ – १८६४ या कालावधीत वेस्ट इंडीजमधील जमेकाचे गव्हर्नर म्हणून काम पाहात असतानाच त्यांना जमेकाचे कायमस्वरूपी गव्हर्नरपद देण्यात आले; मात्र ते जमेकाचे वादग्रस्त गव्हर्नर ठरले. जमेकाचे गव्हर्नरपद सांभाळत असताना त्यांनी स्थानिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यांच्यावर अनेक अन्यायकारक कायदे लादले. परिणामत: स्थानिकांचा रोष खूप वाढला. स्थानिकांच्या रोषातूनच ११ ऑक्टोबर १८६५ रोजी तेथील कृष्णवर्णीयांनी जमेकाच्या आग्नेय भागातील मरँट नदीच्या मुखाशी असलेल्या मरँट बे या नगरात बंडाला सुरुवात केली. एअर यांनी ते बंड क्रूरपणे चिरडण्याचा प्रयत्न केला. मरँट बे बंडात स्थानिक लोकसेनेचे १८ सदस्य आणि ४३९ शेतकरी मारले गेले. ६०० जणांना फटक्यांची शिक्षा सुनावली, तसेच या बंडात अनेक सार्वजनिक इमारती आणि घरे जाळली गेली. मिश्रवंशीय व्यापारी, राजकारणी आणि स्थानिक विधिमंडळ सदस्य असलेल्या जॉर्ज विल्यम गॉर्डन यांना फाशी दिले. त्यासाठी गॉर्डन यांच्यावर बंडात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता. वास्तविक त्यांचा या बंडाला पाठींबा होता; परंतु प्रत्यक्ष सहभाग नव्हता. ब्रिटनमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनांसाठी एअर यांना जबाबदार धरून त्यांना अटक करावी आणि गॉर्डन यांच्या खुनाबाद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी अनेक ब्रिटिश मुत्सद्द्यांनी मागणी केली. एअर यांच्या वर्तणुकीत बराच विरोधाभास आहे, असे अनेक ब्रिटिश तज्ज्ञांचे मत होते. एअर यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता; परंतु काही व्यक्तींनी त्यांची पाठराखण केल्याने त्या खटल्यातून त्यांना दोषमुक्त करण्यात आले.
ब्रिटिश शासनाने जुलै १८६६ मध्ये एअर यांना परत बोलाविले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी इंग्लंडमधील डेव्हन येथे घालविले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
समीक्षक : वसंत चौधरी