पंत, पूरण चंद्र : (१४ जुलै १९३७–२२ नोव्हेंबर २००६). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील काशीपूर या गावात झाला. त्यांचे वडील इंग्रजीचे शिक्षक होते. शालेय शिक्षण गावातच पूर्ण केल्यानंतर पंत लखनौला आले व तेथे त्यांनी संस्कृत विषयात बी. ए. पदवी प्राप्त केली. सन १९५८ मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विषयात एम. ए. पदवी मिळवली. त्याच वर्षी त्यांना विद्यापीठातर्फे पुणे येथे डेक्कन कॉलेजमध्ये प्रागितिहासाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले.
पंत १९६० मध्ये बनारस हिंदू विद्यापीठात व्याख्याता म्हणून रुजू झाले. १९६२-६३ मध्ये प्रा. ए. के. नारायण यांनी चुनार भागात केलेल्या बनिमिलिया-बहेरा या महापाषाणयुगीन स्थळाच्या उत्खननात त्यांचा सहभाग होता. बनारस हिंदू विद्यापीठात असतानाच त्यांना १९६५ ते १९६७ या काळात जर्मनीतील कलोन विद्यापीठात संशोधन करण्याची व प्रागितिहासातील नवीन पद्धती शिकण्याची संधी मिळाली. पंत यांनी मिर्झापूर, बांदा, हमीरपूर, अलाहाबाद, झाशी आणि ललितपूर येथील घनदाट जंगलाची व तेथील डाकूंची पर्वा न करता विस्तृत क्षेत्रीय सर्वेक्षण केले आणि अनेक प्रागैतिहासिक स्थळे शोधून काढली. त्याचप्रमाणे त्यांनी बिहारमधील भागलपूर, मुंगेर आणि पाटणा या भागात संशोधन प्रकल्प हाती घेतले.
पंत यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विषयात पीएच. डी संपादन केली (१९७८).‘पॅलिओलिथिक इंडस्ट्रीज ऑफ सदर्न उत्तर प्रदेश’ हा त्यांच्या पीएच. डी प्रबंधाचा विषय होता. पुढे त्यांची प्रपाठक पदावर नियुक्ती झाली. सन १९८४ ते १९८८ दरम्यान पंत आणि विदुला जैस्वाल यांनी मिळून बिहारच्या मोंघीर जिल्ह्यातील पैसारा या अश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले व त्याचा अहवाल प्रसिद्ध केला. या ठिकाणी अश्मयुगीन अवजारांखेरीज दगडांच्या विवक्षित रचनेचा पुरावा मिळाला. दगडांच्या छोट्या भिंतींवर बहुधा लाकडी वासे व झाडाच्या फांद्या वापरून छप्पर केले असावे, असे दिसते. हा पुराश्मयुगात घरसदृश निवारा बांधण्याचा भारतीय उपखंडातील एकमेव पुरावा आहे.
सन १९८९ मध्ये पंत यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली व ते या पदावरून १९९७ मध्ये सेवानिवृत्त झाले. ते पुरातत्त्व या भारतीय पुरातत्त्व परिषदेच्या नियतकालिकाचे सहयोगी संपादक होते (१९६७-६८; १९७२-७३). प्राचीन इतिहास व पुरातत्त्वीय संशोधनासाठी प्राचीन भारतीय साहित्याचा भरपूर उपयोग करून घेण्याच्या बाबतीत पंत आग्रही असत. कुरुक्षेत्र विद्यापीठात झालेल्या परिषदेतील आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी या संदर्भात तरुण संशोधकांचे लक्ष वेधले होते (१९९६). गंगा नदी व विंध्य पर्वतराजीतील अश्मयुगीन संस्कृतींच्या विषयावर पंत यांचे तीसपेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
लखनौ येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Pant, P. C. & Jaiswal, Vidula, Paisra, The Stone Age Settlement of Bihar, Agam Kala Prakashan, Delhi, 1991.
- Pant, P. C. ‘First Farmers in Global Perspective : Some Considerationsʼ, Pragdhara, 18: 5-8, 2008.
- Pant, P. C. Prehistoric Uttar Pradesh, A Study of Old Stone Age, Agam Kala Prakashan, Delhi, 1982.
- Tewari, Rakesh, ‘Obituary- P.C. Pantʼ, Pragdhara, 17, 2006-2007.
समीक्षक : सुषमा देव