डोळ्यांना दिसणारे शरीर हाच जीवाचा एकमात्र देह आहे अशी सर्वसामान्य समजूत असते. माता आणि पिता या दोघांपासून उत्पन्न झालेला रक्त, मांस, अस्थी, मज्जा इत्यादी असलेला देह म्हणजे स्थूल शरीर होय. हे शरीर पाच महाभूतांनी बनलेले असल्यामुळे याचे ज्ञान इंद्रियांद्वारे होते, त्यामुळे या शरीरास स्थूल शरीर असे म्हणतात; परंतु, दैनंदिन जीवनात प्रत्ययाला येणाऱ्या या स्थूल शरीरापेक्षाही वेगळ्या स्तरावर एका सूक्ष्म शरीराचे अस्तित्व मानले पाहिजे अशी सांख्य, योग आणि वेदान्त या दर्शनांची धारणा आहे. सूक्ष्म शरीराचे ज्ञान इंद्रियांद्वारे होत नाही, तर अनुमानाने होते म्हणून याला सूक्ष्म शरीर असे म्हणतात. सांख्य आणि योग दर्शनांनुसार सूक्ष्म शरीरामध्ये श्रोत्र (कान), त्वक् (त्वचा), चक्षु (डोळे), जिह्वा (जीभ) आणि घ्राण (नाक) ही पाच ज्ञानेंद्रिये; वाणी (वाचा), पाद (पाय), पाणि (हात), पायु (गुद) म्हणजे मलविसर्जनाचे कार्य करणारे इंद्रिय आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये; शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच तन्मात्र; तसेच बुद्धी, अहंकार आणि मन या अठरा घटकांचा समावेश होतो. आपल्या शरीरातील नाक, कान, जीभ इत्यादी अवयव म्हणजे इंद्रिये नसून त्यांच्या ठिकाणी राहणाऱ्या व अनुक्रमे गंध, शब्द, स्पर्श आदि विषयांचे ज्ञान करून देणाऱ्या सूक्ष्म शक्ती म्हणजे इंद्रिये होत. त्यामुळे इंद्रियांचा समावेशही सूक्ष्म शरीरात केला जातो.
व्यावहारिक जीवनात डोळ्यांनी दिसणाऱ्या स्थूल शरीरापेक्षा वेगळ्या सूक्ष्म शरीराचे अस्तित्त्व का मानावे, याविषयी दर्शनांनी पुढील स्पष्टीकरण केले आहे. या जन्मात केलेले कर्म पुढील जन्म आणि त्यातील भोगास कारणीभूत होत असते. परंतु, कर्म केल्याक्षणी ते नाहीसे होते आणि त्या कर्माचे केवळ संस्कारच शिल्लक राहतात. स्थूल शरीर मरणांती नष्ट होते. त्यामुळे ते कृत कर्मांचे संस्कार वाहू शकत नाही. आत्मा निर्लेप असल्याने त्यावर हे संस्कार उमटत नाहीत. त्यामुळे संस्कार पुढील जन्मात वाहून नेणाऱ्या सूक्ष्म शरीराची संकल्पना स्वीकारणे तर्कसंगत ठरते. ज्या जीवाने जे कर्म केले, त्याच जीवाला त्याचे फळ मिळावे यासाठी ही व्यवस्था आहे. सामान्यत: कर्म म्हणजे शरीराद्वारे होणारी एखादी क्रिया असे समजले जाते; परंतु, प्रतिक्षिप्त क्रिया वगळता अन्य शारीरिक क्रिया या अंत:करणाने प्रेरित केल्याशिवाय करता येणे शक्य नसते. उदा., एखाद्या व्यक्तीने दान देण्याची क्रिया केली, तर प्रत्यक्ष दान देण्याआधी अंत:करण दान देण्याचा निर्णय घेते. त्यामुळे वस्तुत: कर्म हे शारीरिक नसून ते मानसिक स्तरावर होते, परिणामी त्या कर्माचे संस्कारही अंत:करणातच राहतात व योग्य वेळ आल्यावर त्याचे फळही अंत:करणालाच मिळते. या सर्व प्रक्रियेमध्ये स्थूल शरीर हे फक्त सुखदु:खरूपी भोगाचा आश्रय असते.
सूक्ष्मशरीरालाच लिंगदेह किंवा लिंगशरीर असेही म्हणतात. ‘लय पावणारे’ म्हणजे ‘लिङ्ग’ अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे (लयं गच्छति इतिलिङ्गम् |). सूक्ष्म शरीर प्रकृति-पुरुषाप्रमाणे अनादि-अनंत नाही. विवेकज्ञान प्राप्त झाल्यावर सूक्ष्म शरीराचा प्रकृतीमध्ये लय होतो, त्यामुळे त्यास लिंगशरीर असे म्हणतात. जे अदृष्ट पदार्थाचे ज्ञान करवून देते ते लिंग, असाही लिंग शब्दाचा अर्थ आहे (लीनम् अर्थं गमयति इति लिङ्गम्|). बुद्धी इत्यादी पदार्थ अस्तित्वात आहेत, तर त्यांचे मूळ कारण काय असावे, असा विचार केल्यास प्रकृती हे त्यांचे मूळ कारण असावे, असा तर्क करता येतो. सांख्य दर्शनानुसार जगाचे कारण असणारी प्रकृती जरी अदृष्ट असली, तरी बुद्धी आदि अन्य व्यक्त पदार्थ प्रकृतीचे ज्ञान करून देतात, म्हणून त्यांना लिंग म्हणतात. ते सूक्ष्म देहाच्या आधारे राहतात, त्यामुळे त्या देहाला लिंगशरीर म्हणतात.
मृत्यूनंतर एक स्थूल शरीर सोडून जाणारे व योग्य काळी दुसऱ्या नवजात स्थूल शरीरात प्रविष्ट होणारे जीवांचे सूक्ष्म-शरीर मानले म्हणजे ते कर्मसंस्काराचे आश्रय असेल, अशी कल्पना करता येते. फुले वस्त्रात ठेवल्यास जसा फुलांचा सुगंध वस्त्रात राहतो, तसे धर्म आणि अधर्म हे भाव किंवा संस्कार सूक्ष्म शरीरात राहतात. धर्म आणि अधर्माला ‘भाव’ अशी संज्ञा आहे. हे भाव बुद्धीच्या आश्रयाने राहतात आणि बुद्धी सूक्ष्म शरीराचा घटक आहे. बुद्धीतील अधर्म, अज्ञान, राग अर्थात् आसक्ती आणि अनैश्वर्य (ऐश्वर्याचा अभाव) या चार भावांमुळे जीवाला अधोगती प्राप्त होते आणि त्याला निकृष्ट श्रेणीत जन्म प्राप्त होतो, तर धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे चार भाव जीवाला चांगल्या श्रेणीत जन्म मिळवून देतात. मोक्ष मिळेपर्यंत लिंगशरीर अनेक स्थूल शरीरांत प्रवास करत जीवाची सोबत करते. स्थूल शरीराशी संयोग झाल्याशिवाय केवळ सूक्ष्म शरीराद्वारे कर्मफलाचा उपभोग घेता येणे शक्य नसते, त्यामुळे त्याला ‘निरुपभोगम्’ असेही म्हटले जाते (पूर्वोत्पन्नमसक्तं नियतं महदादिसूक्ष्मपर्यन्तम् | संसरति निरुपभोगं भावैरधिवासितं लिङ्गम् ||साङ्ख्यकारिका ४०).
जीव स्वप्नांतील विविध अनुभवही लिंगशरीराच्याद्वारे घेत असतो. मृत्यू म्हणजे सूक्ष्म शरीराचा स्थूल शरीराशी होणारा वियोग होय. प्रकृतीने प्रत्येक आत्म्यासाठी स्वतंत्र सूक्ष्म शरीर पहिल्याच सृष्टीच्या वेळी निर्माण केले असून ते ते त्या त्या आत्म्याबरोबर प्रत्येक जन्मात नियत रूपाने राहते. ज्याप्रमाणे नट वेगवेगळ्या भूमिका करताना त्या त्या भूमिकेला साजेसे आचरण करतो त्याप्रमाणे सूक्ष्म शरीर मनुष्ययोनि, पशुयोनि इत्यादी ज्या ज्या योनीत जन्माला आले असेल त्या त्या योनीच्या वैशिष्ट्यांप्रमाणे कर्मे करते (साङ्ख्यकारिका ४२). ज्यावेळी साधकाला पुरुष आणि त्रिगुण यांतील भेदाचे ज्ञान म्हणजेच विवेकज्ञान प्राप्त होते, त्यावेळी सूक्ष्म शरीराच्या अस्तित्वाचे प्रयोजन समाप्त होऊन ते प्रकृतिमध्ये लीन होते.
भारतीय दर्शनपरंपरेतील चार्वाक, जैन व बौद्ध दर्शन यांना सूक्ष्म शरीराची संकल्पना मान्य नाही. चार्वाक दर्शन फक्त स्थूल शरीराचेच अस्तित्व मानते. जैन दर्शनानुसार जीवाव्यतिरिक्त अन्य काहीही एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करत नाही. बौद्ध दर्शन सर्व काही क्षणिक आणि अनित्य मानते. न्याय आणि वैशेषिक दर्शने आत्मा आणि मन या दोघांचेही अस्तित्व मानतात, परंतु सूक्ष्म शरीराचे पृथक् अस्तित्व त्यांनी मानले नाही. कारण त्यांच्या मताप्रमाणे संस्कार, धर्म-अधर्म हे आत्म्याचेच विशेष गुण आहेत. तसेच इंद्रिये पंचमहाभूतात्मक असल्याने त्यांचा समावेश स्थूल शरीरातच होतो.
अद्वैत-वेदान्तानुसार सूक्ष्म शरीरात १७ घटक असतात. ते पुढीलप्रमाणे — ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, ५ प्राण, बुद्धी व मन (वेदान्तपरिभाषा परिच्छेद ७). हे १७ घटक शुद्ध स्वरूपातील सूक्ष्म भूतांपासून विशिष्ट प्रक्रियेने तयार होतात. सूक्ष्म शरीर हे प्राणमय, मनोमय व विज्ञानमय कोशांनी युक्त असते (वेदान्तसार १३-१४). वेदान्तदर्शनात स्थूल आणि सूक्ष्म शरीरांव्यतिरिक्त अविद्यारूपी कारण शरीरही मानले आहे.
सूक्ष्मशरीर ही भारतीय दर्शनातील तार्किक आणि सुसंगत रचना होय. ही संकल्पना कर्म, कर्मफल, पुनर्जन्म आणि मोक्ष या शृंखलेतील महत्त्वाची कडी ठरते. आधुनिक काळातही माणसाला दुराचरणापासून परावृत्त करण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे.
पहा : पञ्चकोश.
संदर्भ :
- गौड ज्वालाप्रसाद, साङ्ख्यतत्त्वकौमुदी, चौखम्बा सुरभारती प्रकाशन, वाराणसी, २००१.
- चाफेकर नलिनी (अनु.), वेदान्तसार, ठाणे, १९९४.
- शास्त्री त्र्यम्बकराम, वेदान्तपरिभाषा, चौखम्बा संस्कृत सीरीज आफिस, वाराणसी, २०१०. समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर